काय आहे लहान मुलांना होणारा 'हँड फूट माउथ' आजार? ज्यामुळे सध्या हैराण झालेत पालक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 01:35 PM2022-08-02T13:35:20+5:302022-08-02T13:37:17+5:30
Hand Foot Mouth Disease Symptoms : हा विषाणूजन्य आजार संसर्गजन्य असून स्पर्शातून तो वेगाने पसरत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. या आजाराचा प्रादुर्भाव कोणत्याही ऋतूत होऊ शकतो. उन्हाळा आणि पावसाळ्यात रोगाची शक्यता अधिक असते.
Hand Foot Mouth Disease Symptoms : सध्या राज्यातील काही शहरांमध्ये लहान मुलांमध्ये पसरणाऱ्या ‘हँड, फुट माऊथ डिसीज’ने (Hand Foot Mouth Disease) हैराण केलं आहे. या आजाराचं नाव आहे, ‘एचएफएमडी’ अर्थात ‘हँड फूट माऊथ डिसीज’. या आजारांचे रूग्ण काही प्रमाणात आढळत असून १ ते १० वर्षे वयोगटातील लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांनाही या आजाराची बाधा होऊ शकते.
हा विषाणूजन्य आजार संसर्गजन्य असून स्पर्शातून तो वेगाने पसरत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. या आजाराचा प्रादुर्भाव कोणत्याही ऋतूत होऊ शकतो. उन्हाळा आणि पावसाळ्यात रोगाची शक्यता अधिक असते. विशिष्ट प्रकारच्या जंतुंच्या प्रादुर्भावाने या आजाराचा फैलाव होतो.
काय आहेत लक्षणं?
लहान मुलांना ताप येणे, तळहात, तळपाय व तोंडाच्या आसपास आणि घशातून बारीक पुटकुळ्या येणे, त्यांना खाज सुटणे आणि प्रचंड वेदना अशी या आजाराची लक्षणे आहेत. या आजाराची लक्षणे आढळल्यानंतर त्वरीत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधोपचार करणे गरजेचे आहे. साधारणपणे सहा ते सात दिवस या आजाराची लक्षणे असतात. या आजारामुळे आलेले पुरळ बरे झाल्यानंतरही काही दिवस त्याचे डाग जात नाहीत. मात्र, नंतर ते विरळ होतात. उलट्या, मळमळणे, अंगदुखी आणि ताप ही आजाराची प्राथमिक लक्षणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
त्रासदायक बाब म्हणजे, या आजारात लहान मुलांच्या घशात लालसर पुळ्या येतात. त्यामुळे घसा खूप दुखतो आणि खाऊ खाताना, गिळताना त्यांना खूप त्रास होतो. भीतीनं मुलं खाणं सोडतात आणि मुलं तसंच त्यांचे पालकही हैराण होतात. साधारणपणे पाच ते सहा दिवस या पुळ्या अंगावर राहतात.
कसा होतो हा आजार?
हा आजार ‘एन्टरोव्हायरस’ कुटुंबातल्या विषाणूंमुळे होतो. ‘कॉक्सॅकी व्हायरस’, ‘इकोव्हायरस’ आणि ‘एन्टरोव्हायरस’ अशा या व्हायरसच्या पोटजाती आहेत. हा आजार झालेल्या मुलाच्या संपर्कात आलं असता, शिंकांमधून, खोकल्यातून हे व्हायरस पसरू शकतात. रूग्णाने वापरलेल्या वस्तू जसं की, रूमाल, टॉवेल वगैरे दुसऱ्या मुलांसाठी वापरल्यामुळेही हा आजार पसरू शकतो. या आजाराचे विषाणू शरीरात शिरल्यापासून पाच ते सहा दिवसात आजाराची लक्षणं दिसू लागतात. पहिले दोन-तीन दिवस थोडा ताप येतो. सर्दी-खोकलाही थोड्या प्रमाणात होऊ शकतो. मग हातापायावर पुळ्या दिसू लागतात.
या आजाराविरूद्ध कोणतंही नेमकं व्हायरसविरोधी औषध उपलब्ध नाही. त्यामुळे त्या-त्या मुलातल्या लक्षणानुसार उपचार करावे लागतात. उदा, तापासाठी औषध, खाज कमी करायचं औषध, घशाला बरं वाटावं म्हणून औषध इ. प्रतिजैविकांचा या आजारात फारसा काहीही उपयोग नाही.
काय घ्यावी काळजी?
हा आजार दीर्घकालीन परिणाम करणारा किंवा अतीगंभीर नसला तरी त्रासदायक व संसर्गजन्य असल्याने पालकांनी काळजी घेणे व सावधगिरी बाळगणे गरजेचे ठरते. पाल्य या आजाराने बाधित असेल तर त्याला शाळेत पाठविणे टाळावे, असेही तज्ज्ञांचे मत आहे. पालकांना या आजाराची लक्षणे आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.