लहान मुलं आणि वयोवृद्धांना का दिला जातो बदामाची साल न खाण्याचा सल्ला? जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 12:33 PM2024-09-04T12:33:33+5:302024-09-04T12:37:23+5:30
Almond Peels Side Effects : अनेकांना प्रश्न पडतात की, बदामाची साल काढून टाकावी की नाही? या सालीमुळे काही नुकसान होतं का? लहान मुले आणि वयोवृद्धांना बदामाची साल न खाण्याचा सल्ला का दिला जातो?
Almond Peels Side Effects : बदाम खाण्याचे आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. याने शरीराला शक्ती मिळते आणि मेंदुची क्षमताही वाढते. बरेच लोक बदामाचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करतात. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये याचा समावेश केला जातो. काही लोक बदाम रात्रभर भिजवून ठेवून सकाळी खातात. भिजवलेले बदाम खाताना लोक त्याची साल काढून टाकतात. पण अनेकांना प्रश्न पडतात की, बदामाची साल काढून टाकावी की नाही? या सालीमुळे काही नुकसान होतं का? लहान मुले आणि वयोवृद्धांना बदामाची साल न खाण्याचा सल्ला का दिला जातो?
बदामाची साल फायदेशीर की नुकसानकारक?
अनेक एक्सपर्ट सांगतात की, बदामाच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यात अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर असतं. ज्यामुळे केस आणि त्वचेला पोषण मिळतं. म्हणजे बदामाची सालही शरीरासाठी फायदेशीर असते.
बदाम सालीसोबत खावेत की नाही?
अनेकांना प्रश्न पडत असतो की, बदाम सालीसोबत खावेत की साल काढून? एक्सपर्टनुसार, अनेक जुन्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, भिजवलेले बदाम नेहमी साल काढूनच खावेत. कारण पाण्यात भिजवल्यावर सालीमध्ये टॅनिन नावाचं तत्व तयार होतं. जे शरीरासाठी नुकसानकारक असतं.
भिजवलेल्या बदामाची साल काढली तर त्याची शक्ती आणखी वाढते. मात्र, न्यूटिशन आणि साइंटिफिक आधारावर नुकत्याच समोर आलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, बदामाची सालही खूप फायदेशीर असते. जर बदाम सालीसोबत खाल्लेत तर शरीराला अनेक फायदे मिळतात. यातून शरीराला फायबर आणि व्हिटॅमिन ई मिळतं. वय आणि परिस्थितीनुसार, बदाम सालीसोबत किंवा साल काढून खाल्ले पाहिजेत.
लहान मुले आणि वृद्धांसाठी बदामाची साल नुकसानकारक कशी?
नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर कुणाला पचनासंबंधी समस्या असेल तर त्यांचं पचन तंत्र अनेक गोष्टी योग्यपणे पचवू शकत नाही. जास्तकरून वयोवृद्ध आणि लहान मुलांचं पचन तंत्र कमजोर असतं. त्यामुळे त्यांना साल काढूनच बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्यांना पुरेसं पोषण मिळावं. जर त्यांनी सालीसोबत बदाम खाल्लेत तर पचनासंबंधी समस्या होऊ शकते. जर पचनासंबंधी समस्या नसेल तर तुम्ही बदाम सालीसोबतही खाऊ शकता.
एका दिवसात किती बदाम खाऊ शकता?
एका रिपोर्टनुसार, एक वयस्क व्यक्ती एक दिवसात कमीत कमी २३ बदाम खाऊ शकते. इतके बदाम खाल्ल्याने शरीराला पुरेसं प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल आणि हेल्दी फॅट मिळतं. यापेक्षा जास्त बदाम खाल्ल्याने कॅलरी वाढू शकतात आणि फॅटही वाढू शकतं.
वातावरणानुसार खा बदाम
आयुर्वेदानुसार, बदामामुळे वात आणि पित्त दोष संतुलित करण्यास मदत मिळते. बदाम गरम असतात त्यामुळे यांचं जास्त सेवन केल्यास पित्त दोष वाढू शकतो. ज्यामुळे पोटासंबंधी समस्या जसे की, अॅसिडिटी, पोटात जळजळ होऊ शकते. थंडीच्या दिवसांमध्ये जास्त बदाम खाऊ शकता. तर उन्हाळ्यात बदाम भिजवून खाल्ले पाहिजेत.
भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे
बदाम भिजवून ठेवल्याने ते नरम होतात. अशात ते चावणं सोपं होतं. त्याशिवाय बदामाच्या सालीमध्ये फायटिक अॅसिड असतं जे पोषक तत्वांचं अवशोषण योग्यपणे होण्यास रोखतं. भिजवलेल्या बदामात हे तत्व कमी असतं.