घोरणाऱ्यांनो, वेळीच सावध व्हा; बीपी, शुगरची समस्या रोखण्यासाठी 'अशी' काळजी घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 12:34 IST2022-12-27T12:33:47+5:302022-12-27T12:34:06+5:30
घोरणे म्हणजे झोपेत जीभ, टाळू आणि पडजीभ स्नायू सैल पडल्याने हवेच्या मार्गातील कंपनाने होणारा आवाज आहे.

घोरणाऱ्यांनो, वेळीच सावध व्हा; बीपी, शुगरची समस्या रोखण्यासाठी 'अशी' काळजी घ्या!
घोरण्याच्या क्रियेचा कुटुंबातील इतरांना जाच वाटत असला तरी मला त्याचा कोणताही त्रास नसल्याचे सांगत त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. ज्या व्यक्ती रात्री घोरतात त्यांना रक्तदाब अर्थात बीपी आणि मधुमेह अर्थात ब्लड शुगर वाढीच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
घोरणे नेमके काय?
घोरणे म्हणजे झोपेत जीभ, टाळू आणि पडजीभ स्नायू सैल पडल्याने हवेच्या मार्गातील कंपनाने होणारा आवाज आहे. मात्र, हा हवेच्या मार्गाात अडथळा असल्याने झोपेत शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच त्याचे वैद्यकीय महत्त्व असून ते पुढील अनारोग्याची नांदी ठरू शकते.
घोरण्याची कारणे काय?
घोरणे हे काही अंशी आनुवंशिक असू शकते. मात्र, लठ्ठपणा, मधुमेह, धुम्रपान, मद्यपान, मान जाड असणे, गरोदरपणा, उतारवय, नाकातील मार्गामध्ये अडथळा, थायरॉईड संप्रेरकांची कमतरता अशी निरनिराळी कारणे यामागे असतात. वयानुसार स्नायूंमध्ये ढिलाई येत असल्याने घोरणे सुरू होते.
...तर बीपी, हृदरोग, शुगरची शक्यता वाढते
अनेक आजारांना वावः घोरण्याची क्रिया वर्षानुवर्षं सुरूच राहिल्यास त्यामुळे ब्रेन स्ट्रोक, हृदयविकारासारखे गंभीर तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारखे जीवनशैलीशी निगडित आजारदेखील होण्याचा धोका वाढतो.
ही घ्या काळजी
> हलका व्यायाम व योगासने
> साधा आहार, जेवणात मिठाचे प्रमाण अत्यल्प
> पालेभाज्यांचा माफक समावेश
> भरपूर चालणे
> नाकात डॉक्टरांच्या सल्ल्याने नोझल ड्रॉप
> नियमित तपासणी आणि औषधे घेणे