शांत झोप येत नाही मग हे खा.. प्या.. !
By Madhuri.pethkar | Published: September 28, 2017 07:03 PM2017-09-28T19:03:31+5:302017-09-28T19:08:56+5:30
वेळेवर चांगली, शांत आणि गाढ झोप येण्यासाठी, झोप पूर्ण होवून सकाळी वेळ जाग येण्यासाठी, सकाळी उठल्यानंतर उत्साह वाटण्यासाठी ‘झोपण्यापूर्वी तुम्ही काय खाता?’ हे खूप महत्वाचं आहे.
- माधुरी पेठकर
माणूस पोटासाठी जगतो, झगडतो, दिवसभर राबराब राबतो. माणसात ही ऊर्जा येते ती इच्छेने आणि चांगल्या खाण्यानं. तसेच यासाठी हवा असतो उत्साह. हा उत्साह येतो तो झोपेमुळे. चांगली झोप माणसाला सदैव तरतरीत आणि तत्पर ठेवते. सकारात्मक दृष्टिकोनानं जगण्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची असते.
झोप जर चांगली झाली नाही तर मग दिवसभर मरगळल्यासारखं वाटतं. कामात लक्ष लागत नाही, उत्साह वाटत नाही. शांत गाढ झोप ही मानसिक शांततेसाठी गरजेची असते तसेच शारीरिक आरोग्यासाठीही.
झोप व्यवस्थित आणि पुरेशी झाली नाही तर मेंदूचं कार्य बिघडतं. तसेच पक्षाघात, हदयविकार यासारखे विकारही झोप व्यवस्थित न झाल्यास होवू शकतात. पचनाचे विकार, वायू विकार याचं मूळ कारण झोपेच्या सवयीतच दडलेलं असतं. झोपेच्याबाबतीत झालेलं अलीकडचं संशोधनही झोप नीट घ्या असंच सांगतं. जीवनात जर चांगली उद्दिष्ट्ये ठेवायची असतील, ती उद्दिष्ट जर पूर्ण करायची असतील तर आपल्याला रात्री शांत गाढ झोप येणं खूप गरजेचं आहे.
आज जगातले कित्येक लोक केवळ झोप नीट येत नाही म्हणून वैतागलेले आहेत. अनेकजण तर औषधाच्या गोळ्या घेवून झोपतात. पण झोपेसाठी गोळी घ्यावी लागणं हे एकूणच शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक आहे.
वेळेवर चांगली, शांत आणि गाढ झोप येण्यासाठी, झोप पूर्ण होवून सकाळी वेळ जाग येण्यासाठी, सकाळी उठल्यानंतर उत्साह वाटण्यासाठी ‘झोपण्यापूर्वी तुम्ही काय खाता?’ हे खूप महत्वाचं आहे.
सकाळी उठल्यानंतर गरम पाणी आणि झोपण्यापूर्वी कोमट दूध या दोन गोष्टी उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. एकूणच आपण काय खातो पितो हे खूप महत्त्वाचं आहे. चांगली झोप येण्यासाठी खाण्या-पिण्याचाच उपयोग करणं जास्त चांगलं. त्यामुळे उत्तम झोपेसाठी मदत करणारे पदार्थ प्रत्येकालाच माहित असायला हवेत.
चांगली झोप आणणारे पदार्थ
1 गरम दूध
गरम दूध हे झोप येण्यासाठी चांगली मदत करतं. दूधामध्ये ट्रायपटोफन आणि अमीनो अॅसिड असतं. जे शरीरात सेरोटोनिन नावाच्या घटकाची निर्मिती करतं. हा घटक मेंदू शांत करतो. चांगल्या झोपेसाठी मेंदू शांत असणं गरजेचं असतं. म्हणूनच झोपण्यापूर्वी कपभर गरम दूध पिणं चांगली सवय आहे.
2 केळ
झोपण्यापूर्वी केळ खाणंही चांगलं असतं. केळामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशिअम असतं. या दोन्ही गोष्टींमुळे स्नायूंना खूप आराम मिळतो. केळामध्ये चांगल्या प्रमाणात आणि चांगल्या प्रतीचे कार्बोहायडेÑटस असतात. जे शरीरात गेल्यावर चांगली झोप आणण्यास मदत करतात.
3 बदाम
बदामामध्येही मॅग्नेशियम हे खनिज मोठ्या प्रमाणात असतं. हे खनिज चांगली झोप येण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. बदामामुळे झोपेच्यादरम्यान शरीरातील रक्ताची पातळी संतुलित राखण्याचं काम बदाम करतं.
4 चेरी
चेरींमध्ये मेलाटोनीन नावाचा घटक असतो. हा घटक खरंतर मेंदूमधील ग्रंथी तयार करते. हा घटक शांत झोप येण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. हा घटक चेरी खाल्ल्यास मिळू शकतो.
5 जवस
जवसामध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतात. तसेच ओमेगा 3 आणि ट्रायप्टोफन हे घटकही असतात. हे सर्व घटक चांगली झोप येण्यासाठी मदत करतात. हे घटक मनातील भीती कमी करण्याचंही काम करतात. मन शांत असलं की झोप चांगली येतेच.