तणाव आणि डिप्रेशन यात काय फरक आहे? जाणून घ्या फरक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 10:48 AM2018-08-27T10:48:45+5:302018-08-27T10:49:18+5:30
चिडचिडपणा आणि विचारांची घालमेल यामुळे डिप्रेशनची शक्यता अनेकांना जाणवायला लागते. पण काय हेच तुम्हाला डिप्रेशन येण्याची कारणं आहेत?
(Image Credit : www.medicalnewstoday.com)
'मला डिप्रेशन आलं आहे', हे तुम्ही अनेकदा अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल. अलिकडे अनेक सेलिब्रिटीही कसे डिप्रेशनमध्ये होते आणि त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी काय केले हे सांगत असतात. चिडचिडपणा आणि विचारांची घालमेल यामुळे डिप्रेशनची शक्यता अनेकांना जाणवायला लागते. पण काय हेच तुम्हाला डिप्रेशन येण्याची कारणं आहेत?
आपल्या मनाची स्थिती स्पष्ट करण्यासाठी 'तणाव' आणि 'डिप्रेशन'सारख्या शब्दांचा वापर अलिकडे सर्रास केला जातो. डिप्रेशन, तणाव, टेन्शन या सगळ्या एकच गोष्टी असल्याचेही समजले जाते. अनेकांना यामधील अंतर माहीत नसतं. पण तणाव आणि डिप्रेशन या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आणि याचा आपल्या जीवनावर आणि मनावर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव पडतो.
काय तणाव आणि डिप्रेशन एकच समस्या आहे?
तणाव एका घटनेमुळे किंवा एका स्थितीमुळे सुरु होतो तर डिप्रेशन एक मानसिक विकार आहे जो मेंदुच्या काम करण्याच्या प्रक्रियेला प्रभावित करतो. डिप्रेशन हे अनुवांशिक समस्याही असू शकते.
अनेकदा डिप्रेशन आणि तणावाची लक्षणं एकसारखी असतात आणि त्यामुळेच यातील फरक समजून घेणे कठिण होऊन बसतं. लाइफस्टाइलमध्ये बदल करुन आणि डिप्रेशनचा सामना करुन यातून सुटका मिळवली जाऊ शकते. पण डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज पडू शकते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे डिप्रेशन ग्रस्त व्यक्ती जर वेळीच डॉक्टरांकडे गेला तर त्याची समस्या वेळीच दूर होऊ शकते.
तणाव आणि डिप्रेशनमध्ये फरक कसा ओळखावा?
तणाव आणि डिप्रेशनमध्ये प्रमुख अंतर हेच आहे की, तणावाच्या स्थिती निघून गेल्यावर तुम्ही सामान्य रुपाने आपलं जीवन जगू शकता. पण डिप्रेशनच्या स्थितीमध्ये एकटेपणा, उदासी, निरुत्साही होण्याची शक्यता आयुष्यभर जाणवत राहू शकते.
डिप्रेशननंतर मानसिक आणि शारीरिक बदल होतात जे फार गंभीर आणि मोठ्या काळापर्यंत प्रभावित करु शकतात. डिप्रेशनच्या काही लक्षणांमध्ये झोपण्याची वेळ बदलणे, थकवा, मूड स्विंग, पश्चाताप, निराशा आणि जीवन न जगण्याची इच्छा ही आहेत. हे मेंदुतील बदललेल्या केमिकल्समुळे होतं. जे स्वत:हून ठिक होत नाही.