'लठ्ठपणा सर्व आजारांचा राजा' तज्ज्ञांचं मत, जाणून घ्या वजन कमी करण्याचे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 03:36 PM2024-07-16T15:36:40+5:302024-07-16T15:40:03+5:30
आजकाल कमी वयामध्ये वजन वाढणं ही गंभीर समस्या बनत चालली आहे.
Weight Loss Tips : आजकाल कमी वयामध्ये वजन वाढणं ही गंभीर समस्या बनत चालली आहे. वाढत्या वजनामुळे नागरिकांमध्ये लठ्ठपणा येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जागतिक आरोग्य संस्थेने लठ्ठपणा हा आजार असल्याचे घोषित केले आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांनी 'लठ्ठपणा' हा सर्व आजारांचा राजा आहे, असं म्हटलं आहे. बदलती जीवनशैली तसेच व्यायामाचा अभाव ही लठ्ठपणाची प्रमुख कारणे आहेत. जिममध्ये वर्कआऊट केलं किंवा डायटिंग करूनही वजन वाढीच्या प्रमुख लक्षणांकडे अनेकांचं दूर्लक्ष होतं.
शारीरिक हालचालींची कमतरता, एकाच जागी ठाम बसून राहणे किंवा योग-ध्यान आणि व्यायाम न करणे त्याबरोबरच जंक फूडचे अधिक सेवन यांमुळे वजन वाढते. त्यासाठी वाढतं वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणं गरजेचं आहे. असं केल्याने अगदी सहजपणे तुमचं वजन नियंत्रणात राहू शकतं.
आरोग्य तज्ज्ञांनुसार, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वजन वाढीची समस्या उद्भवू शकते. ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ साऊथैम्पटन यांच्या रिपोर्टनुसार जे लोक अगदी घाई-घाईने जेवण करतात त्यांच्या वजनात लवकर वाढ होते. तसेच जे लोक जेवताना एक-एक घास चावून खातात त्यांच्या शरीरामध्ये वजन वाढीची संभावना ४२ टक्के कमी होऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी फॉलो करा या टिप्स-
१) हर्बल टी-
वेट लॉस करण्यासाठी सकाळच्या वेळेस दुधाच्या चहा ऐवजी तुळस, अदरक तसेच काळी मिरी आणि गुळ इलायची मिश्रित 'हर्बल टी'चे सेवन करावं. यामुळे तणाव कमी होऊन मुडही फ्रेश राहतो.
२) प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट-
वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यासाठी ब्रेकफास्टमध्ये डोसा, मुगडाळ, बेसन आदी एक ग्लास दुधात मिक्स करून त्याचं सेवन केलेलं चांगलं ठरतं.
३) लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी जैविक घडीचे अनुसरण करा. सकाळी लवकर उठणे व रात्री लवकर झोपल्याने हार्मोन्स नियंत्रणात राहतात. त्यामुळे चयापचयाच्या क्रिया चांगल्या राहतात. या सर्व गोष्टींचे व्यवस्थित अनुसरण केल्यास निश्चित वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल व आपले आरोग्य चांगले राहण्यास उपयोगी ठरेल.
हे खाणे टाळा-
तेलकट, खारवलेले पदार्थ, रेडी टू इट, बेकरी पदार्थ, कोल्ड्रिंक्स, आइस्क्रीम, मद्यपान हे टाळावे.