तुम्ही व्यायाम सकाळी करता कि संध्याकाळी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 05:19 PM2017-11-10T17:19:48+5:302017-11-10T17:20:23+5:30
तुम्ही कोणत्या वेळेला व्यायाम करता यावरुन ठरतं तुम्हाला ते किती फायदेशीर आहे ते!..
- मयूर पठाडे
व्यायामचं महत्त्व का कोणाला सांगायला हवं? अशी एकही व्यक्ती नसेल, जिला व्यायामाचं महत्त्व माहीत नसेल... अर्थात यातही मोठी गंमत आहे. व्यायामाचं महत्त्व सगळ्यांना माहीत आहे, प्रत्येकानं व्यायाम केलाच पाहिजे, हेही सगळ्यांना कळतं, पण कसा? केव्हा? कधी? कोणता?.. हे विचारलं तर बºयाच जणांना यातील काहीही माहीत नसतं.
अनेक जण चुकीचाच व्यायाम करतात आणि काही वेळेस त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाही होऊ शकतो. त्यामुळे व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपण कुठल्या कारणासाठी व्यायाम करतोय, आपलं ध्येय काय हे आधी ठरवायला हवं.. तयानंतरच व्यायामाला सुरुवात करायला हवी.
पण त्याहीआधी अत्यंत बेसिक प्रश्न..
व्यायाम कोणत्या वेळी करावा? सकाळी की संध्याकाळी? कोणत्या वेळेला व्यायाम करणं जास्त फायदेशीर आहे?
संशोधकांनी यासंदर्भात रीतसर संशोधनच केलं. त्यात त्यांनी वेगवेगळे गट केले. सकाळी व्यायाम करणारे आणि संध्याकाळी व्यायाम करणारे. त्यानुसार त्यांना आढळून आलं, सकाळी व्यायाम केल्यानं जास्त फायदा होतो. पण याचा अर्थ इतर वेळी व्यायाम केल्यानं फायदा होतच नाही असं नाही. तुम्हाला सकाळची वेळ जर शक्यच नसेल तर दिवसातल्या कोणत्याही वेळी व्यायाम केला तरीही चालेल, पण व्यायाम मात्र करायलाच हवा.
सकाळच्या वेळी केलेल्या व्यायामानं दुहेरी फायदा होतो. तुमच्या शरीराबरोबरच मनाच्या सशक्ततेसाठी सकाळचा व्यायाम फायदेशीर ठरतो. शिवाय सकाळी केलेल्या व्यायामामुळे तुमची रात्रीची झोप व्यवस्थित होते. झोप गाढ लागते आणि व्यायामामुळे शरीरपेशींची जी झीज झालेली असते तीही व्यवस्थित भरुन निघते.
हो, पण संध्याकाळचा व्यायामही फायदेशीर आहेच, पण वेगळ्या कारणासाठी. त्याविषयी पाहूया पुढच्या भागात..