कोणत्या कारणांनी किडनीवर येते सूज? जाणून घ्या कारणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 12:03 PM2018-12-31T12:03:48+5:302018-12-31T12:04:21+5:30

किडनीवर सूज येण्याला मेडिकल भाषेत 'ग्लोमेरुलोनेफ्रायटिस' असं म्हटलं जातं. किडनीवर सूज आल्याने किडनीच्या फिल्टरवर सूज येते.

What are the causes a swollen kidney | कोणत्या कारणांनी किडनीवर येते सूज? जाणून घ्या कारणे 

कोणत्या कारणांनी किडनीवर येते सूज? जाणून घ्या कारणे 

googlenewsNext

मनुष्याच्या शरीरात दोन किडनी असतात. एक डावीकडे आणि एक उजवीकडे. किडनीची प्रमुख कार्ये शरीरात निर्माण होणाऱ्या अनावश्यक विषारी पदार्थांना मूत्राशयाद्वारे बाहेर टाकणे, शरीरासाठी आवश्यक पाण्याची मात्र कायम ठेवणे, अधिक जमा झालेले पाणी मूत्राद्वारे बाहेर काढून टाकणे, तसेच किडनी शरीरात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फ रस, बायकार्बोनेट वगैरेचे प्रमाण यथायोग्य ठेवण्याचे कार्य करते. पण काही वेगवेगळ्या कारणांमुळे किडनीवर सूज येते. 

किडनीवर सूज येण्याला मेडिकल भाषेत 'ग्लोमेरुलोनेफ्रायटिस' असं म्हटलं जातं. किडनीवर सूज आल्याने किडनीच्या फिल्टरवर सूज येते. किडनीचं फिल्टर हे फार छोच्या छोच्या रक्तवाहिन्यांपासून तयार झालेलं असतं, याला ग्लोमेरुली असं म्हटलं जातं. 

जेव्हा ही सूज अचानक येते आणि वाढत जाते तेव्हा समस्या गंभीर होऊ शकते. त्यामुळे किडनीवर आलेल्या सूजेवर दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. पण किडनीवर सूज आल्याची लक्षणे तुमच्या वेळीच लक्षात यायला हवी. जेणेकरुन त्यावर वेळीच उपाय करता यावे. 

किडनीवर सूज आल्याची लक्षणे

किडनीवर सूज आल्याची लक्षणे पुढीलप्रमाणे सांगता येतील. सतत ताप येणे, लघवी करताना वेदना होणे, लाल रंगाची लघवी येणे, असह्य वेदना होणे, कमी लघवी येणे, जास्त थकवा जाणवणे, श्वासाची दुर्गंधी येणे ही प्रमुख लक्षणे आहेत. 

किडनीवर सूज आल्याने काय होतं?

किडनीवर सूज किंवा नेफ्रायटिस एक अशी स्थिती आहे ज्यात किडनीच्या मुख्य भागावर सूज येते. याला नेफ्रोन म्हटलं जातं. याने शरीरातील रक्त शुद्ध करण्याची क्षमता कमी होते. 

का येते किडनीवर सूज?

संक्रमणामुळे

घशात खवखव होणे किंवा त्वचेवर कोणत्या प्रकारचं संक्रमण झालं आणि त्यावर वेळीच उपचार न घेतल्याने किडनीवर सूज येते. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये संक्रमण ठीक होतं आणि किडनीमध्येही सुधारणा होते. पण किडनीच्या वेगवेगळ्या समस्यांचा प्रभाव ग्लोमेरुलसवर पडतो. जसे की, लघवी करताना त्रास होणे आणि किडनीची रक्त शुद्ध करण्याची क्षमता कमी होणे. 

मधुमेह ग्रस्तांना असतो धोका

मधुमेह, ल्यूपस आणि एएनसीए वस्कुल्टिससारख्या काही ऑटो इम्यून आजारांनी ग्रस्त लोकांना सेकंडरी ग्लोमेरुलोनेफ्रायटिस म्हणजे किडनीवर सूज येणे ही समस्या होऊ शकते. अशावेळी वेळीच उपचार केले गेले तर किडनी वाचवली जाऊ शकते. 

अॅंटी-बायोटिक औषधांमुळे

अनेकजण वेगवेगळ्या त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी एंटीबायोटिक औषधांचं सेवन करतात. पण याचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन करणं महागात पडू शकतं. या औषधांच्या अधिक सेवनामुळे किडनीवर सूज येण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे ही औषधे घेण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. अशात लघवीतून रक्त येत असल्याचे किंवा लाल लघवी होत असेल तर जराही वेळ न घालवता डॉक्टरांना भेटा. 

Web Title: What are the causes a swollen kidney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.