फ्लू म्हणजे नक्की काय?... त्याबद्दलचे हे चार गैरसमज दूर करणं गरजेचं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 05:35 PM2022-07-07T17:35:13+5:302022-07-07T17:35:59+5:30

सध्या फ्लूच्या बाबतीत सर्वसाधारणपणे असलेल्या गैरसमजांप्रमाणेच गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या लक्षात आलेल्या काही सर्वसाधारण गैरसमजांबद्दल इथे चर्चा करूया.

What is flu and what is the misunderstandings about it | फ्लू म्हणजे नक्की काय?... त्याबद्दलचे हे चार गैरसमज दूर करणं गरजेचं!

फ्लू म्हणजे नक्की काय?... त्याबद्दलचे हे चार गैरसमज दूर करणं गरजेचं!

googlenewsNext

डॉ. विजय येवले, प्रमुख, इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई

अनेकांना फ्लू म्हणजे फक्त वातावरण बदलाचा एक परिणाम आहे, बाकी काही फार गंभीर नाही, असं वाटतं. मात्र, फ्लू अजिबात धोकादायक नसतो असं समजणं चूक आहे. खरंतर, फ्लू किंवा इन्फ्लूएन्झाच्या संदर्भात हा एक सर्वसाधारण गैरसमज आहे. सध्या फ्लूच्या बाबतीत सर्वसाधारणपणे असलेल्या गैरसमजांप्रमाणेच गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या लक्षात आलेल्या काही सर्वसाधारण गैरसमजांबद्दल इथे चर्चा करूया.

गैरसमज: फ्लू म्हणजे जरा जास्त प्रमाणात सर्दी होणे

फ्लू हा विषाणूंमुळे होणारा आजार म्हणजेच व्हायरल इन्फेक्शन आहे आणि विविध प्रकारच्या इन्फ्लुएन्झा विषाणूंमुळे हा आजार होतो. अनेकांना सौम्य स्वरुपाचा फ्लू होत असला तरी काहींसाठी हा आजार गंभीर ठरतो. विशेषत: लहान मुलांसाठी फ्लू साध्या सर्दीपेक्षा अधिक घातक असतो आणि अनेक लहान मुलांना यातून पूर्ण बरे होण्यासाठी वैद्यकीय साह्य लागू शकते. यामुळे फुफ्फुसात न्युमोनिआ होणे, कानातील जंतूसंसर्ग आणि डिहायड्रेशन असे त्रास होऊ शकतात. काही मुलांना हॉस्पिटलमध्येही जावे लागू शकते. थोडक्यात सांगायचे तर, ‘जरा जास्त सर्दी झालीय’ या पेक्षा हा आजार अधिक असतो आणि त्यात लक्ष देऊन वैद्यकीय साह्य घ्यावे लागते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शक्य तो आजार होऊ न देणंच चांगलं.

गैरसमज : आरोग्याच्या इतर समस्या असणाऱ्या लोकांनाच फ्लूच्या लशीची गरज भासते.

फ्लू कोणालाही होऊ शकतो. अर्थात, हे खरे आहे की काही लोकांना याचा धोका अधिक असतो. उदा. पाच वर्षांखालील मुले, विशेषत: दोन वर्षांहून कमी वयाच्या मुलांमध्ये फ्लूमुळे विविध प्रकारची गुंतागुंत होण्याचा धोका अधिक असतो, हे आपण जाणतोच. त्यामुळेच, भारतातील तज्ज्ञ सहा महिन्यांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना फ्लू लस देण्याचा सल्ला देतात. त्याचप्रमाणे, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांनाही फ्लू लस घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

गैरसमज : योग्य स्वच्छता राखणं फ्लूला प्रतिबंध करण्यास पुरेसे आहे

लहान मुले आणि प्रौढांना फ्लूपासून वाचवण्यासाठी फ्लू लस हा एक सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. त्याचप्रमाणे योग्य स्वच्छता राखल्यास फ्लूपासून संरक्षण मिळण्यासाठी विषाणूंचा संपर्क मर्यादित राखण्यासही साह्य होते. नियमितपणे हात धुणे, उगीच चेहरा, नाक किंवा तोंडाला हात न लावणे आणि पेन्सिल, स्टेशनरी, खेळणी, नळ, हँडल्स अशा सतत स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागांचे नियमित निर्जंतुकीकरण असे उपाय करता येतील.

गैरसमज: एकदा घेतलेली फ्लूची लस आयुष्यभर पुरते

दरवर्षी फ्लूचे विषाणू आपले स्वरूप बदलतात किंवा नव्या स्वरुपातील विषाणूंचा प्रसार होतो, असे निदर्शनास आले आहे. इतकेच नाही, फ्लू विषाणूंचे उत्परिवर्तनही होत असते. त्यामुळे, दरवर्षी लसीचे स्वरूपही बदलण्याची गरज भासू शकते. जेणेकरून, लोकांना अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण मिळेल. त्यामुळेच, इतर अनेक लसींच्या तुलनेत फ्लूची लस ही वार्षिक लस प्रकारची आहे आणि ती दरवर्षी घ्यावी. मुलांना सुरुवातीला दोन डोस देऊन त्यानंतर दरवर्षी लस देता येईल. मुलांच्या लसीचे वेळापत्रक समजून घेण्यासाठी पालकांनी त्यांच्या पेडिअॅट्रिशिअनशी संपर्क साधावा.

आणखी एक बाब लक्षात घ्यायला हवी की फ्लूची लागण झालेली व्यक्ती लक्षणे दिसून येण्याआधीच या आजाराचा प्रसार करू शकते. याच कारणामुळे, मी पालकांना आवाहन करतो की त्यांच्या पेडिअॅट्रिशिअनच्या सल्ल्यानुसार लहान मुलांना दरवर्षी फ्लूची लस द्या. भारतात साधारणपणे पावसाळ्याच्या आधी ही लस घेणे योग्य राहील. याच काळात इन्फ्लुएन्झाच्या रुग्णांमध्ये वाढ होते.

लस घ्या, योग्य स्वच्छता राखा आणि फ्लूच्या धोक्यांपासून सुरक्षित रहा.

(या लेखातील माहिती निव्वळ साधारण जनजागृतीच्या उद्देशाने दिलेली आहे. यातील कोणतीही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.)

Web Title: What is flu and what is the misunderstandings about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.