वजन कमी करण्याबाबतचे, लोकांची दिशाभूल करणारे गैरसमज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:29 IST2025-03-04T12:28:14+5:302025-03-04T12:29:20+5:30

Weight Loss : लोकांमध्ये वजन कमी करण्याबाबत काही गैरसमजही असतात. त्याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

Weight Loss : Debunking Common Weight Loss Myths That Mislead People | वजन कमी करण्याबाबतचे, लोकांची दिशाभूल करणारे गैरसमज

वजन कमी करण्याबाबतचे, लोकांची दिशाभूल करणारे गैरसमज

(डॉ मनोज जैन, कन्सल्टन्ट, जनरल सर्जरी (गॅस्ट्रोइंटेस्टीनल, लॅपरोस्कोपिक, बॅरियाट्रिक, मेटाबोलिक आणि रोबोटिक सर्जन), कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई)

Weight Loss :  वजन कमी करणं हे एक खूपच अवघड काम आहे. लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. हे उपाय करून काहींना फायदा मिळतो तर काहींना मिळत नाही. वजनाची वाढती समस्या बघता सोशल मीडियावरही यासंबंधी अनेक टिप्स दिल्या जातात. पण लोकांमध्ये वजन कमी करण्याबाबत काही गैरसमजही असतात. त्याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

गैरसमज १: फक्त व्यायामाने वजन कमी होते

नुकत्याच हाती आलेल्या संशोधन निष्कर्षांनुसार, फक्त व्यायामाने वजन कमी होत नाही. व्यायामाने कॅलरी जळतात आणि त्याबरोबरीनेच बेसल मेटाबोलिक रेट देखील वाढतो, सहाजिकच त्या व्यक्तीची भूक वाढते. अनेक लोकांना हे समजत नाही की व्यायामाने जळालेल्या कॅलरीज जास्त जेवल्याने वाढतात, त्यामुळे त्यांचे प्रयत्न वाया जातात. वजन कमी होणे ही एक सतत होत राहणारी प्रक्रिया आहे, जर व्यायाम थांबला पण आहार तसाच राहिला तर वजन खूप जास्त प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे व्यायाम आणि योग्य आहार यांचा समावेश असलेली सुसंतुलित योजना करून वजनावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

गैरसमज २: वजन कमी होण्याचा एकच सर्वात चांगला मार्ग असतो.

वजन कमी करण्याचा एकच हमखास असा मार्ग नसतो. त्याच्या प्रभावी पद्धती विविध घटकांवर अवलंबून असतात जसे की, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), जीवनशैली आणि सह्व्याधी. मुख्य पद्धती पुढील प्रमाणे आहेत

आहारातील बदल: कॅलरी सेवनावर नियंत्रण, उच्च पोषणमूल्य असलेल्या पदार्थांचा रोजच्या आहारामध्ये समावेश आणि वेळच्या वेळी जेवणे.

शारीरिक व्यायाम: तुमच्या शरीराच्या गरजांनुसार नियमितपणे व्यायाम.

फार्माकोथेरपी: काही स्थितींमध्ये सेमाग्ल्यूटाइडवर आधारित औषधे

नॉन-सर्जिकल प्रक्रिया: गॅस्ट्रिक बलून आणि एन्डोस्कोपिक थेरपी

सर्जिकल प्रक्रिया: खूप जास्त स्थूलपणा असेल तर बॅरियाट्रिक सर्जरी. २२.५ ते २७.५ बीएमआय असलेल्यांसाठी आहार आणि व्यायाम पुरेसे आहे, पण त्यापेक्षा जास्त बीएमआय रेन्ज असल्यास फार्माकोथेरपी किंवा सर्जरी आवश्यक असते. 

गैरसमज ३: फक्त डाएटिंग करून वजन कमी करता येते.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही काय खाता ते महत्त्वाचे आहे पण फक्त डाएटिंग करून वजन कमी होत नाही आणि कमी झालेले वजन दीर्घकाळ टिकून राहू शकत नाही. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळणे, अल्कोहोल आणि साखरमिश्रित पेयांमधील लिक्विड कॅलरीचे सेवन कमी करणे आणि जेवणाच्या वेळा नियमित असणे खूप महत्त्वाचे आहे. संशोधनातून आढळून आले आहे की, रात्री उशिरा खाल्ल्याने वजन वाढते, पचनसंस्था आणि भुकेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. आहारातील आणि जीवनशैलीतील बदल यांच्यासह सर्वसमावेशक धोरण वजन कमी करण्यात यश मिळवून देऊ शकते.

गैरसमज ४: वेगाने वजन कमी होणे चांगले असते.

वजन लवकरात लवकर कमी व्हावे असे प्रत्येक स्थूल व्यक्तीला वाटणे स्वाभाविक आहे पण त्याचे त्या व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. दर महिन्याला एक ते दीड किलोपेक्षा जास्त वजन कमी होणे हे अपुरे पोषण, पित्ताशयातील खडे आणि केटोसिस यामुळे असू शकते. खूप जास्त स्थूलपणा असेल तर एका वर्षभरात १० ते १५ किलो वजन (अतिरिक्त वजनापैकी ३० ते ५०%) कमी करता येऊ शकते आणि ते वैद्यकीय दृष्टिकोनातून शाश्वत ठरू शकते व शरीरासाठी नुकसानकारक नसते.

गैरसमज ५: वजन कमी करणाऱ्या औषधांचा शॉर्टकट

रिबेलसस ओझेम्पिक आणि वेगोवी यासारखी जीएलपी-१ रिसेप्टर अगॉनिस्ट्स वजन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. ही औषधे भुकेच्या हार्मोन्सना नियंत्रित करतात, वैद्यकीय मार्गदर्शनानुसार घेतल्यास ती बऱ्याच प्रमाणात प्रभावी ठरतात. पण त्यामुळे मळमळणे, अतिसार व काही दुर्मिळ केसेसमध्ये थायरॉईड व पॅनक्रियामध्ये बिघाड असे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेऊ नयेत. ज्यांच्यावर सर्जरी करता येत नाही पण वजनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते अशा स्थूलपणाच्या द्वितीय किंवा तृतीय श्रेणीतील व्यक्तींना ही औषधे दिली जातात.

गैरसमज ६:  फक्त सुंदर आणि सुडौल दिसण्यासाठी वजन कमी असावे.

बऱ्याच व्यक्तींना सुंदर आणि सुडौल दिसण्यासाठी वजन कमी करायचे असते. खरेतर, वजन कमी करण्याचा प्राथमिक उद्देश हा संपूर्ण आरोग्य चांगले राहावे हा असला पाहिजे. स्थूलपणामुळे मधुमेह, हायपर टेन्शन, हृदयातील रक्तवाहिन्यांचे आजार आणि निद्रानाश असे आजार उद्भवतात. वजन कमी करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना केल्यास ही पुढची गुंतागुंत टाळता येते. लग्न, मूल व्हावे अशा कारणांसाठी ५ ते १० किलो वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी आहार, व्यायाम औषधे आणि थोडा धीर या गोष्टी उपयोगी ठरू शकतात. पण जर तुमचा बीएमआय ३५ पेक्षा जास्त असेल तर सर्जिकल आणि नॉन-सर्जिकल उपचार करून घेतले पाहिजेत. 

वजन कमी करण्यासाठीचे प्रयत्न हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे असतात. प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक गरजांनुसार त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो. व्यायाम, आहार, औषधे यापैकी एकही घटक जर एकटाच वापरला गेला तर तो अयशस्वी ठरण्याची दाट शक्यता असते. तसेच फुल टाइम स्पेशालिस्ट सिस्टीम असणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुनियोजित, सुसंतुलित दृष्टिकोन वापरून तुम्ही तुमचे वजन निरोगी राखू शकाल. स्थूलपणावर लवकरात लवकर उपचार करून तब्येतीमध्ये गंभीर गुंतागुंत होणे टाळता येते. सुंदर आणि सुडौल दिसण्याबरोबरीनेच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त, आरोग्य दीर्घकाळपर्यंत चांगले राहावे यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. 

Web Title: Weight Loss : Debunking Common Weight Loss Myths That Mislead People

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.