सावधान... हे 'अदृश्य' मीठ धोक्याचं, दोन हात लांबच राहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:29 PM2018-10-03T13:29:41+5:302018-10-03T13:32:01+5:30

रोजचा संतुलित आहार घेतला तर आवश्यक मात्रेमध्ये मीठ मिळतं. मग हे जास्तीचं मीठ येतं कुठून? त्याचे दुष्परिणाम काय?

What are the long term effects of too much sodium? | सावधान... हे 'अदृश्य' मीठ धोक्याचं, दोन हात लांबच राहा!

सावधान... हे 'अदृश्य' मीठ धोक्याचं, दोन हात लांबच राहा!

Next

डॉ. नेहा पाटणकर

'आई गं, भूक लागलीय. काहीतरी चटपटीत खायला दे ना!' हे वाक्य तिसऱ्यांदा ऐकून अनु आर्यनवर डाफरली. 'सारखं काय चटपटीत खायला हवं असतं रे तुला? तुझी आवडती भाजी आणि आमटी केली आहे ते जेवून घे!', असं तिनं जरा ओरडूनच सांगितलं. त्यावर आर्यननं भोकाड पसरलं. 'तू मला मॉलमध्ये पण नेत नाहीस आणि घरी पण चमचमीत बनवत नाहीस', असं तो तणतणत होता. 

हल्ली घराघरात हा प्रसंग पाहायला मिळतो. ही छोटी मुलं असोत, टीनेजर्स असोत किंवा मोठी माणसं; या सगळ्यांची जीभ या मिठामुळे येणाऱ्या चटपटीत चवीला चटावली आहे. जेवणाच्या पदार्थांमध्ये मीठ चवीपुरतं असावं असा पाकशास्त्राचा नियम आहे. पण आजच्या घडीला हेच प्रमाण प्रमाणाबाहेर जाताना दिसत आहे. मग प्रश्न असा आहे की, आपल्या शरीराला नक्की किती सोडियमची गरज असते? सोडियम ज्याला आपण मीठ म्हणू या; त्याची सुयोग्य पातळी राखणे ही तारेवरची कसरत असते. रक्तातली पातळी कमी होणे ही एक मेडिकल इमर्जन्सी असते. दिवसभरात 2300mg म्हणजे साधारण 1 टीस्पून (चहाचा चमचा) एवढं मीठ आपल्या शरीराला आवश्यक असतं. शरीरातल्या अत्यंत महत्त्वाच्या क्रियांमध्ये याची गरज असते. उदा. पाण्याचं संतुलन राखणे, यकृत, मूत्रपिंड, हृदय, मज्जासंस्था आणि स्नायूंच्या चलनवलनाची प्रक्रिया सांभाळणे इ.इ.
 
रोजचा संतुलित आहार घेतला तर आवश्यक मात्रेमध्ये मीठ मिळतं. मग हे जास्तीचं मीठ येतं कुठून? त्याचे दुष्परिणाम काय?

जगभरात याच्यावर खूप संशोधन चाललेलं आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या एका शोधचाचणीमध्ये असं दिसलं की त्यांच्या आहारातल्या जास्त मिठाच्या प्रमाणामुळे "चाइल्डहूड ओबेसिटी"चं प्रमाण वाढताना दिसत आहे. अंतराळवीरांवर केलेल्या एका संशोधनाचा असा निष्कर्ष आला की जेव्हा मिठाचं प्रमाण जास्त असलेलं खाल्लं तेव्हा भूक जास्त वाढते. हा प्रकार आपल्याला नेहमी दिसतो. चीझ घातलेला पिझ्झा, चायनीज पदार्थ खात जावे तशी भूक कमी न होता वाढतच जाते. नेहमीपेक्षा चार घास जास्तच जातात. हे वारंवार खात राहिलं की मग इतर पदार्थ सपक आणि बेचव वाटू लागतात. मग प्रत्येक वेळी असेच पदार्थ खाण्याची इच्छा होते. जसं आपण मगाशी आर्यनच्या उदाहरणात बघितलं. पॉपकॉर्न, बटाटा वेफर्स ह्या पदार्थांना "trigger foods" म्हणतात. एकदा खायला सुरू केलं की ह्यांचं automatic eating किंवा binge eating होतं. हा अनुभव तर आपल्या सर्वांना येतो. वेफर्सचं पाकीट उघडलं की त्याचा तळाला असलेला चुरा हाताला लागेपर्यंत तो हातातून कोणालाच सोडवत नाही.

हे वेफर्स खाताना मज्जा येत असली, तरी कालांतराने याचे दुष्परिणाम हृदय, किडनीवर दिसू लागतात. ब्लड प्रेशर वाढणे, अंगावर - हातापायावर डोळ्याखाली सूज येणे,सतत डोकं दुखत राहणे, हाडं ठिसूळ होणे या तक्रारी चालू होतात. आपण रोज अतिशय सहजतेने मीठ जास्त प्रमाणात असलेले पदार्थ खात असतो. उदा. ब्रेड, बिस्कीट, चीझ, टोमॅटो सॉस, चिली, सोया सॉस, पापड, लोणची, रेडिमेड ,पॅकेज्ड पदार्थ, खारवलेले मासे, टिनमध्ये पॅक केलेले पदार्थ, फ्रुट ज्युसेस, सूप्स, नूडल्स इत्यादी

हेल्थ कॉन्शस मंडळी 'हेल्दी' म्हणून जे पदार्थ विकत घेतात, त्यातल्या काहींची लेबल्स बारकाईने वाचली तर त्यातलं मिठाचं प्रमाण नुसतं पाहूनच बीपी वाढेल. निरनिराळी सॅलड ड्रेसिंग्स, बेक केलेली लो फॅट्स बिस्किटं आणि चिप्समध्ये बरंच मीठ असतं. साधारण 140mg एवढं प्रमाण चालू शकतं. तेव्हा सामान विकत घेताना त्याचे nutritional facts नक्की वाचायला हवेत. गंमत म्हणजे डाएट सोडा किंवा डाएट कोकमध्ये मिठाचं अव्वाच्या सव्वा प्रमाण बघितलं तर ते हेल्दी कसं काय असा प्रश्न पडतो. हेल्दी म्हणून डोळे मिटून प्यायल्याने यामधले "hidden salts" दिसत नाहीत. 

आता वेळ सगळ्यांनीच डोळे उघडण्याची आली आहे. पॅकेज्ड पदार्थ काय किंवा घरातली पापड, लोणची काय; मिठावर हात आखडता घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. अगदी लहान वयामध्ये आढळणारे हार्ट अटॅक आणि हाय ब्लड प्रेशरचं वाढतं प्रमाण हे त्या दुष्परिणामाचेच द्योतक आहे.

Web Title: What are the long term effects of too much sodium?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.