मोतीबिंदू का होतो? आणि याची लक्षणे कोणती? वेळीच व्हा सावध...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 05:26 PM2022-06-28T17:26:36+5:302022-06-28T17:32:39+5:30
What Causes Cataract : लक्षणीय अशा मोतीबिंदूचे लवकर निदान आणि त्यावर त्वरित उपचार होणे योग्य उपचार पद्धतीमध्ये आवश्यक आहे. मोतीबिंदू होणे सामान्य असले तरी ते कसे आणि का होते आणि डोळ्यात त्याची निर्मिती टाळण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल जागरूक असणे चांगले आहे.
लेखक डॉ. गिरीश बुधराणी (मुख्य वैद्यकीय अधिकारी, मोतीबिंदू आणि कॉर्निया, आर जे शंकरा नेत्र रुग्णालय)
What Causes Cataract : मोतीबिंदू हे जगभरातील दृष्टीदोषाचे प्रमुख कारण आहे आणि वेळीच त्यावर उपचार न केल्यास डोळ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते. मोतीबिंदू जितका जास्त काळ डोळ्यात असतो तितका तो सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे काढणे अवघड असते. म्हणूनच, लक्षणीय अशा मोतीबिंदूचे लवकर निदान आणि त्यावर त्वरित उपचार होणे योग्य उपचार पद्धतीमध्ये आवश्यक आहे. मोतीबिंदू होणे सामान्य असले तरी ते कसे आणि का होते आणि डोळ्यात त्याची निर्मिती टाळण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल जागरूक असणे चांगले आहे.
मोतीबिंदू म्हणजे डोळ्याच्या सामान्यतः पारदर्शक स्फटिक कणांचा (लेन्स) ढगसदृश्य पुंजका होय. यात स्फटिक कणसमूह अतिशय महत्त्वाचा आहे कारण तो प्रकाश किरण डोळ्याच्या मागील बाजूस असलेल्या रेटिनावर, मज्जातंतूच्या थरावर केंद्रित होण्यावर परिणाम करतो. जेव्हा स्फटिक कण (लेन्स) लक्षणीयरित्या ढगसदृश्य एका ठिकाणी जमा होतात, तेव्हा ते प्रकाश किरणांचे केंद्रीकरण थांबवतात आणि गंभीर दृष्टी समस्या निर्माण करताट. म्हणूनच, या समस्येबद्दल मूलभूत जागरूकता आणि ज्ञान असणे आवश्यक आहे जेणेकरुन दृष्टी गमावण्याच्या धोक्यास प्रतिबंध करण्यासाठी लवकर उपचार केले जाऊ शकतात.
मोतीबिंदू का होतो?
वृद्धत्व हा मोतीबिंदूशी संबंधित एक प्रमुख घटक आहे. अलीकडील अहवालांनुसार, भारतात 71.2% वृद्धांमधील दृष्टीदोष मोतीबिंदूमुळे होतो. मोतीबिंदू होण्यामागील इतर कारणांमध्ये डोळ्यांना दुखापत, तीव्र अल्पदृष्टी, विशिष्ट औषधांचे दीर्घकाळ सेवन (उदा. स्टेरॉइड) किंवा मधुमेह यांसारखे आजार, अति धूम्रपान आणि तीव्र उष्णता आणि किरणोत्सर्गाचा समावेश होतो.
मोतीबिंदूची लक्षणे कोणती?
मोतीबिंदूमध्ये अंधुक दृष्टी, दृश्यता कमी होणे, चकाकी आणि हलके दिसणे यांसारखी अनेक लक्षणे आहेत ज्याचा परिणाम वाहन चालवणे, वाचन करणे किंवा लोकांना ओळखणे यासारख्या दैनंदिन क्रिया – कामकाजांवर होऊ शकतो. मोतीबिंदूमुळे होणाऱ्या दृष्टिदोषातून वृद्ध व्यक्ती कुठेही खाली पडण्याचा धोका वाढतो आणि तसे झाल्यास त्यातून त्यांच्यात नैराश्य निर्माण होते. निदान न झाल्यास त्यांना मोतीबिंदू आहे याची जाणीव लोकांना नसते आणि विशेष म्हणजे या लक्षणांवर लवकर उपचार न केल्यास दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होऊ शकतो. डोळ्यांच्या या समस्येचा सामना करण्यासाठी अशा परिस्थितीची जाणीव असणे उपयुक्त आहे.
मोतीबिंदूवरील उपचार
मोतीबिंदूवरील शस्त्रक्रिया आजकाल तांत्रिकदृष्ट्या प्रगत झाली आहे आणि रुग्णाच्या परिस्थितीनुसार ती योग्यरित्या करून रुग्णाची दृष्टी वाढवू शकते. यंत्रांची अचूकता अनेक पटींनी वाढल्याने आता डोळ्यांचे अचूक मोजमाप करणे शक्य झाले आहे. ही शस्त्रक्रिया रुग्णास एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी हलवून अगदी एका दिवसात केली जावू शकते आणि सामान्यतः एका आठवड्यात सर्वसाधारण वैद्यकीय प्रक्रियेनंतर रुग्ण पूर्णपणे बरा होतो.
निष्कर्ष- मोतीबिंदू लवकर ओळखणे महत्वाचे आहे
डोळ्यांच्या नियमित तपासणीत मोतीबिंदू ओळखता येवू शकतो. वयोमर्यादेचा विचार केल्यास ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी डोळ्यांची नियमित व सर्वंकष तपासणी करण्याची शिफारस केली जाते. मोतीबिंदू दर्शविणारी कुठलीही लक्षणे आढळल्यास संबंधित रुग्णाने लवकरात लवकर नेत्ररोग तज्ञाचा सल्ला घ्यावा. महत्वाचे म्हणजे वयोमानानुसार दृष्टी कमी होणारच हे गृहित धरू नये किंवा दृष्टी कमी होणे जीवनाचा भाग म्हणून स्वीकारू नये.
अलीकडील अहवालानुसार, मोतीबिंदूमुळे आलेल्या अंधत्वाचा अनुशेष दूर करण्यासाठी आवश्यक शस्त्रक्रियांची संख्या ४९ लाख आहे आणि मोतीबिंदूमुळे आलेल्या गंभीर दृष्टीदोषाचा अनुशेष दूर करण्यासाठी आवश्यक शस्त्रक्रियांची संख्या ५३.६३ लाख आहे. इसवी सन २०२५ पर्यंत अंधत्वाचे प्रमाण ०.२५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या नवीन उपक्रमांमुळे मोतीबिंदू आणि गंभीर दृष्टीदोष यांच्या शस्त्रक्रियेतील अनुशेष नक्कीच दूर होईल.