कमी वजनाचे बाळ जन्माला का येते?; त्यांची अधिक काळजी का घ्यावी लागते?... जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 12:06 PM2022-12-02T12:06:40+5:302022-12-02T12:06:49+5:30
उच्च रक्तदाबासारखी सामान्य; पण घटक समस्यासुद्धा बाळाचे वजन कमी करण्यास कारणीभूत ठरू शकते. मात्र, अशा स्थितीत घाबरून जाण्याचे कारण नाही.
मुंबई : बाळाच्या वजनात होणाऱ्या वाढीची तुलना कुठल्याही बाळाच्या वजनात होणाऱ्या वाढीशी न करता त्याच्या मूळ वजनाशी करणे आवश्यक असते, हे लक्षात घ्यायला हवे. बाळाचे वजन प्रत्येक महिन्यात वाढणे आवश्यक असले तरी ही वाढ प्रत्येकात सारखीच असेल असे नाही. मात्र, याची नेमकी कारणे शोधून याविषयी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
कमी वजनाची कारणे
आईच्या पोटात एकापेक्षा जास्त बाळं असतील तर बाळांचे वजन जन्मतः कमी असण्याची शक्यता असते. याशिवाय, गर्भवती मातेचे पोषणाकडे झालेले दुर्लक्ष, बाळाचा जन्म ३७ आठवड्यांपूर्वीच होणे, प्लेसेन्टा प्रिबिया किंवा 'प्रिक्लेम्पसिया सारख्या गरोदरपणात प्लेसेंटाशी संबंधित समस्या, आईला उच्च रक्तदाबाचा त्रास, गर्भाशयाच्या काही विकृती, गरोदरपणातील औषधे, मद्यपान, धूम्रपानामुळे गर्भाला विस्कळीत होणारा ऑक्सिजनचा पुरवठा, गर्भाची उशिरा वाढ, गरोदरपणात विविध प्रकारचे संक्रमण, आईला मधुमेह आदी प्रकरणांमध्ये बाळ कमी वजनाचे होऊ शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
सहव्याधी असेल तर....
उच्च रक्तदाबासारखी सामान्य; पण घटक समस्यासुद्धा बाळाचे वजन कमी करण्यास कारणीभूत ठरू शकते. जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी होते. त्यामुळेच उच्च रक्तदाब असणाऱ्या स्त्रीला डॉक्टर गरोदरपणात जास्त काळजी घ्यायला सांगतात आणि अशा स्त्रियांना बाळाचे वजन कमी असू शकते याची पूर्व सूचनासुद्धा देतात. मात्र, अशा स्थितीत घाबरून जाण्याचे कारण नाही.
जंतुसंसर्गाचा धोका अधिक
कमी वजन असल्याने बाळाची प्रतिकारशक्ती कमी असते. यामुळे जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो. अवयवांच्या अपरिपक्यतेमुळे कावीळचाही धोका असतो. कमी दिवसाचे व कमी वजनाच्या बाळांमुळे फुप्फुस परिपक्व होण्यासाठी लागणारा 'सरफॅक्टंट' नावाचा घटक कमी प्रमाणात तयार होतो, त्यामुळे बाळाला श्वास घेण्यासाठी त्रास होतो. परिणामी, फुप्फुसांचा आजार होतो.
आहाराकडेही द्या गांभीर्याने लक्ष
बाळाचे वजन कमी भरण्यामागे आईने घेतलेला अपुरा पौष्टिक आहार कारणीभूत असू शकतो. अशा वेळी बाळाच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण झालेला असतो. त्यामुळेच स्त्रीने गरोदरपणात स्वतःसाठी नाही तर किमान बाळासाठी चांगला आहार घ्यावा आणि दोघांची प्रकृती उत्तम राखावी.
- डॉ. रेवती शहा. स्त्रीरोगतज्ज्ञ