लक्षणे जाणवू न देता दृष्टी हिरावून घेणारा घटक आजार: ग्लुकोमा (काचबिंदू)

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 05:09 PM2023-02-15T17:09:35+5:302023-02-15T17:15:14+5:30

हा आजार नेमका काय आहे आणि तुमच्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेतल्यास भारतात या आजाराचा धोका कमी करण्यात मदत होऊ शकते.

What Is Glaucoma? Symptoms, Causes, Diagnosis, Treatment | लक्षणे जाणवू न देता दृष्टी हिरावून घेणारा घटक आजार: ग्लुकोमा (काचबिंदू)

लक्षणे जाणवू न देता दृष्टी हिरावून घेणारा घटक आजार: ग्लुकोमा (काचबिंदू)

googlenewsNext

(डॉ. मितेश जे बाफना,  कॅटरॅक्ट व रिफ्रॅक्टीव्ह सर्जन, एएसजी आय हॉस्पिटल, डोंबिवली) 

अंधत्व येण्यामागचे दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे ग्लुकोमा किंवा काचबिंदू. हा आजार संपूर्ण जगभरात आढळतो. ग्लुकोमा हा नेत्र विकारांचा एक समूह आहे, ज्यामुळे ऑप्टिक मज्जातंतूंचे नुकसान होऊन अंधत्व येते.  भारतामध्ये दरवर्षी या आजाराच्या १२ मिलियनपेक्षा जास्त केसेस आढळून येतात. डोळ्याच्या आतील दाब (इंट्राऑक्युलर प्रेशर) वाढणे हे यामागचे प्रमुख कारण असते. पण ग्लुकोमाच्या सर्वच केसेसमध्ये हेच कारण नसते आणि डोळ्याच्या आतील दाब वाढण्याच्या सर्वच केसेसमध्ये ग्लुकोमा होतोच असे नाही. हा आजार नेमका काय आहे आणि तुमच्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेतल्यास भारतात या आजाराचा धोका कमी करण्यात मदत होऊ शकते.

ग्लुकोमाचे प्रकार 

- प्रायमरी ओपन-अँगल ग्लुकोमा: हा ग्लुकोमाचा सर्वात जास्त आढळून येणारा प्रकार आहे.  जेव्हा डोळ्यातील ड्रेनेज अँगल खुला असतो पण डोळ्यातील द्राव नीट वाहून जात नाही तेव्हा हा आजार होतो.  यामुळे डोळ्यातील दाब वाढतो आणि ऑप्टिक मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते. 

-अँगल-क्लोजर ग्लुकोमा: जेव्हा डोळ्यातील ड्रेनेज अँगल बंद किंवा काही प्रमाणात ब्लॉक झालेला असतो तेव्हा देखील डोळ्यातील दाब वाढतो. 

-नॉर्मल-टेन्शन ग्लुकोमा: जेव्हा डोळ्यातील दाब सर्वसामान्य श्रेणीत असतो तेव्हा या प्रकारचा ग्लुकोमा होतो. नॉर्मल-टेन्शन ग्लुकोमाचे कारण संपूर्णपणे समजून येत नाही पण ऑप्टिक मज्जातंतूंना पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा न झाल्यामुळे ते होत असावे.

व्यक्तीचे वय जसजसे वाढत जाते तसतशी ग्लुकोमा होण्याची शक्यता वाढते आणि ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना याचा धोका सर्वात जास्त असतो. भारतात ४० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ग्लुकोमा रुग्णांची संख्या ११ मिलियनपेक्षा जास्त आहे. वय झालेल्या व्यक्तींमध्ये ग्लुकोमा होण्याचे प्रमाण अधिक जास्त असते असे जरी असले तरी विविध वयोगटात ग्लुकोमाचे वेगवेगळे प्रकार आढळून येतात.  

1)  काहीवेळा नवजात बाळाला त्याचा त्रास होतो, त्याला 'कॉन्जेनिटल ग्लुकोमा' म्हणतात. 
2)  ३ ते १० वर्षे वयोगटातील लहान मुलांना 'डेव्हलपमेंटल ग्लुकोमा' होऊ शकतो. 
3) १० ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींना होणाऱ्या विकारास 'ज्युवेनाईल ग्लुकोमा' म्हणतात.

लक्षणे:

स्थितीच्या गांभीर्यानुसार विविध लक्षणे आढळून येतात. काही केसेसमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात काहीच लक्षणे आढळून येत नाहीत पण विकार जसजसा वाढत जातो, पुढील लक्षणे आढळून येऊ शकतात. 

•    दृष्टी कमी होणे, खासकरून परिधीय दृष्टी कमी होणे. 
•    दिवांभोवती प्रभामंडल दिसणे. 
•    डोळ्यांमध्ये वेदना होणे. 

ही लक्षणे सौम्य असू शकतात आणि जोपर्यंत दृष्टी लक्षणीय प्रमाणात कमी होत नाही तोपर्यंत दिसून देखील येत नाहीत.

उपचार 

ग्लुकोमावर कोणताही इलाज नाही पण औषधोपचार आणि शस्त्रक्रियेने त्याचे व्यवस्थापन केले जाऊ शकते. डोळ्यात घालायचे ड्रॉप्स आणि गोळ्या अशा औषधांनी डोळ्यातील दाब कमी करण्यात मदत होऊ शकते. काही केसेसमध्ये या औषधांमुळे दृष्टी कमी होण्याचा वेग कमी केला जाऊ शकतो किंवा त्याला आळा घातला जाऊ शकतो. पण जर दृष्टी आधीच कमी झालेली असेल तर ती काही परत मिळवली जाऊ शकत नाही. काही केसेसमध्ये जेव्हा औषधे प्रभावी ठरत नाहीत तेव्हा शस्त्रक्रिया करण्यास सुचवले जाते. ग्लुकोमासाठी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात, यामध्ये लेजर सर्जरी आणि पारंपरिक पद्धतीच्या शस्त्रक्रियेचा समावेश होतो.

गैरसमज आणि तथ्य 

ग्लुकोमाविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत, ते दूर होणे गरजेचे आहे.

•    गैरसमज - ग्लुकोमा फक्त वयस्क व्यक्तींनाच होतो. 
तथ्य - ग्लुकोमा होण्याचा धोका वयोमानानुसार वाढतो हे जरी खरे असले तरी हा विकार कोणालाही होऊ शकतो. तुमचे वय कितीही असू द्या, ग्लुकोमा किंवा डोळ्यांचे इतर आजार झालेले नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी नियमितपणे डोळे तपासून घेणे महत्त्वाचे आहे. 

•    गैरसमज - ग्लुकोमा काही गंभीर नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले तरी चालते. 
तथ्य - हे चूक आहे. ग्लुकोमावर जर उपचार केले नाहीत तर अंधत्व येऊ शकते.  दृष्टी कमी होऊ नये यासाठी डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन त्यांनी सांगितलेले उपचार व सूचना यांचे नीट पालन करावे. 

•    गैरसमज - नैसर्गिक उपाययोजना करून ग्लुकोमा बरा केला जाऊ शकतो. 
तथ्य - काही नैसर्गिक उपायांमुळे डोळ्यातील दाब कमी करण्यात मदत होऊ शकते. पण नैसर्गिक उपाययोजना वैद्यकीय उपचारांना पर्याय म्हणून वापरल्या जाऊ शकत नाहीत. डोळ्यांच्या डॉक्टरकडून तपासणी करून त्यांनी सांगितलेले उपचार व सूचना यांचे पालन करणे गरजेचे आहे.

ग्लुकोमा किंवा डोळ्यांचे इतर काही विकार झाले आहेत का किंवा होत आहेत का याची खात्री करून घेण्यासाठी डोळ्यांची नियमितपणे तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. वय, कौटुंबिक इतिहास, डोळ्यातील दाब वाढणे आणि मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार यामुळे ग्लुकोमाचा धोका वाढतो. तुमच्या बाबतीत यापैकी कोणताही धोका असेल किंवा तुम्हाला ग्लुकोमाची लक्षणे जाणवत असतील तर लवकरात लवकर डोळ्यांच्या डॉक्टरकडून तपासणी करून घ्या. आजाराचे लवकरात लवकर निदान केले गेल्यास आणि त्यावर उपचार केल्यास दृष्टी कमी होण्याचा वेग कमी केला जाऊ शकतो किंवा त्याला प्रतिबंध घातला जाऊ शकतो.

Web Title: What Is Glaucoma? Symptoms, Causes, Diagnosis, Treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.