ऐन दिवाळीत मानदुखीने आहात हैराण?; जाणून घ्या कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 02:37 PM2019-10-23T14:37:00+5:302019-10-23T14:51:42+5:30

'मान' या अवयवाला शरीरात 'मान' असण्याचं कारण डोक्यासारखा महत्वाचा अवयव तोलून धरतो हेच असायला हवं. डोकं, खांदे आणि पाठ यांना जोडणारा हा अवयव.

What are the possible causes of neck pain? | ऐन दिवाळीत मानदुखीने आहात हैराण?; जाणून घ्या कारणं

ऐन दिवाळीत मानदुखीने आहात हैराण?; जाणून घ्या कारणं

Next

- डॉ. नेहा पाटणकर 

'मान' या अवयवाला शरीरात 'मान' असण्याचं कारण डोक्यासारखा महत्वाचा अवयव तोलून धरतो हेच असायला हवं. डोकं, खांदे आणि पाठ यांना जोडणारा हा अवयव. समोरच्या बाजूला थायरॉईड, पॅराथायरॉइड, व्हॉईस बॉक्स अशा दिग्गज बाबींना संरक्षण देण्याचं काम आणि मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची काळजी घेणे, हे काम मान चोख बजावत असते. या स्नायूंची आणि मानेच्या कण्याची (cervical vertebrae) खूप झीज हे व्हर्टिगो (vertigo)/चक्कर येणे याचं एक कारण असू शकतं.

अत्यंत लवचिक सर्व दिशांनी हलणाऱ्या मानेच्या स्नायूंची एकमेकांमध्ये अचूक गुंफण होत त्याची हालचाल होत असते. कवटीच्या खालच्या भागापासून सुरू होऊन थेट पाठीच्या खालच्या भागापर्यंत हे स्नायू पसरलेले असतात. नेहमीच आपली कामगिरी विनासायास निमूटपणे करणारे स्नायू मात्र काही काहीवेळा आपली दखल घ्यायला लावतात.

काल माझ्याकडे आलेल्या सुरुचीच्या कर्मकहाणीनंतर या स्नायूंकरता दिवाळीच्या आधीचे काही दिवस फारच वाईट असा निष्कर्ष माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा काढाल. सुरुची आली तेव्हा तिची मान तिला हलवतात येत नव्हती. फक्त उजव्या बाजूच्या गोष्टी तिला दिसू शकत होत्या. थोडीशी जरी मान डावीकडे घ्यायचा प्रयत्न केला की प्रचंड दुखायला लागायचं आणि मग चक्कर यायला सुरुवात व्हायची.

सुरुचीच्या मोठ्या मुलीची परीक्षा आणि धाकट्या मुलाची शाळेची सुट्टी एकाच वेळेस आली. त्यात दिवाळीची साफसफाई करायचं तिनी फारच मनावर घेतलं. कामवाल्या बाईचा नेहमीप्रमाणे काही ठिकाणी हात पोचत नव्हता. त्यामुळे "कमी तिथे मी" असं म्हणत झाडू हातात घेऊन भिंतीच्या वरच्या कोपऱ्यातली जाळी काढण्याचे काम तिने चालू केलं.

तेव्हाच थोडी थोडी मान दुखायला लागलीच होती. अगदी थोड्या चकल्या आणि चिरोटे करायचे तिने ठरवले होते. पण मुलाची खास फर्माईश म्हणून बेसनाचे लाडूही करण्याची हौस तिला भारी पडली. मानेच्या आणि भरीस भर म्हणून पाठीच्या वरच्या भागातही दुखायला चालू झालं होतं.

सोसायटीच्या दिवाळी पार्टीमध्ये सगळ्या बायकांचा डान्स ठरवलेला असताना सुरुची त्यात भाग घेणार नाही असं शक्यच नव्हतं. कोरिओग्राफरनी सांगितल्याप्रमाणे स्टेप्सची प्रॅक्टिस चालू होती आणि सुरुचीची मानेनी असहकार पुकारला......

मानेच्या आणि खांद्यांच्या स्नायूंचा वापर या दिवसांत आपोआपच जास्त प्रमाणात होतो. दिवाळी यायच्या आधी हातातली सगळी कामं संपवण्याच्या घाईत आपण असतो. दिवाळीसाठी घराची साफसफाई करण्यासाठी हे सगळे स्नायू आणि आपले मानेचे, खांद्याचे सांधे आणि पाठीच्या कण्याचा वरचा भाग खूपच जास्त प्रमाणात वापरला जातो.

विशेषतः स्त्रियांमध्ये दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी दिवस दिवस उभं राहून तळणे, भाजणे, लाटणे, ढवळणे या सगळ्या क्रियांमुळे मानेच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण येतो. मुलांच्या सुट्ट्या आणि पाहुणे मंडळी कामं वाढवतातच. अति आणि चुकीच्या पद्धतीने वापर झाल्यामुळे स्नायूंना इजा पोचू शकते.

ऑफिसेस मध्ये कामाच्या डेडलाइन सांभाळणे यात आपले शरीराचे कुठले भाग जास्त त्रास सहन करतात हे उघडच आहे. ज्यांचे आऊट ऑफ इंडिया क्लाएन्ट्स असतील त्यांची तर काम फारच आहे, अशी तक्रार असते. कारण या लोकांना त्यांच्या ख्रिसमसच्या आधी कामं उरकायची असतात. एकूणच या धामधूमीत बिचाऱ्या मानेवर किती अत्याचार करतो आहे हे लक्षातच येत नाही.

सततच्या वापरामुळे किंवा एकाच स्थितीमध्ये खूप वेळ राहिल्यामुळे स्नायूंवर सूज येते आणि तो स्नायू आखडून जातो. कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी यांची कमतरता असेल तर तपासण्या करून त्यानुसार प्रदीर्घ उपचार घ्यायला हवे. पोटाचे स्नायू बळकट नसतील आणि पोट सुटलेलं असल्यामुळे पुढच्या बाजूला ताण येतो आणि मग पाठीच्या कण्याचं 'normal curvature' बदलतं आणि मग त्याचा परिणाम म्हणून मानेवरचा ताण वाढतो.

हे सगळं टाळायचं असेल तर स्नायूंची लवचिकता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कुठलीही अॅक्शन करताना स्नायूवर ताण न देता त्याची हालचाल होणं आवश्यक आहे. सतत स्क्रीनवर आणि नंतर खाली बघणे. टायपिंग करताना कोपर आणि हात यांना खालून आधार आहे का ते बघणं, खूप कॉन्सट्रेशन ठेवून स्क्रीनकडे बघत असताना आपोआपच मान आणि खांदे पुढे जायला चालू होतं. गृहिणींनीसुद्धा गॅसची शेगडी, ओटा, भांडी धुण्याचे सिंक यांची उंची आपल्याला त्रासदायक तर नाही ना हे बघायला पाहिजे. कारण चुकीच्या पध्दतीने हाताच्या आणि मानेच्या हालचाली केल्यामुळे स्नायू आणि सांध्यांची झीज होते.

आजच्या संगणक आणि मोबाईल युगामध्ये एसी ऑफिसेस, संगणकाच्या स्क्रीनसमोर 10-12 तास बसणे, रस्त्यांच्या खाचखळग्यातून/ट्रेनमधून गचके खात अनेक तास प्रवास या सगळ्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरातल्या स्नायू, हाडं आणि सांध्यांवर नक्कीच होतो.

 

Web Title: What are the possible causes of neck pain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.