Weight Loss: पहले पेट, फिर वेट! वजन कमी करायचं असेल तर आधी 'पोटाचा प्रश्न' सोडवा, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 11:25 AM2022-08-25T11:25:05+5:302022-08-25T12:11:37+5:30

प्रत्येकाचं वय, उंची आणि सध्याचं वजन, पोटाचा घेर यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. वजन कमी करताना किती किलो वजन कमी झालं की त्यासोबत पोटाचा घेर किती कमी व्हावा हे पण प्लॅन करावं लागतं.

Weight Loss: what is the connection between belly fat and reducing weight | Weight Loss: पहले पेट, फिर वेट! वजन कमी करायचं असेल तर आधी 'पोटाचा प्रश्न' सोडवा, कारण...

Weight Loss: पहले पेट, फिर वेट! वजन कमी करायचं असेल तर आधी 'पोटाचा प्रश्न' सोडवा, कारण...

googlenewsNext

>>  डॉ. नितीन पाटणकर एम्. डी. (मेडिसीन), विस्डम क्लिनिक्स 

ईव्हने ऍडमला प्रश्न विचारला, "माझं वजन मी कमी केलं. चांगलं दहा किलो. पण ते परत वाढलं. मी पुन्हा वजन कमी करीन, पण ते पुन्हा वाढू नये म्हणून काय करायला हवं ते तू शोधून काढ". तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या काळात या प्रश्नाने अनेकांना छळलं आहे. याचे उत्तर सापडले असे कदाचित म्हणता येईल. 

वजनाचा आणि पोटाच्या घेराचा जवळचा संबंध आहे. अशी एक गैरसमजूत आहे की, ज्याचे वजन वाढले, त्याचा मेटाबॉलिक रेट कमी असतो. खरे तर, जितके वजन जास्त, तितका मेटाबॉलिक रेट जास्त असतो. जसे वजन वाढते तसे एकूण वस्तुमान वाढते. त्याला जिवंत ठेवण्यासाठी जास्त ऊर्जा जाळली जाते. म्हणून वाढत्या वजनासोबत मेटॅबॉलिक रेट वाढतो. वजनासोबत पुरेशा प्रमाणात मेटाबॉलिक रेट वाढत नाही, हा प्रॉब्लेम असतो. निसर्गाचं एक विचित्र त्रयराशिक असतं. ज्या अर्थी वजन वाढू दिलं जात आहे, त्या अर्थी जास्त ऊर्जेची गरज आहे. भविष्यात जास्त ऊर्जा लागणार आहे. म्हणून कमी ऊर्जा वापरायला हवी. या तर्कशास्त्राप्रमाणे निसर्ग मेटाबॉलिक रेट कमी करतो. वजन वाढताना एकाच वेळेस मेटाबॉलिक रेट वाढविण्याचे आणि कमी करण्याचे प्रयत्न चालू असतात. या चढाओढीत मेटाबोलिक रेट वाढतो पण पुरेसा वाढत नाही. 

या चढाओढीत पोटाचा घेर हा यंत्रातील 'फ्लाय व्हील'सारखं काम करतो. मेटाबॉलिक रेट किती हवा, हे पोटाच्या घेराच्या बदलातील प्रमाणावर शरीर ठरवतं. हे प्रमाण व्यस्त स्वरूपात असतं. जर वजन कमी झालं, पण पोटाचा घेर कमी झाला नाही, तर मेटाबॉलिक रेट अजून कमी होतो. त्यामुळे वजन कमी करण्याचे किंवा वजन कमी ठेवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात. पुन्हा वजन वाढतं. बऱ्याचदा ते सुरुवात केली त्यापेक्षा जास्त वाढतं. 

प्रत्येकाचं वय, उंची आणि सध्याचं वजन, पोटाचा घेर यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. वजन कमी करताना किती किलो वजन कमी झालं की त्यासोबत पोटाचा घेर किती कमी व्हावा हे पण प्लॅन करावं लागतं. तरच 'लॉन्ग टर्म' फायदे होतात. बरेचदा लोक वजन घटवतात पण पोट विसरतात.

एक छोटं उदाहरण घेऊ. सरिता. वय ५९. उंची १५२ सेमी. वजन ७० किलो आणि पोटाचा घेर १०२ सेमी. तिच्या शरीरातील फॅट आणि मसल यांचे प्रमाण मोजले आणि तिचा मेटाबॉलिक रेट मोजला तो आला ११८२ कॅलरीज. तिने वजन कमी केले ६७ किलो पर्यंत. पोटाचा घेर तितकाच राहिला. पुन्हा सर्व गणिते केली तर मेटाबोलिक रेट आला ११४३. ११८२ ते ११४३ हा फरक फार मोठा नसला तरी आज सरिताने एक कप चहा जरी घेतला तरी तो एक्स्ट्रा होणार. पुढे तिचे वजन झाले ६५ आणि पोटाचा घेर झाला १००. पाच किलो वजन कमी केले आणि पोटाचा घेर २ सेमी ने कमी केला, तेव्हा मेटाबॉलिक रेट होता ११२४. इथून तिला कंटाळा यायला सुरुवात झाली. पुन्हा वजन वाढले. 

पुढच्या वेळेस आम्ही प्लॅन बदलला. पोटाच्या घेरावर जास्त लक्ष केंद्रित केलं. पोटाच्या घेराचं टार्गेट गाठल्याशिवाय वजन उतरविण्याची घाई करायची नाही. आज तिचे वजन आहे ६५ आणि तिचा पोटाचा घेर आहे ८८ सेमी. आता ती सामान्य आहाराचे नियम पाळून आणि साधासा व्यायाम करून ६५ किलोवर टिकून आहे. आठ महिने झाले तरी वजन वाढलेलं नाही. 

पापी पेट का सवाल है, हे इथेही खरे ठरते हे नक्की!

Web Title: Weight Loss: what is the connection between belly fat and reducing weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.