कोलेस्ट्रॉल शरीरात कशामुळे वाढतं? जाणून घ्या लक्षणं...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 12:51 PM2024-07-11T12:51:49+5:302024-07-11T12:52:44+5:30
Cause of high Cholesterol : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरात इस्केमिक हार्ट डिजीज आणि स्ट्रोकचं एक मोठं कारण कोलेस्ट्रॉल वाढणं आहे.
Cause of high Cholesterol : आजकाल लोक टेस्टच्या नादात असं काही खाऊ लागले आहेत की, हळूहळू त्यांचं आरोग्यही बिघडत आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे निर्माण होणारी गंभीर आणि जीवघेणी समस्या म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणं. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं की, हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो.
बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या नुकसानाबाबत सांगायचं तर याने हार्ट डिजीज आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरात इस्केमिक हार्ट डिजीज आणि स्ट्रोकचं एक मोठं कारण कोलेस्ट्रॉल वाढणं आहे.
हार्वर्ड मेडिकल स्कूलनुसार, जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयासंबंधी रोगांचा धोका कमी करायचा असेल तर तुम्ही रेड मीट, तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड मीट आणि बेक्ड पदार्थांचं सेवन कमी करावं लागेल. आश्चर्याची बाब म्हणजे लोक माहीत असून सुद्धा हे पदार्थ आवडीने खातात.
कशाने वाढतं कोलेस्ट्रॉल?
रेड मीट
रेड मीटला नेहमीच कोलेस्ट्रॉलसाठी धोकादायक मानलं जातं. हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांना नेहमीच रेड मीट न खाण्याचा सल्ला दिला जातो. एक्सपर्ट सांगतात की, तुम्ही मांस खाणं पूर्णपणे टाळलं पाहिजे. प्रोटीनसाठी त्याऐवजी तुम्ही दुसरे पदार्थ खाऊ शकता.
प्रोसेस्ड मीट
एक्सपर्ट कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांना प्रोसेस्ड फूड न खाण्याचाही सल्ला देतात. प्रोसेस्ड मीटमध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे समस्या अधिक वाढू शकते.
रक्तात कोलेस्ट्रॉल वाढवतात बेक्ड फूड
अनेक लोकांसाठी कुकीज आणि पेस्ट्री सर्वात स्वादिष्ट पदार्थ असतील. अनेकजण नाश्त्यात हे पदार्थ नियमितपणे खात असतील. एक्सपर्ट्सनी इशारा दिला आहे की, लोणी, शॉर्टिंग आणि शुगरचं अधिक प्रमाणात सेवन करणं मानवी शरीरासाठी चांगलं नाही. जर तुम्ही आधीच कोलेस्ट्रॉलचे रूग्ण असाल तर तुम्ही हे पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजे.
फ्राइड फूड
बऱ्याच लोकांना कुरकुरीत तळलेले पदार्थ खाणं खूप आवडतं. तज्ज्ञांनी तळलेल्या पदार्थांबाबत इशारा दिला आहे. एक्सपर्ट सांगतात की, डीप फ्राय केल्याने पदार्थातील उर्जा घनत्व आणि कॅलरीचं प्रमाण वाढतं. तज्ज्ञ पदार्थ तळण्यासाठी एअर फ्रायर किंवा चांगलं तेल वापरण्याचा सल्ला देतात.
कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं
हाता-पायांना झिणझिण्या
कोलेस्ट्रॉल शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतं त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढल्यावर नेहमी शरीरातील अंगांपर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचत नाही. याकारणाने हाता-पायांना मुंग्या येणे, झिणझिण्या येणे अशा समस्या होतात. अनेकदा एकाच जागेवर फार जास्त वेळ बसल्यानेही हाता-पायांना झिणझिण्या येतात. पण केवळ एकाच जागेवर न बसताही तुम्हाला असे होत असेलतर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं असं समजा. त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल वेळीच तपासूण घ्यावे.
डोकेदुखी
जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल किंवा डोकं हलकं वाटत असेल तर वेळी सावध व्हा. कारण हे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. कोलेस्ट्रॉल वाढल्यावर डोक्यातील नसांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे ही समस्या होते. याच कारणाने डोकेदुखी आणि चक्कर येणे अशा समस्या होतात.
दम लागणे
जर थोडं काम केल्यानंतर किंवा मेहनत केल्यानंतर श्वास भरून येत असेल तर हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत असू शकतो. श्वास भरुन येणे किंवा थकवा जाणवण्याची अनेक कारणे असू शकतात. पण असे होत असेल तर तुम्ही कोलेस्ट्रॉल तपासून घेणे गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्या कारणाने जास्त काम न करताही थकवा जाणवतो. खासकरुन जाड लोकांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते.
लठ्ठपणा
जर तुम्हाला वाटतं असेल की विनाकारण तुमचं वजन वाढलं आहे, तर हे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा संकेत असू शकतो. त्यासोबतच तुम्हाला पोटात जड वाटत असेल किंवा नेहमीपेक्षा जास्त घाम येत असेल तर आणि गरमी होत असल तर कोलेस्ट्रॉल तपासून घ्यावा.
छातीत दुखणे आणि अस्वस्थता
कोलेस्ट्रॉल वाढल्याने मुख्य रुपाने हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे जर तुम्हाला छातीत वेदना होते असेल, अस्वस्थ वाटत असेल किंवा हृदयाचे ठोके प्रमाणापेक्षा जास्त होत असतील हा कोलेस्ट्रॉल वाढण्याचा संकेत असू शकतो. याकडे दुर्लक्ष करणे जीवघेणं ठरु शकतं. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.
(टिप - वरील लेख हा सामान्य माहितीवर आधारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. याकडे कोणताही उपाय म्हणून बघू नका. काही समस्या असेल तर आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)