काय झालं? तुम्ही १० वर्षांनी म्हातारे का दिसताय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 12:35 PM2023-08-12T12:35:50+5:302023-08-12T12:36:32+5:30

माणसाचं जगणं आज धावपळीचं झालं आहे. घड्याळाशी स्पर्धा करताकरताच संपूर्ण आयुष्य त्याला काढावं लागतं आहे. त्यात वेगवेगळ्या चिंता, काळजी, जबाबदाऱ्या जगाच्या सोबत किंवा पुढे राहण्याची सक्ती..

what happened Why do you look 10 years older? | काय झालं? तुम्ही १० वर्षांनी म्हातारे का दिसताय?

काय झालं? तुम्ही १० वर्षांनी म्हातारे का दिसताय?

googlenewsNext

आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगानं होत असलेल्या वैद्यकीय संशोधनामुळे आज माणसाचं आयुष्यमान वाढतं आहे. पूर्वीच्या तुलनेत त्याचं सरासरी आयुर्मान वाढलं आहे. ही आनंदाची गोष्ट मानावी की दु:खाची? कारण आयुष्य वाढलं असलं तरी त्या आयुष्याचा दर्जा मात्र नक्कीच खालावला आहे. माणसाचं नुसतं आयुष्य वाढणं महत्त्वाचं की त्याची आरोग्यसंपन्नता? माणसाचं जगणं महत्त्वाचंच, पण कुठल्या अवस्थेत तो जगला, जगतोय हे अधिक महत्त्वाचं नाही का? माणूस आज जास्त जगत असेल; पण वेगवेगळ्या व्याधी कवटाळत आणि औषधी-पाण्यावरच त्याच्या जगण्याची दोरी अवलंबून असेल तर त्या जगण्याला तरी कितीसा अर्थ आहे? 

माणसाचं जगणं आज धावपळीचं झालं आहे. घड्याळाशी स्पर्धा करताकरताच संपूर्ण आयुष्य त्याला काढावं लागतं आहे. त्यात वेगवेगळ्या चिंता, काळजी, जबाबदाऱ्या जगाच्या सोबत किंवा पुढे राहण्याची सक्ती.. या सगळ्या गोष्टी त्याच्या शक्तीची आणि समर्पणाची परीक्षाही पाहत असतात. त्यामुळेच माणसाचं सरासरी आयुष्य वाढलं असलं, तरी अनेक जण ‘क्षुल्लक’ कारणानं आणि अकालीच दगावल्याचंही समोर येतंय.

पण या सगळ्यांत प्रमुख गोष्ट कोणती? - तर माणूस दीर्घायुषी झाला, पण तो अकाली ‘म्हातारा’ही होतोय! नको त्यावेळी येणारं हे वृद्धत्व असावं तरी किती? माणूस आपल्या आहे त्या वयापेक्षा तब्बल दहा वर्षांनी म्हातारा होतो आहे किंवा दिसतो आहे! औषधोपचारांनी तुमच्या आयुष्याची दोरी लांब झालीही असेल, आपल्या पूर्वजांच्या तुलनेत तुम्ही जास्त जगतही असाल, पण तुमच्या आयुष्याची दोरी किती बळकट आहे? साध्या हिसक्यानं ही दोरी तुटत असेल, तर याबाबत अतिशय गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे, असं शास्त्रज्ञांना आज मनापासून वाटतं. नुकत्याच झालेल्या संशोधनानं हीच बाब अधोरेखित झाली आहे. 

समजा तुम्ही ३० वर्षांचे आहात, पण चाळिशीतले दिसता आहात.. समजा तुम्ही पन्नाशीचे आहात, पण आताच तुमचे गुडघे गेले आहेत, पाठीतून वाकले आहात आणि समजा तुम्ही साठीचे आहात, पण अनंत व्याधींनी तुम्हाला ग्रासलं आहे, खाटल्यावर पडून आहात, वय जसजसं वाढतंय, तसतसं तुम्ही देहानं तर ‘आहात’, पण कार्यानं जर संपला असाल, तर मग त्याबाबत काळजी करण्याची गोष्ट आहे.  

कॅनडातील मॅकमास्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे. मात्र, इतर संशोधनंही त्याला पूरक ठरली आहेत. या साऱ्या संशोधकांचं म्हणणं आहे, तुम्ही किती जगता, यापेक्षाही कसं जगता, त्याचा दर्जा काय, हे अधिक महत्त्वाचं आहे; पण माणूस असा अकालीच का म्हातारा दिसायला लागला? आहे त्या वयापेक्षा तब्बल दहा वर्षांनी तो मोठा, वृद्ध वाटावा याचं कारण कायं? खरं तर आपण नुसतं वृद्ध दिसायलाच लागलो नाही, तर आपल्या क्षमताही त्याप्रमाणे घटल्या आहेत आणि दुर्बल झालो आहोत, हे जास्त चिंताजनक आहे. चिंता, काळजी, आपल्या आयुष्याचं आपणच उलटं फिरवलेलं घड्याळ, दिवसाची रात्र आणि दिवसाचा केलेला दिवस, निसर्गाला दाखवलेला अंगठा आणि वाकुल्या.. याबरोबरच नैराश्य, डिप्रेशननं आपल्या आयुष्यावर घातलेला घाला आणि पर्यावरणानं आपल्यावर उगवलेला सूड.. या कारणांनी आपल्याला अकाली म्हातारपणाचा ‘शाप’ मिळाला आहे. 

बेल्जियममध्ये नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार हवेच्या प्रदूषणामुळे आजारपणाचं प्रमाण ३६ टक्क्यांनी वाढलं आहे, डेन्मार्कचं संशोधन सांगतं, कोविड होऊन गेलेल्या लोकांमधील मृत्यूची भीती २३ टक्क्यांनी वाढली आहे. जगातल्या दहापैकी नऊ लोक प्रदूषित हवेत जगतात. केवळ वायूप्रदूषणामुळे दरवर्षी जगात ४२ लाख लोकांचा मृत्यू होतो. गरीब, विकसनशील देशांतील स्थिती जास्तच भयानक आहे.  संपूर्ण जगच आज विषारी गॅस चेंबर आहे. श्वासावाटे विषारी वायू शरीरात गेल्यानं फुप्फुसं निकामी होत आहेत. नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, ओझोन यासारख्या वायूंनी तर माणसाच्या शरीराचं ‘खोकडं’ होऊ घातलं आहे. माणूस ‘म्हातारा’ होत चाललाय, यात यामुळेच नवल राहिलेलं नाही!..

गर्दीतही ‘एकटे’! म्हणूनच म्हातारपण! 
संशोधकांचं म्हणणं आहे, आपण माणसांच्या गर्दीत आहोत, सर्व बाजूंनी कोलाहल आहे, पण तरीही आपण ‘एकटे’ आहोत, आपल्याला विचारणारं कोणी नाही, आपण जगतोय की मरताेय, याविषयीदेखील कोणाला काहीच देणं-घेणं नाही, ही स्थितीही माणसाला आतून पोखरतेय आणि त्यामुळेच म्हातारपणाचा राक्षस आपल्या शरीर-मनाला गिळतोय! कोविडकाळात तर तोंडदेखला का होईना; पण शेजारी माणूसही नाही, या स्थितीनं तो आणखीच खंगत गेला!..

Web Title: what happened Why do you look 10 years older?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.