हडकुळं शरीर कमजोर दिसतं! थकवा तर जाणवतोच, मग 'या' आहेत वजन वाढवण्याच्या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 03:52 PM2022-08-24T15:52:31+5:302022-08-24T17:26:19+5:30
वजन वाढवण्यासाठी तांदूळ (Rice For Weight Gain) हा आहारातला घटक खूप महत्त्वाचा ठरतो. तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि खूप कॅलरीज असतात. यामुळे वजन झटपट वाढायला मदत होते. वजन वाढीसाठी तांदूळ कोणत्या प्रकारे आहारात घेता येईल.
लठ्ठपणा ही सध्या अनेकांसाठी मोठी समस्या बनली आहे. वाढलेलं वजन अनेक आजारांना निमंत्रण देतं, तसंच कमी वजनामुळंही अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात. निरुत्साह, दम लागणं, एनर्जीचा अभाव यामुळं आयुष्य कंटाळवाणं होतं. म्हणूनच वजन वाढवण्यासाठी (Weight Gain) योग्य आहार आणि त्याला पूरक असा व्यायाम करणं गरजेचं असतं. वजन वाढवण्यासाठी तांदूळ (Rice For Weight Gain) हा आहारातला घटक खूप महत्त्वाचा ठरतो. तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि खूप कॅलरीज असतात. यामुळे वजन झटपट वाढायला मदत होते. वजन वाढीसाठी तांदूळ कोणत्या प्रकारे आहारात घेता येईल.
भारतात तांदूळ अनेक भागांमध्ये दैनंदिन आहाराचा भाग आहे. काही भागांत तर तांदूळ हेच मुख्य अन्न आहे. दक्षिणेतल्या राज्यांमध्ये तांदळापासून अनेक पदार्थ केले जातात. महाराष्ट्रात कोकणात तांदूळ (Konkan Region of Maharashtra) पिकवला व खाल्ला जातो. ईशान्येकडील राज्यांमध्येही तांदूळ खाल्ला जातो. अनेक घरांमध्ये दिवसात दोन्ही जेवणांमध्ये भात असतो. यावरून तांदळाची आपल्याकडे असलेली लोकप्रियता लक्षात येईल. वजन कमी करणाऱ्यांना भात वर्ज्य करायला सांगितला जातो. मात्र वजन वाढवणाऱ्यांना तांदूळ खायला हरकत नसते. आहारात तांदूळ अनेक प्रकारांनी समाविष्ट करता येतो. भाताचे अनेक प्रकार, इडली-डोसा, खीर, घावन असे अनेक पदार्थ तांदळापासून करता येतात.
वरण-भात-
रोज दुपारच्या जेवणात वरण-भात (Dal-Rice) किंवा डाळ-भात खाणं वजनवाढीसाठी फायद्याचं ठरू शकतं. वरण-भातामुळे व्हिटॅमिन आणि प्रोटिन दोन्ही शरीराला मिळतं. वरण-भात नियमित खाल्ल्यास वजन वाढू शकतं.
बिर्याणी-
बिर्याणी (Biryani) हा भाताचा प्रकार खूपच चविष्ट असतो आणि वजनवाढीसाठीही पूरक ठरू शकतो. यात भरपूर भाज्या घालून त्यातील पोषणमूल्य आणखी वाढवता येतात. मांसाहारी बिर्याणी वजन वाढवायला अधिक उपयुक्त असते. त्यामुळे वजन वाढवायचं असेल, तर घरी केलेली बिर्याणी खाता येईल.
खिचडी-
खिचडी वजन कमी करण्यासाठीच नाही, तर वजन वाढवण्यासाठीही फायदेशीर असते. खिचडी पचायला हलकी असते. त्यामुळे ती खाऊन लगेचच पुन्हा भूक लागायची शक्यता असते. खिचडीत डाळ अधिक घालता येऊ शकेल. मूग डाळ घालूनही खिचडी (Khichadi) करता येते. वजन वाढवण्यासाठी खिचडीसोबत कोशिंबिर, लोणचं खाता येईल. खिचडी आवडत नसेल, तर पुलावाच्या स्वरुपातही तांदूळ खाता येईल.
तांदळाची खीर-
वजन वाढीसाठी फुल फॅट मिल्क अर्थात सायीसकट दुधामध्ये खीर करा. त्यात बदाम, काजू, बेदाणे घालून खिरीला पौष्टिकही करा. वजन वाढवण्यासाठी आठवड्यातून 3-4 वेळा तांदळाची खीर (Rice Dessert) खाणं हिताचं ठरतं.
वजनवाढीसाठी दररोजच्या जेवणात 1/3 कप तांदूळ असला (Use Rice In Regular Diet) पाहिजे. यापेक्षा जास्तही घेता येतो. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईस अधिक लाभदायक असतो. कमी वजनाच्या व्यक्ती कृष व आजारी दिसतात. काही इनफेक्शन्सना त्या पटकन बळी पडू शकतात. त्यामुळे शरीराचं पुरेसं वजन ठेवणं आवश्यक असतं. तांदळाचे हे पदार्थ खाऊन तुम्ही वजन वाढवू शकता.