मंकीपॉक्सचा लैंगिक संबंधाशी काय ‘संबंध’?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 09:34 AM2022-07-31T09:34:43+5:302022-07-31T09:35:22+5:30
समलिंगी संबंध राखणाऱ्या लोकांनी मंकीपॉक्सची साथ लक्षात घेता जोडीदारांची संख्या कमी केली पाहिजे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
समीर परांजपे, मुख्य उपसंपादक
कीपॉक्स आजार ही जागतिक आणीबाणी आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या आठवड्यात जाहीर केले. त्यानंतर या संघटनेने आणखी एक सावधगिरीचा इशारा दिला तोही अतिशय महत्त्वाचा आहे. जगभरातील ७० हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचे १९ हजार रुग्ण सापडले असून त्यातील बहुसंख्य रुग्ण हे गे, बायसेक्शुअल अशा प्रकारचे आहेत. अशा प्रकारचे संबंध राखणाऱ्या लोकांनी मंकीपॉक्सची साथ लक्षात घेता आपल्या लैंगिक जोडीदारांची संख्या कमी केली पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी सांगितले होते. या इशाऱ्याला कारणही तसेच घडले आहे.
याआधी मंकीपॉक्स हा आजार आफ्रिका खंडातील काही देशांमध्येच आढळून यायचा. सध्या जागतिक स्तरावर त्याचा जितका प्रसार झाला आहे तितका तो याआधी झाला नव्हता. गेल्या काही दिवसांत युरोपसह अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण सापडायला लागले व खळबळ माजली. त्यामागचे कारण असे होते की, या देशांमध्ये होणाऱ्या सेक्स, रेव्ह, ड्रग पार्टींमध्ये तसेच अन्य ठिकाणी पुरुषांमध्ये प्रस्थापित होणाऱ्या समलिंगी संबंधांतून मंकीपॉक्सचा प्रसार वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या निदर्शनास आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने गे, बायसेक्शुअल मंडळींसाठी मंकीपॉक्सच्या साथीच्या काळात काही सूचना केल्या आहेत. पुरुष समलिंगी मंडळींनी आपल्या लैंगिक जोडीदारांची संख्या कमी करावी, एखादा नवा लैंगिक जोडीदार निवडायचा असेल तर आधी त्याची सविस्तर माहिती मिळवावी. त्यात त्याच्या आरोग्याचाही तपशील आलाच. त्यानंतरच नव्या लैंगिक जोडीदारासंदर्भातील निर्णय घ्यावा. प्रत्येक लैंगिक जोडीदाराची सविस्तर माहिती हाती असल्यास व दुर्दैवाने मंकीपॉक्सच्या बाधेचा प्रसंग ओढवल्यास रुग्णांचा मागोवा घेणे सोपे जाते.
कोणताही देश सोवळा नाही
जगामध्ये समलिंगी संबंध राखणाऱ्या प्रवृत्ती सर्वच देशांत आहेत. कोणताही देश त्याबाबत सोवळा नाही. मात्र, काही देशांमध्ये समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता आहे. काही देशांत अशा संबंधांना कायदेशीर मंजुरी नाही. कायद्याद्वारे एखाद्या गोष्टीवर कितीही निर्बंध आणले तरी ती पूर्णपणे नष्ट होतेच असे नाही. ज्या देशांत समलिंगी संबंध राखणाऱ्या व्यक्तींची संख्या खूप जास्त आहे त्यांच्याकरिता जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्याचे गांभीर्य अधिक आहे.
७० टक्के रुग्ण युरोपमध्ये
जगभरातील मंकीपॉक्सच्या एकूण रुग्णांपैकी युरोपमध्ये ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण असून २५ टक्क्यांहून जास्त रुग्ण अमेरिकेत आहेत. पाश्चिमात्य देशांतील काही अपवाद वगळता बहुतांश देशांत समलिंगी संबंध राखणारे, गे, बायसेक्शुअल यांच्याबाबत कायद्यानेही उदार दृष्टिकोन ठेवला आहे. नेमका या देशांत मंकीपॉक्सचा प्रसार वाढला आहे आणि ते साहजिक आहे. भारतातही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, त्यांना या आजाराची बाधा
कोणत्या कारणांमुळे झाली याचा सविस्तर तपशील उघड झालेला नाही. ज्या पुरुषांना मंकीपॉक्स झाला आहे, त्यातील ९८ टक्के पुरुष हे समलिंगी संबंध राखणारे आहेत. असे संबंध राखणे नैतिक की अनैतिक या वादात न शिरता सध्या अशा प्रकारच्या संबंधांबाबत संयम बाळगावा हा जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला इशारा सध्या अधिक महत्त्वाचा आहे. त्याचे पालन केल्यास जागतिक आरोग्य सुरक्षित राहील.