Weight Loss Tips : रात्री 'हे' एक काम करूनही कमी करू शकता वजन, फारच सोपी आहे पद्धत!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 11:53 AM2022-02-11T11:53:58+5:302022-02-11T11:54:10+5:30
Weight Loss Tips : अनेकांना वजन कमी करण्यात यश मिळत नाही. पण प्रयत्न कधी सोडायचे नसतात. आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, तुम्ही केवळ झोपून वजन कमी करू शकता. तर....
Weight Loss Tips : अलिकडच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे जगभरातील लोकांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. हे लोक वजन कमी करण्यासाठी नको नको ते प्रयत्न करत असतात. डायटिंगपासून ते एक्सरसाइज सगळं करून देखील अनेकांना वजन कमी करण्यात यश मिळत नाही. पण प्रयत्न कधी सोडायचे नसतात. आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, तुम्ही केवळ झोपून वजन कमी करू शकता. तर यावर सहजासहजी कुणी विश्वास ठेवणार नाही. पण हे सत्य आहे.
एका रिसर्चनुसार, जे लोक रोज एक तास अधिक झोप घेतात. त्यांना वजन कमी करण्यास मदत मिळते. हा रिसर्च शिकागो यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी केला आणि त्यांनीच हा दावा केला आहे. पण इतकंच वाचून लगेच झोपायला जाऊ नका. त्याआधी पूर्ण डिटेल्स वाचा.
काय सांगतो रिसर्च?
शिकागो यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनुसार, प्रत्येक रात्री एक तासांची अधिक झोप घेतल्याने जास्त वजन असणाऱ्या लोकांना वर्षभरात जवळपास ३ किलो वजन कमी करण्यास मदत मिळते. या रिसर्चमध्ये २१ ते ४० वयोगटातील असे ८० लोक सहभागी झाले होते जे रोज ६.५ तासांपेक्षा कमी झोपत होते.
आधी स्मार्ट वॉचने त्यांच्या झोपेचा पॅटर्न चेक केला आणि त्यानंतर त्यांच्या यूरिनमधून कॅलरी सेवन ट्रॅक केलं गेलं. रिसर्चमधून आढळून आलं की, जे लोक रोज १.२ तास म्हणजे १ तास २० मिनिटांपेक्षा अधिक झोप घेतात, त्या लोकांनी २७० कमी कॅलरीचं सेवन केलं होतं.
वैज्ञानिकांनी दावा केला की, असं केल्याने एक वर्षात ४ किलोग्रॅम वजन कमी केलं जाऊ शकतं. एक्सपर्ट्सनी लठ्ठपणापासून वाचण्यासाठी आणि वेट लॉस प्रोग्राममध्ये जास्त झोप घेण्याचा सल्ला देण्यावर जोर देतात. ते असंही म्हणाले की, झोपण्याआधी स्क्रीन टाइम कमी केला तर त्याने त्यांना झोपण्यास अधिक मदत मिळते.
लेखक डॉ. एसरा तसली यांच्यानुसार, जर बराच वेळ पुरेशी झोप घेतली आणि ही सवय बऱ्याच वर्षांपर्यंत असेल तर वजन कमी होऊ शकतं. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी आपलं कॅलरी सेवन कमी करण्याच्या पद्धती शोधत आहे. पण रोज काही तासांची अधिक झोप घेतल्याने वजन कमी होऊ शकतं.
३ वर्षात किती कमी होईल वजन?
टीमला आढळलं की, ज्या लोकांनी चांगली झोप घेतली होती त्या लोकांनी झोपण्याच्या ३० मिनिटांआधी मोबाइल आणि टीव्ही पाहिला नाही. डॉ. तसली यांच्यानुसार, रिसर्चमध्ये सहभागी लोकांच्या केवळ झोपेत हेरफेर करण्यात आली होती. जर झोपेचा हाच पॅटर्न ठेवला तर जास्त झोपणारे ३ वर्षात १२ किलो वजन कमी करू शकतात.