किमोथेरपी म्हणजे नेमकं काय?, ती कर्करुग्णांसाठी वरदान का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 11:19 AM2019-06-13T11:19:13+5:302019-06-13T11:19:21+5:30
शस्त्रक्रिया, रसायनोपचार म्हणजेच किमोथेरपी आणि किरणोपचार अर्थात रेडिएशन, या कर्करोगाच्या तीन उपचारपद्धती.
- रश्मी जोशी
शस्त्रक्रिया, रसायनोपचार म्हणजेच किमोथेरपी आणि किरणोपचार अर्थात रेडिएशन, या कर्करोगाच्या तीन उपचारपद्धती. परंतु रसायनोपचार म्हणजेच किमोथेरपी हा त्यातील प्रमुख उपचार. कधी शस्त्रक्रियेपूर्वी तर कधी शस्त्रक्रियेनंतर तो केला जातो. ‘किमो’ हा कधी, कोणता व किती द्यायचा ते मात्र डॉक्टर ठरवितात. या किमोथेरपीतून कर्करोग पेशींची वाढ खुंटते, मात्र चांगल्या पेशींवर तात्पुरते साइड इफेक्ट होतात. परंतु कर्करोग आटोक्यात राहण्यासाठी आणि कालांतराने निरोगी होण्यासाठी रसायनोपचार अर्थात किमोथेरपी महत्त्वाची आहे.
कर्करोगाचे निदान झाल्यानंतर जी उपचारपद्धती अवलंबण्यात येते. त्यात प्रमुख तीन गोष्टी असतात, त्या म्हणजे शस्त्रक्रिया, रसायनोपचार म्हणजेच किमोथेरपी किंवा किमो आणि तिसरी गोष्टी म्हणजे किरणोपचार अथवा रेडिएशन. रसायनोपचारात कर्करोगनाशक औषधांचा वापर करून कर्करोगाच्या पेशींचा नाश केला जातो. यात वापरलेली रासायनिक औषधे कर्करोग पेशींची वाढ व त्यांचे विभाजन थांबवितात. परंतु त्याचा परिणाम चांगल्या पेशींवरही होतो. त्यामुळेच याचे काही सहपरिणाम (साइड इफेक्ट) दिसून येतात. रुग्णाला झालेला कर्करोगाचा प्रकार, रुग्णाचे वय, आरोग्य हे सर्व लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टर ‘किमो’ कधी, कोणती व किती द्यायची ते ठरवितात. त्यामुळे प्रत्येक रुग्णाच्याबाबतीत डॉक्टरांचा सल्ला वेगळा असू शकतो. कधी शस्त्रक्रियेपूर्वी कर्करोगाची गाठ आकुंचित करण्यासाठी किमो दिले जातात. शस्त्रक्रिया किंवा किरणोपचारानंतर तर कधी कर्करोग पुन्हा उद्भवू नये म्हणून किमो दिले जातात. किरणोपचारांबरोबर परिणाम वाढविण्यासाठीही किमो दिले जातात.
रसायनोपचार वा किमोथेरपी ही वेगवेगळ्या पद्धतीनेही दिली जाते. जसे शिरेवाटे इंजेक्शनद्वारा, तोंडावाटे कॅप्सुलच्या स्वरुपात यकृत, जठर, अंडाशय अशा अवयवांमध्ये रोपण करून अथवा स्रायूंमध्ये किंवा त्वचेखाली इंजेक्शनने. बहुतेक वेळा किमो ही हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात अथवा रसायनोपचाराच्या विशेष दिवस कक्षात (डे केअर युनिट) दिले जातात. कुठले रसनोपचार द्यायचे व कसे द्यायचे हे तज्ज्ञ डॉक्टर ठरवतात. प्रशिक्षित परिचारिकेच्या निगराणीखाली ते दिली जातात. काही रुग्णांना त्यासाठी हॉस्पिटलमध्ये राहावे लागते.
रसायनोपचारात वापरलेल्या वेगवेगळ्या रसायनांचे सहपरिणाम (साइड इफेक्ट) वेगवेगळे असतात. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वेगवेगळी असते, त्यामुळे वेगवेगळ्या व्यक्तींवर कमी-जास्त प्रमाणात साइड इफेक्ट होतात. ते सर्व थोड्याच काळासाठी असतात व किमोची सर्व चक्रे पूर्ण झाली की, ते हळूहळू नाहीसे होतात. शरीराच्या ज्या पेशींचा व अवयवांचा वापर जास्त असतो व जेथे सतत पेशींचे पुनर्निमाण होत असते. त्या भागांवर रसायनोपचाराचा सर्वात अधिक परिणाम दिसतो. तोंडाचे आतील अस्तर, जठर वा पचनसंस्थेचे आतील अस्तर त्वचा, केस आणि अस्थिमज्जा जेथे नव्या रक्तपेशी तयार होत असतात.
रसायनोपचारामुळे पचनसंस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. अन्नाची चव बदलू शकते, कधी अन्न बेचव लागते वा ते जास्त खारट, कडवट लागते. तोंडात आतून लहान फोड येऊन ते लाल होतात. मळमळ-ओकारीसारखे वाटू लागते. अतिसार वा बद्धकोष्ठताही होऊ शकते. तोंडाची चव गेल्यास थंड व गोड पदार्थ खावेत. तर अननस खाल्यास तोंड आतून स्वच्छ राहते. मळमळ कमी करण्यासाठी आले-लिंबू रस, पुदिनायुक्त पेय घेता येईल. पोटाचे विकार टाळण्यासाठी ताजे, तंतूमय सकस अन्न, ताजी फळे खाण्याबरोबर हलका व्यायामही आवश्यक आहे. रसायनोपचारात केस गळण्याची बरीच जास्त शक्यता असते. पुरुष रसायनोपचाराआधीच केस बारीक कापून घेऊ शकतात. महिलांनी आपल्या केसांचा वा त्यांच्याशी मिळता-जुळता विग करून तो वापरल्यास परक्या लोकांच्या भोचक प्रश्नांना सामोरे जावे लागणार नाही.
रसायनोपचारानंतर रक्तातील विविध पेशींची संख्या कमी होते. याचे कारण अर्थात अस्थिमज्जेवर रासायनिक औषधांनी झालेला सहपरिणाम होय. प्रत्येक चक्रानंतर रोगजंतूंशी लढणाऱ्या पांढ-या रक्तपेशी कमी झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जंतूसंसर्ग होऊन आजारी पडण्याची शक्यता वाढते. याशिवाय रसायनोपचाराचा परिणाम मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर, कानांच्या श्रवणक्षमतेवर होऊ शकतो. हातापायाला मुंग्या येणे, हातपाय बधीर होणे, त्वचा कोरडी पडणे यासारखे परिणाम दिसतात. रसायनोपचाराचे म्हणजेच किमोथेरपीचे असे वेगवेगळे सहपरिणामत होत असले तरी ते तात्पुरते असतात. तज्ज्ञ डॉक्टरांनी ठरविलेली चक्रे पूर्ण करणे आवश्यक असते व उपचारानंतर सहपरिणाम थांबतात किंवा हळूहळू कमी होतात.
प्रत्येक चक्रामध्ये रसायनोपचारानंतर काही काळ हा विश्रांतीचा असतो. त्यादरम्यानही सहपरिणाम कमी होऊन रक्तपेशींची संख्या वाढू लागते व रुग्ण पुढील चक्रासाठी शारीरिकदृृष्ट्या तयार होऊ शकतो. रसायनोपचारादरम्यान रुग्णाला आपले मानसिक आरोग्य राखणेही गरजेचे असते. यासाठी रुग्णाने दैनंदिन व्यवहार सुरु ठेवावेत. मित्रमैणिणींमध्ये मिसळावे. योग्य आहार घ्यावा. हलका व्यायाम करावा. डायरी लिहावी, आपले मन रमेल असा छंद जोपासावा. रसायनोपचाराला इतर आयुर्वेदासारख्या पूरक उपचारांची जोड देऊन सहपरिणाम कमी करता येऊ शकतात. रसायनोपचार म्हणजेच किमोथेरपी कर्करोगाची लक्षणे कमी होऊन तो आटोक्यात येण्यास व रुग्ण पूर्णपणे निरोगी होण्यास अत्यावश्यक आहे, हे लक्षात घेतल्यास अधिक सकारात्मकतेने सहपरिणामांना सामोरे जाता येईल.