मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून काय करावे? टाटा रुग्णालयाने घेतली कार्यशाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:19 AM2024-01-15T11:19:42+5:302024-01-15T11:20:10+5:30
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि टाटा मेमोरिअल सेंटर यांच्या सहकार्याने राज्यात २०१६ मध्ये ‘ॲक्सेस टू ॲफोर्डेबल कॅन्सर केअर फॉर ऑन अँड ऑल’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
मुंबई : तोंडाचा कर्करोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय असावेत, यासंदर्भात तपासणी कशी करावी, निदान कसे करावे, कोणत्या टप्प्यावर असताना त्यावर उपचार करावेत, इत्यादी प्रश्नांवर मंथन करण्यासाठी टाटा रुग्णालयातर्फे नुकतीच कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला २०० हून अधिक डॉक्टर उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि टाटा मेमोरिअल सेंटर यांच्या सहकार्याने राज्यात २०१६ मध्ये ‘ॲक्सेस टू ॲफोर्डेबल कॅन्सर केअर फॉर ऑन अँड ऑल’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना प्रशिक्षण देणे आणि त्यासोबत राज्यातील सरकारी रुग्णालयांत कर्करोगावरील उपचारांसाठी तांत्रिक साहाय्य उपलब्ध करून देणे, हे टाटा रुग्णालयाकडून अपेक्षित होते. त्यासाठी या खास वैद्यकीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
व्हिडीओद्वारे प्रशिक्षण
टाटा रुग्णालयामार्फत कान, नाक, घसा विभागाचे प्राध्यापक डॉ. पंकज चतुर्वेदी हे या प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक आहेत. यावेळी राज्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारतात मुखाचे कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. हा आजार होऊ नये म्हणून दंत उपचारतज्ज्ञांनी करण्याचे प्रतिबंधात्मक उपाय आणि या आजाराचे निदान कशा पद्धतीने करावे, यावर टाटा रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत कर्करोगाची पूर्वावस्था आणि कर्करोग अवस्था, तसेच ओरल बायोप्सी कधी घ्यावी, या व्हिडीओद्वारे यावेळी प्रशिक्षण देण्यात आले.