काय सांगता! सरकारने पाडले १५,६०० दात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 09:34 AM2022-08-04T09:34:02+5:302022-08-04T09:34:11+5:30
खासगी रुग्णालयात किंवा क्लिनिकमध्ये दातांच्या उपचारासाठी भरमसाट खर्च येतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयुष्यात एकदा तरी दातांच्या दुखण्याला किंवा त्यावरील उपचाराला सामोरे जावेच लागते. अनेक जणांना दातांचे दुखणे म्हटले की, अंगावर शहारे येतात. काही जण तर भीतीपोटी उपचार घ्यायलाही नकार देतात. मात्र, दुखणे बळावले की दंतरोगतज्ज्ञाकडे जावेच लागते. सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरातील शासकीय दंत महाविद्यालयही त्यास अपवाद नाही.
रक्त चाचण्या आणि बायोप्सी २,२००
(रुग्णाला काही पूर्व आजार आहेत का, हे पाहण्यासाठी शस्त्रक्रियेपूर्वी काही मूलभूत रक्तचाचण्या केल्या जातात. तसेच शस्त्रक्रियेदरम्यान पेशींचा तुकडा घेऊन अधिक तपासणीकरिता बायोप्सी केली जाते.)
दातांचे एक्स-रे ३०,५०७
(दातातील कीड कुठपर्यंत पोहोचली आहे आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या हाडांची झीज किती झाली आहे हे पाहण्यासाठी एक्स-रे काढला जातो.)
दातांचे फिलिंग ६,५००
(दाताला लागलेली कीड वरवर असते त्यावेळी छोटासा खड्डा झालेला असतो. तिथे अन्न अडकते मात्र फारशा वेदना होत नाहीत. त्यावेळी फिलिंग केल्यास दात वाचतो.)
कवळ्या २,०००
(विशेष करून वृद्धापकाळात दात पडतात. दात नसलेल्या जागी कृत्रिम दात बसविला जातो तो सहजरीत्या काढताही येतो, याला कवळी बसविणे असे म्हणतात.)
दंतसफाई २०,०००
(वर्षातून एकदा नागरिकांनी दातांची सफाई करावी. अनेकदा दाताच्या वरच्या बाजूला पिवळसर थर साचलेला असतो, यासाठी दातांची सफाई गरजेची असते.)
आमच्या रुग्णालयात दातांशी निगडित व्याधींवरील सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार होत असल्यामुळे शहर, उपनगरे तसेच मुंबईबाहेरील अनेक रुग्ण येथे दंत उपचारासाठी येत असतात. वर्षभरात आमच्याकडे जवळपास ३१ हजार रुग्णांनी उपचार घेतले आहेत. वर्षागणिक रुग्णांचा आकडा वाढत आहे.
- डॉ. डिंपल पाडावे, अधिष्ठाता, शासकीय दंत रुग्णालय, मुंबई
खासगी रुग्णालयात किंवा क्लिनिकमध्ये दातांच्या उपचारासाठी भरमसाट खर्च येतो.
त्या तुलनेने या सरकारी रुग्णालयांत कमी दरात दातांवर उपचार केले जातात.
विशेष म्हणजे या रुग्णालयात पदवी दंत अभ्यासक्रमासोबत, पदव्युत्तर अभ्यासक्रम असल्याने मूलभूत दंत उपचारासोबत अत्याधुनिक शस्त्रक्रिया केल्या जातात.