इमेलला उत्तरंच न देणाऱ्यांना इतर लोक काय समजतात?
By admin | Published: May 27, 2017 03:00 PM2017-05-27T15:00:14+5:302017-05-27T15:00:14+5:30
दुसऱ्याच्या इमेल्सना जे लोक उत्तरच देत नाहीत, त्यांच्या व्यवसाय वर्तुळात त्यांना काय म्हणतात?
- निशांत महाजन
काही लोकांना एक फार अभिमान असतो. ते सांगतात, माझा मेलबॉक्स बघा, ३०० मेल्स अजून रिड करणं बाकी आहे. तेच फेसबूक मेसेजचंही. त्यांनी शेकडो मेसेज वाचलेलेच नसतात. मान्य आहे, ते टामटूम असतील. बिनकामाचे असतील. किंवा तुम्ही खूप बिझी असाल म्हणून ते वाचले गेले नसतील. पण तरीही असे पेण्डिंग मेल्स ठेवणं आणि इतरांच्या मेल्सना उत्तरंच न देणं तुमच्या कामाच्या वर्तुळात, तुमच्या उद्योग व्यवसायाच्या वर्तुळात तुमच्याविषयी चुकीचे मेसेज पाठवू शकतं. आणि मला काय फिकीर नाही कुणी काहीही समजो असा काही तुमचा अॅटिट्यूड असलाच तरी आपलं अडतंच कुठं ना कुठं हे मान्य करायला हवं. दुसरं म्हणजे कारण नसताना लोक आपल्याविषयी गैरसमज करुन घेतात. आणि त्यानं आपली प्रतिमा खराब होतेच ती कायमचीच.
तुमच्या इमेल्सना उत्तरं न देण्याच्या सवयीवरुन लोक तुमच्याविषयी काय समज करुन घेतात? -हे पहा..
१) तुम्ही इतरांना रिस्पेक्टच देत नाही, स्वत:ला फार शहाणे समजता, तुम्हाला मोठा अॅटिट्यूड आहे असं लोकांना वाटतं.
२) इतरांची कामं, त्यांची अर्जन्सी यांना तुम्ही महत्वच देत नाही, ते कन्सिडरच करत नाही, इतरांच्या भावनांशी खेळता असा एक दुसरा समज.
३) स्वत:ला इतरांपेक्षा सुपिरिअर समजता ( जे तुम्ही नाहीत असं त्यांना वाटतं) आणि त्यामुळे लोकांशी फटकून वागता असा एक समज होतो.
४) आपण खूप बिझी आहोत असं लोकांना तुम्हाला दाखवायला आवडतं.
५) तुम्हाला वर्क कल्चरची माहितीच नाही. तुम्हाला वर्किंग मॅनर्सच नाहीत, असंही बोललं जातं?
यावर करता काय येईल?
मान्य आहे की तुम्ही बिझी असाल, नकळत हे सारं करत असाल तर त्यावर उपाय म्हणून दोन गोष्टी करता येतील.
१) प्रत्येक मेल ला एक थॅँक्स म्हणून रिप्लाय पाठवता येईल. तसा आॅटो रिप्लाय मोड आॅन करुन ठेवता येईल.
२) जे काम तुमच्याच्यानं होणार नाही, त्याला नम्रपणे, कारणासह नकार देण्याची सवय लावून घेता यायला हवी.