काय आहे कोरानाचा XE व्हेरिएंट? किती वेगाने पसरतो? जाणून घ्या तज्ज्ञांकडून उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 05:55 PM2022-04-07T17:55:49+5:302022-04-07T17:57:10+5:30
Corona : महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स सध्या कोणत्याही निर्बंधांचा पुनर्विचार करत नाही. लोकांनी घाबरून जाऊ नये आणि खबरदारी घ्यावी, असेही डॉ. गौतम भन्साळी यांनी म्हटले आहे
मुंबई : कोरोना व्हायरस महामारीचा धोका अद्याप संपलेला नाही. आशिया आणि युरोपातील अनेक देश कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत आहेत. कोरोनाच्या अनेक नवीन व्हेरिएंटमुळे नवीन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
यादरम्यान भारतात XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळल्याचा अहवाल बीएमसीने दिला आहे. मात्र, केंद्र सरकारने अधिकृतपणे XE व्हेरिएंटची कोणतीही पुष्टी झालेली प्रकरणे नोंदवली नाहीत आणि या बातमीचे खंडन केले आहे.
आता प्रश्न असे आहेत की, XE व्हेरिएंट किती सांसर्गिक आहे आणि नागरिकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गौतम भन्साळी यांच्याकडून...
डॉ. गौतम भन्साळी यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, XE व्हेरिएंट हा ओमायक्रॉनचा एक भाग आहे जो B.A.1 आणि B.A.2 च्या संयोजनाने बनलेला आहे. XE प्रकार 10 टक्के अधिक संसर्गजन्य आहे परंतु त्याची लक्षणे तितकी गंभीर नाहीत. लंडनमध्ये आतापर्यंत या व्हेरिएंटची 600 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. परंतु धोक्याची कोणतीही चर्चा नाही.
मार्च महिन्यात, दक्षिण आफ्रिकेतील एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, परंतु एप्रिलमध्ये बीएमसीने ते XE व्हेरिएंट असल्याची पुष्टी केली. याचे कारण म्हणजे जीनोम प्रशिक्षणाला वेळ लागतो, त्यामुळे एक महिन्यानंतर बीएमसीने माहिती दिली.
महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स सध्या कोणत्याही निर्बंधांचा पुनर्विचार करत नाही. लोकांनी घाबरून जाऊ नये आणि खबरदारी घ्यावी, असेही डॉ. गौतम भन्साळी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे की, महिलेच्या रिपोर्टची पुन्हा तपासणी केली जाईल आणि त्यानंतर XE व्हेरिएंट आहे की नाही याची पुष्टी केली जाईल.