तुम्ही काय खात आहात? देशभरातील रुग्णालये करत आहेत अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 06:10 AM2022-12-19T06:10:43+5:302022-12-19T06:14:43+5:30
गेल्या काही काळापासून बदलत्या जीवनशैलीमुळे सामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मुंबई : गेल्या काही काळापासून बदलत्या जीवनशैलीमुळे सामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, शिवाय यात बदललेल्या आहाराच्या सवयी आरोग्यावर सातत्याने दुष्परिणाम करत आहेत, नायर रुग्णालयातील तज्ज्ञांनी या पार्श्वभूमीवर सामान्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा अभ्यास करण्याचे ठरविले आहे. या अनुषंगाने आरोग्यावरील परिणामांची माहिती तज्ज्ञांना मिळणार आहे.
देशातील नामांकित रुग्णालय एकत्र येऊन हा मोठा प्रकल्प राबवित असून, यात मुंबईतील नायर रुग्णालयाचाही सहभाग आहे. या प्रकल्पात आयव्हीडी न्यूट्रिकेअर हे ॲप रुग्णांच्या मोबाइलमध्ये इंस्टॉल करण्यात आले आहे, या माध्यमातून रुग्णांची आहार निवड-आवड तपासण्यात येणार आहे.
‘इन्फेक्टिव कोलायटिस’ म्हणजे काय?
आतड्याला सर्वाधिक होणारा आजार म्हणजे ‘इन्फेक्टिव कोलायटिस’! याच रुग्णाला पोट दुखूनच जुलाब होतात. काही दिवसांत प्रतिबंधात्मक औषधांमुळे जुलाब बरे होतात. याच्या व्यतिरिक्त ‘अल्सरेटिव्ह कोलायटिस’ म्हणजे कारण नसताना मोठ्या आतड्याला जखमा होणे व त्यामुळे रक्ताचे जुलाब होणे, हे आजार बरे होत नाहीत. या आजाराला कायमस्वरूपी औषधे घ्यावी लागतात.
वेळीच घ्यावी लागणार तक्रारीची दखल
नायर रुग्णालयाचे प्राध्यापक डॉ.संजय चंदाणी यांनी याविषयी सांगितले, आतड्याच्या कर्करोगाचे प्रमाणही वाढत आहे. शौचावाटे रक्त जाणे, पोटात दुखणे, बद्धकोष्ठता, जुलाब होणे यांसारख्या तक्रारी कर्करोगात दिसून येतात. बदलत्या जीवनशैलीमुळे भगेंद्र व पाइल्सचे (मूळव्याध) प्रमाण वाढले आहे. शौचावाटे रक्त जाणे आणि शौचाच्या जागी वेदना होणे ही या आजाराची प्रामुख्याने लक्षणे आहेत. अनेक आजार आहारावर व जीवनशैलीवर नियंत्रण ठेवून आपण टाळू शकतो. आतड्याच्या आजारावर मात करायची असेल, तर वेळीच तक्रारींची दखल घ्यावी लागेल.