काय आहे लेप्टोस्पायरोसिस आजार आणि काय असतात त्याची लक्षणे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 04:37 PM2022-07-20T16:37:24+5:302022-07-20T16:37:44+5:30

Leptospirosis disease : हा आजार म्हणजे एक सौम्य संसर्ग असतो पण तो गंभीर आजाराला कारणीभूत ठरू शकतो किंवा काही दुर्मिळ केसेसमध्ये रुग्णाचा मृत्यू देखील ओढवू शकतो.

What is Leptospirosis disease and what are its symptoms? | काय आहे लेप्टोस्पायरोसिस आजार आणि काय असतात त्याची लक्षणे?

काय आहे लेप्टोस्पायरोसिस आजार आणि काय असतात त्याची लक्षणे?

googlenewsNext

(डॉ. श्वेता शाह, लीड कन्सल्टन्ट, मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शन प्रिव्हेन्शन,  कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल)

लेप्टोस्पायरोसिस हा संसर्ग असून तो लेप्टोस्पायरा या एक प्रकारच्या जंतूमुळे होतो. हा झूनॉटिक आजार आहे, म्हणजे हा संसर्ग मनुष्य आणि उंदीर, कुत्रे, गाय यासारख्या प्राण्यांना देखील होऊ शकतो. सर्वसामान्यतः हा आजार म्हणजे एक सौम्य संसर्ग असतो पण तो गंभीर आजाराला कारणीभूत ठरू शकतो किंवा काही दुर्मिळ केसेसमध्ये रुग्णाचा मृत्यू देखील ओढवू शकतो. म्हणूनच या संसर्गाबद्दल काही वैज्ञानिक माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.  

हा आजार कसा पसरतो?

प्राण्यांनी ज्यामध्ये लघवी केली आहे असे दूषित पाणी आणि मातीमध्ये हा सूक्ष्मजंतू असतो.  जेव्हा एखादी व्यक्ती या पाण्यातून किंवा मातीमधून चालते तेव्हा शरीरावरील एखाद्या खुल्या जखमेतून (जी एरव्ही सहज दिसून येत नाही) किंवा डोळे किंवा तोंड यासारख्या श्लेष्मल त्वचेतून शरीरात प्रवेश करू शकतो.  त्यानंतर हा जंतू रक्तप्रवाहात शिरतो व संपूर्ण शरीरात पसरतो. 

मुंबईमध्ये, खासकरून मान्सूनमध्ये पावसाचे पाणी, सांडपाणी किंवा साठून राहिलेले दूषित पाणी यामधून जेव्हा लोक चालतात तेव्हा लेप्टोस्पायरा जंतूचा संसर्ग पसरण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.  काहीवेळा दूषित पाणी प्यायल्याने देखील संसर्ग होऊ शकतो. दूषित पाणी असलेली तळी व नद्यांमध्ये पोहोल्याने, त्या पाण्यातून चालल्याने, कायाकिंग, राफ्टिंग केल्याने देखील हा आजार होऊ शकतो.  

या आजाराची लक्षणे कोणती असतात? 

लेप्टोस्पायरा जंतूने दूषित स्रोताशी एखाद्या व्यक्तीचा संपर्क आल्यापासून ती व्यक्ती आजारी पडेपर्यंतचा कालावधी दोन दिवसांपासून चार आठवड्यांपर्यंतचा असू शकतो.

-  माणसांमध्ये लेप्टोस्पायरोसिसची अनेक लक्षणे दिसून येतात. खूप ताप येणे, थंडी वाजणे, पुरळ येणे, डोकेदुखी, सांधेदुखी अशी सौम्य लक्षणे दिसून येऊ शकतात. काहीवेळा पोटात दुखणे, उलट्या होणे, अतिसार असे देखील त्रास होऊ शकतात. पावसाळ्यात होणाऱ्या इतर अनेक आजारांची देखील हीच लक्षणे असतात त्यामुळे काहीवेळा रुग्णाकडून वैद्यकीय मदत घेण्यात देखील उशीर केला जाऊ शकतो.

- बऱ्याचदा संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात सौम्य लक्षणे दिसून येतात.  त्यानंतर त्या व्यक्तीची सर्व लक्षणे निघून जातात आणि दुसऱ्या टप्प्यात किडनी व यकृत यांच्यावर परिणाम करणारी अतिशय गंभीर लक्षणे दिसून येऊ लागतात. कावीळ (त्वचा व डोळे पिवळे पडणे), मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावामुळे डोळे लाल होणे आणि त्यानंतर किडनी, यकृत निकामी होणे किंवा मेंदुज्वर असे आजार देखील होऊ शकतात.

आजाराचे निदान कसे केले जाते?

साठलेले पाणी किंवा दूषित माती यांच्याशी रुग्णाचा गेल्या एका महिन्यात संपर्क आला होता का ही डॉक्टरांसाठी एक सर्वात महत्त्वाची माहिती ठरते. तसे झाले असल्यास लेप्टोस्पायरोसिसची दाट शक्यता वर्तवली जाऊ शकते.

- आजाराच्या निदानाची खात्री करून घेण्यासाठी रक्ताची तपासणी केली जाते. संपूर्ण ब्लड काउंट, किडनी व यकृत यांचे कार्य दर्शवणाऱ्या तपासण्या तसेच रक्तामध्ये जंतू आहे अथवा नाही याची तपासणी किंवा लेप्टोस्पायरोसिसच्या अँटीबॉडीजचा (ELISA किंवा मायक्रोस्कोपिक अग्ल्युटीनेशन टेस्ट “MAT” मार्फत IgM आणि IgG डिटेक्शन) शोध घेणे यांचा यामध्ये समावेश असतो. PCR टेस्ट्स देखील उपलब्ध आहेत आणि संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उपयोगी ठरू शकतात.  

संसर्गाला आळा कसा घालावा? 

- प्राण्यांची लघवी ज्याठिकाणी असेल अशा ठिकाणांशी संपर्क टाळावा, साठून राहिलेल्या पाण्यामध्ये जाणे टाळावे. प्राण्यांच्या लघवीशी आपल्या शरीराचा थेट संपर्क येऊ नये यासाठी प्राण्यांसोबत काम करताना पूर्ण कपडे घालावेत, बंद शूज, हातमोजे इत्यादींचा वापर करावा. 

- सांडपाणी किंवा पुराच्या पाण्याशी थेट संपर्क आल्यास आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतर अँटिबायोटिक्स प्रोफिलॅक्सिस (उदाहरणार्थ डॉक्सिसायक्लीन किंवा अझिथ्रोमायसिन)

-पाळीव प्राण्यांमध्ये संसर्गाला प्रतिबंध घालणे देखील महत्त्वाचे आहे. 

आजकाल बहुतांश घरांमध्ये पाळीव प्राणी असतात. त्यांना संसर्ग होऊ शकतो किंवा त्यांच्यामार्फत संसर्ग पसरू शकतो. बऱ्याचदा त्यांना काहीच लक्षणे दिसून येत नाहीत.  त्यामुळे पाळीव प्राण्यांमध्ये संसर्गाला आळा घालणे महत्त्वाचे आहे.  उंदीर, जंगली प्राणी आणि प्राण्यांचे मृतदेह यांच्यापासून पाळीव प्राण्यांना दूर ठेवावे. भरपूर पाऊस पडून गेल्यावर किंवा पुरानंतर पाळीव प्राण्यांना दूषित पाण्यात जाऊ देऊ नये. 

लेप्टोस्पायरोसिस बरा केला जाऊ शकतो का?

डॉक्सिसायक्लीन, अझिथ्रोमायसिन, सेफट्रीएक्सन यासारखी अँटिबायोटिक्स देऊन लेप्टोस्पायरोसिस पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो. ही अँटिबायोटिक्स तोंडावाटे किंवा शिरेच्या आत दिली जाऊ शकतात.  रुग्ण घरी असो किंवा रुग्णालयात त्याच्या/तिच्या शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे राखले गेले पाहिजे.  ताप आणि दुखण्यांसाठी लक्षणांवरील इतर उपचार आणि पूरक उपचार केले जातात. रुग्ण अधिक गंभीर झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये 24*7अशा आजारावर उत्तम सेवा उपलब्ध आहेत.

Web Title: What is Leptospirosis disease and what are its symptoms?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.