कुणाला असतो गॉल ब्लॅडर स्टोनचा सर्वात जास्त धोका?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 11:15 AM2019-04-10T11:15:56+5:302019-04-10T11:19:35+5:30
गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजेच पित्ताशयाच्या खड्यांचं निदान होऊ शकतं का? तर त्यावर उत्तर आहे हो.
गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजेच पित्ताशयाच्या खड्यांचं निदान होऊ शकतं का? तर त्यावर उत्तर आहे हो. यासाठी गॉल ब्लॅडर स्टोन काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. कुणाला ही समस्या अधिक होते हेही जाणून घेऊ. गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजे पित्ताशयात होणारे खडे.
आपल्या शरीरात पित्तरसाची निर्मिती ही यकृतामध्ये (लिव्हरमध्ये) होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला पित्ताशय (Gall bladder) नावाची एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते, जिचे काम असते जास्त तयार झालेले पित्त साठवून ठेवणे व प्रत्येक जेवणाच्या वेळी ते पित्तनलिकेवाटे लहान आतड्यात सोडते. खाल्लेल्या अन्नाच्या पचनासाठी याची गरज असते. हे पित्त जेवणानंतर ठरावीक प्रमाणामध्ये पचनक्रियेसाठी हा पित्तरस लहान आतडय़ात सोडला जातो. आहारात तेलकट पदार्थाचे प्रमाण जास्त झालं किंवा फायबर पदार्थाचं प्रमाण कमी झालं तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात. कधी कधी द्रव्यामध्ये असलेल्या कोलेस्ट्रॉल किंवा बाइलमुळे गॉल ब्लॅडरमध्ये खड्यांची निर्मिती होते. हे खडे मटारच्या दाण्यांपासून ते गोल्फच्या बॉलच्या आकाराचे असू शकतात.
कुणाला होते ही समस्या?
पित्ताशयातील खडे हे फॅट, फर्टाइल, फीमेल ऑफ फोर्टी म्हणजे स्थूल देहाच्या चाळिशीतील महिलांमध्ये जास्त प्रमाणात असे सांगितले जाते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण सहापटींनी जास्त असते. त्यांचा आहार, स्थूल शरीर, जाडेपणा, अतिस्थूलपणा, अति तूपकट, तेलकट खाणे, आहारात तंतुमय पदार्थ न घेणे, बैठी कामे करणे, व्यायामाचा अभाव, वरचेवर फास्ट फूड किंवा जंक फूड असणे, या सर्व गोष्टींमुळे पित्ताशयात खडे तयार होऊ शकतात. हल्ली हे खडे सर्व वयाच्या स्त्री-पुरुषांमध्ये आढळतात.
गॉल ब्लॅडरची लक्षणे
जास्तीत जास्त गॉल ब्लॅडर स्टोन कोणतंही लक्षण किंवा नुकसान न पोहोचवता गॉल ब्लॅडरमध्ये पडलेले असतात. कधी कधी व्यक्तीला आयुष्यभर हे माहीत नसतं पण कधी काही कारणाने सोनोग्राफी केली तर याची माहिती मिळते. याची काही लक्षणे दिसली नाही तर यावर उपचारही फार गरजेचे नसतात. पण लक्षणे दिसली तर वेळीच उपचार करावे लागतात. गॉल ब्लॅडर स्टोन आतल्या आत पिघळवूण नष्ट करण्याचा कोणताही उपाय नाही. काही औषधे आहेत पण ती बरीच वर्षे घ्यावी लागतील. यावरील उपाय म्हणजे गॉल ब्लॅडर काढून टाकणे हाच आहे. हा अवयव काढल्यावर व्यक्तीला काहीही नुकसान होत नाही.
गॉल ब्लॅडरमुळे होणाऱ्या इतर समस्या
१) पोटात जोरात वेदना होऊ शकतात.
२) गॉल ब्लॅडरमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं.
३) यावर उपचार न करणे हे जीवनासाठी धोकादायक ठरू शकतं.
४) सुरुवातीची लक्षणे अॅसिडिटीच्या त्रासासारखीच असतात.
५) सुरुवातीला पोटाच्या वरच्या भागात थोडेसे उजवीकडे दुखायला लागते. गॅसेस होतात. मळमळ सुटते, जळजळ होऊ लागते.
६) त्याबरोबरच एखादा खडा पित्तनलिकेत अडकून राहिला तर पित्तरस आतडय़ात नेणारा मार्ग अरुंद होतो व पित्तरस यकृत (लिव्हर)मध्ये साचू लागतो त्यातील बिलिरुबीन हे रंगद्रव्य रक्तात मिसळतात व काविळीची लक्षणे दिसू लागतात. याला अवरोधक कावीळ असे म्हणतात.
७) पित्तखडय़ांमुळे होणाऱ्या काविळीबरोबर अंगाला खाज सुटते. पित्ताशयातील खडय़ांमुळे स्वादुपिंडदाहही होऊ शकतो.
टाळण्यासाठी काय करावे?
१) जेवणातील तेल-तुपाचे प्रमाण योग्य असावे म्हणजे फोडणीसाठी माफक तेल, भातावर थोडे साजूक तूप (हे लोणी काढून घरी बनवलेले तूपच असावे) इतके चालेल. पनीर, खोबरे व शेंगदाण्याचाही वापर माफक प्रमाणात करावा.
२) तळलेले पदार्थ, फास्ट फूड वरचेवर खाऊ नये.
३) जेवणात रोज कोशिंबीर वा सॅलड घ्यावे.
४) चिकू, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळे अशी फळे खावीत.
५) रोज नियमित व्यायाम करावा. रोज एक तास चालायला जावे.
(टिप - या लेखात सुचवण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत. याकडे तुम्ही प्रोफेशनल सल्ला या रूपाने बघू शकत नाहीत. कोणत्याही प्रकारचं फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा डाएटमध्ये कोणत्याही प्रकारचं बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)