Cerebral Palsy: काय आहे सेरेब्रल प्लासी? ज्यामुळे सत्या नडेला यांच्या मुलाचं निधन झालं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 05:42 PM2022-03-01T17:42:39+5:302022-03-01T17:57:46+5:30
सेरेब्रल पाल्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो मुलाच्या हालचाली आणि फिरण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. हा आजार मेंदूच्या काही भागाला झालेल्या दुखापतीमुळे होतो.
मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे सीईओ सत्या नडेला यांचा मुलगा झैन नडेला यांचे निधन झाले आहे. ते २६ वर्षांचे होते आणि जन्मापासून सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त होते. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे याची माहिती दिली. हॉस्पिटलच्या सीईओने आपल्या मंडळाला दिलेल्या संदेशात असे लिहिले आहे की झैन त्याच्या संगीतावरील प्रेम आणि त्याच्या सुंदर हास्यासाठी लक्षात राहील.
काय आहे सेरेब्रल पाल्सी?
सेरेब्रल पाल्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो मुलाच्या हालचाली आणि फिरण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. हा आजार मेंदूच्या काही भागाला झालेल्या दुखापतीमुळे होतो, जो लहान मुलांमध्ये सर्वात सामान्य रोगांपैकी एक आहे. हा रोग संसर्गजन्य नाही. हा रोग जन्माच्या आधी, जन्माच्या दरम्यान किंवा जन्माच्या नंतर लगेच होऊ शकतो. ही लक्षणे सर्व मुलांमध्ये भिन्न असू शकतात.
काय आहेत याची कारणं?
सेरेब्रल पाल्सीच्या अनेक केसेसमध्ये याचं कारणं अद्याप अज्ञात आहे. मात्र खालील कारणांची शक्यता असू शकते असे तज्ज्ञ सांगतात.
- गर्भावस्थेच्या सुरुवातील एखाद्या आजाराचा गर्भातील भ्रुणावर परिणाम पडला असेल तर
- गर्भात भ्रुण विकसित होत असताना मेंदुपर्यंत रक्तप्रवाह थेट पोहोचला नसेल तर
- गर्भधारणे दरम्यान बाळाच्या मेंदुतील रक्तस्त्राव
- अपघातात लहान बाळाच्या डोक्याला मार लागणे
- गर्भातील बाळाच्या मेंदुच्या आसपास सुज येणे
सेरेब्रल पाल्सीची लक्षणं
- पेशींवर ताण येणे
- पेशींचे आकुंचन होणे
- शरीराच्या एका भागाची दुसऱ्या भागाच्या तुलनेत कार्य करण्याची क्षमता नसणे
- जेवायला किंवा गिळायला त्रास होणे
- बोलण्यात अडचण किंवा शब्द तोंडाद्वारे उच्चारण्यास अडचण निर्माण होणे
- भरपूर लाळ येणे
- गुडघे आतल्या भागात दुमडुन चालणे
- चालालयला त्रास होणे
- पेशींचं संतुलन न होणे
सेरेब्रल प्लासीवरील उपाय
बरेचदा सेरेब्रल प्लासीवर कायमचा इलाज करणं शक्य नाही. या आजारातून मुक्त होणं शक्य नसलं तरी वेळीच हा आजार समजला तर त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते.
- गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी- गर्भधारणेच्या काळात गर्भवती महिलांनी त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे. तसेन आनंदी रहावे.
- गर्भधारणेच्या काळातील लसीकरण- गर्भधारणेच्या काळात गर्भवती महिलांनी या काळात करण्यात येणारे लसीकरण अगदी काटेकोरपणे करावे. त्यात जराही हलगर्जीपणा करु नये.