हार्मोन्सचा मधुमेहाशी काय संबंध? जाणून घ्या सर्व काही!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:03 PM2023-02-13T12:03:26+5:302023-02-13T12:04:46+5:30

इन्शुलिनची कमतरता झाल्यास काही हार्मोन्समध्येही असमतोल निर्माण होऊ शकतो. या हार्मोन्सच्या असंतुलनाची लक्षणे व धोके समजून घेणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फार महत्त्वाचे आहे.

What is the connection between hormonal imbalance and diabetes Learn everything related to this by Special Article by Dr Tanvi Patel | हार्मोन्सचा मधुमेहाशी काय संबंध? जाणून घ्या सर्व काही!

हार्मोन्सचा मधुमेहाशी काय संबंध? जाणून घ्या सर्व काही!

googlenewsNext

डॉ. तन्वी मयूर पटेल

मधुमेहालाही ‘अंत:स्रावी प्रणाली ’चा विकार म्हटले जाते हे फार जणांना माहीत नाही. अंत:स्रावी (एण्डोक्राइन) प्रणालीत आठ ग्रंथींचा समावेश होतो आणि प्रत्येक ग्रंथी वेगळा ‘हार्मोन ’ निर्माण करते. हे हार्मोन्स शरीरातील रासायनिक प्रतिक्रियांमध्ये संप्रेरकाचे काम करतात. इन्शुलिन हा स्वादुपिडांतील एण्डोक्राइन ग्रंथींद्वारे निर्माण केला जाणारा असाच एक हार्मोन आहे. शरीराद्वारे रक्तातील साखरेचे रूपांतर ऊर्जेत केले जाण्याच्या रासायनिक प्रक्रियेचे नियंत्रण इन्शुलिन करते.

इन्शुलिनची कमतरता झाल्यास किंवा उपलब्ध इन्शुलिनला प्रतिसाद देण्याची शरीराची क्षमता कमी झाल्यास त्याचे पर्यवसान मधुमेहात होते. ही क्षमता कमी झाल्यामुळे अन्य काही हार्मोन्समध्येही असमतोल निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, पौगंडावस्थेतील मुलांमधील वाढीचा हार्मोन, स्त्रियांमधील इस्ट्रोजेन आणि पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन. या हार्मोन्सच्या असंतुलनाची लक्षणे व धोके समजून घेणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फार महत्त्वाचे आहे.

मधुमेह आणि पौगंडावस्थेतील मुले (टीनएजर)

पौगंडावस्थेत मुलगे व मुलींमध्ये जलद गतीने वाढ होत असते. या वाढीचे नियमन ‘ग्रोथ हार्मोन’द्वारे केले जाते. या वयात हा हार्मोन शरीरात मोठ्या प्रमाणात निर्माण केला जातो. मात्र, हा हार्मोन शरीराची इन्शुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता कमी करतो. ही पौगंडावस्थेतील मुलामुलींमधील सामान्य प्रक्रिया आहे आणि त्यासाठी वैद्यकीय उपचारांची आवश्यकता नसते. मात्र, पौगंडावस्थेतील मुलांमध्ये टाइप १ (पहिल्या प्रकारचा) मधुमेह असेल तर या प्रक्रियेत इन्शुलिनची गरज आणखी वाढते . टाइप १ मधुमेह असलेल्या पौगंडावस्थेतील मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज पालकांना भासते. इन्शुलिनच्या डोसचे समायोजन करण्यासाठी त्यांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. 
त्याचप्रमाणे, पौगंडावस्थेत स्थूलत्व असेल तर धोका अधिक वाढतो. स्थूलत्वामुळे शरीराची इन्शुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होते आणि मधुमेहाच्या दृष्टीने स्थूलत्व हा धोक्याचा घटक आहे हे आपल्याला दीर्घकाळापासून माहीत आहे. पौगंडावस्थेतील मुले स्थूल असतील तर त्यांच्यात टाइप २ मधुमेह होण्याचा धोकाही अधिक असतो.

मधुमेह आणि प्रौढत्व

टाइप २ मधुमेहाने ग्रासलेल्या पुरुषांमध्ये शरीराची इन्शुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता कमी झाल्यामुळे टेस्टोस्टेरॉनचा स्रावही कमी होतो. या अवस्थेची लक्षणे म्हणजे कामप्रेरणा कमी होणे, थकवा येणे आणि चित्तवृत्तींमध्ये (मूड्स) वारंवार बदल होणे होय.  टाइप २ मधुमेह असलेल्या पुरुषांनी, टेस्टोस्टेरॉन पातळी तपासून घेणे गरजेचे आहे का, हे त्यांच्या डॉक्टरांना विचारले पाहिजे. मधुमेह नसलेल्या पण टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेचा त्रास असलेल्या पुरुषांमध्ये टाइप २ मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. कारण, शरीरातील टेस्टोस्टेरॉनची निर्मिती कमी झाल्यास, इन्शुलिनला प्रतिसाद देण्याची शरीराची क्षमताही कमी होते.

स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनच्या पातळ्यांमध्ये चक्राकार बदल होतात आणि त्याचमुळे त्यांना मासिक पाळी येते. या चक्राकार बदलांचा शरीराच्या इन्शुलिनला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणात चढउतार होऊ शकतात. उदाहरणार्थ, मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी प्रोजेस्टेरॉनची पातळी अधिक असते, त्यामुळे शरीराची इन्शुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.  ही शरीरातील सामान्य प्रक्रिया आहे. मात्र, ज्या स्त्रियांना टाइप २ मधुमेह आहे, त्यांच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत झालेले बदल अधिक तीव्र स्वरूपाचे असतात आणि म्हणून त्यांनी मासिक पाळीच्या आधी, मासिक पाळी दरम्यान व मासिकपाळी संपल्यानंतर रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

टाइप २ मधुमेह असलेल्या स्त्रियांमध्ये शरीराच्या इन्शुलिनला प्रतिसाद देण्याच्या कमी झालेल्या क्षमतेमुळे इस्ट्रोजेनची कमतरताही होऊ शकते. त्यामुळे स्तनांचा, अंडाशयाचा, गर्भाशयमुखाचा कॅन्सर होण्याचा धोकाही वाढतो . त्याचप्रमाणे स्थूलत्व आणि टाइप २ मधुमेह अशा दोन्ही अवस्था असल्यास त्यांतून मासिक पाळी अनियमित होणे व वंध्यत्व  यांसारख्या समस्याही काही स्त्रियांमध्ये निर्माण होऊ शकतात. टाइप २ मधुमेहाने ग्रासलेल्या स्त्रियांनी, त्यांच्या हार्मोन्सच्या पातळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी काही चाचण्या करण्याची गरज आहे का, हे डॉक्टरांना विचारून घ्यावे. मासिक पाळीच्या दरम्यान रक्तातील साखरेच्या प्रमाणात होणाऱ्या चढउतारांबाबतही त्यांनी डॉक्टरांशी बोलावे. 
सामान्य गरोदरपणातही रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि ही अवस्था आईपासून गर्भालाही होऊ शकते. मात्र, मधुमेह असलेल्या स्त्रियांमध्ये यामुळे रक्तातील साखर अनियंत्रित प्रमाणात वाढू शकते आणि त्यांच्या औषधांमध्ये किंवा इन्शुलिनच्या डोसमध्ये बदल करण्याची आवश्यकता भासते.ॉ

मधुमेह आणि वृद्धत्व

पुरुषांमध्ये वय वाढू लागते, तशी टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ लागते. मधुमेही पुरुषांमध्ये ही पातळी आणखी जास्त प्रमाणात कमी होते आणि टेस्टोस्टेरॉन कमतरतेची लक्षणे दिसू लागतात. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळात इस्ट्रोजेनची पातळी कमी होते. शरीरात खूप बदल होतात. उदाहरणार्थ, ओटीपोटाच्या भागात खूप मेद साठते. त्यामुळे टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो. ज्यांना आधीपासून मधुमेह आहे, त्यांच्यापुढे वेगळीच आव्हाने उभी राहतात: हॉट फ्लॅशेस, छातीत धडधड व घाम येणे यांसारख्या रजोनिवृत्तीच्या  लक्षणांमध्ये वाढ होते. रजोनिवृत्तीच्या प्रक्रियेतून जाणाऱ्या स्त्रियांनी रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासत राहावी आणि मधुमेह असलेल्या स्त्रियांनी, त्यांना रजोनिवृत्तीदरम्यान औषधे बदलण्याची गरज आहे का, याची विचारणा डॉक्टरांकडे करावी.

मधुमेह ही एक जटील अवस्था आहे, कारण, यामध्ये वेगवेगळ्या हार्मोन्समध्ये, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, परस्परक्रिया घडत असतात. एण्डोक्रायनल विकारांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना एण्डोक्रिनोलॉजिस्ट म्हणतात. मधुमेहींनी एण्डोक्रिनोलॉजिस्टसोबत नियमितपणे चर्चा करत राहावी आणि मधुमेह व्यवस्थापनाची प्रक्रिया व्यवस्थित चालली असल्याची तसेच आयुष्यात या प्रक्रियेची पुरेशी निष्पत्ती मिळत असल्याची खात्री करून घ्यावी.

-डॉ. तन्वी मयूर पटेल
(लेखिका एण्डोक्रिनोलॉजिस्ट आहेत.)

Web Title: What is the connection between hormonal imbalance and diabetes Learn everything related to this by Special Article by Dr Tanvi Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.