आईच्या हातातच शेकडो बाळं दगावतात तेव्हा..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 09:06 AM2023-05-12T09:06:19+5:302023-05-12T09:06:43+5:30

तयाबुल्ला. नुकतंच जन्माला आलेलं तीन महिन्यांचं हे चिमुकलं बाळ. छोट्याशा काहीतरी आजारामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

When hundreds of babies die in mother's arms | आईच्या हातातच शेकडो बाळं दगावतात तेव्हा..

आईच्या हातातच शेकडो बाळं दगावतात तेव्हा..

googlenewsNext

तयाबुल्ला. नुकतंच जन्माला आलेलं तीन महिन्यांचं हे चिमुकलं बाळ. छोट्याशा काहीतरी आजारामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बाळाच्या नाकाला ऑक्सिजनची नळी लावलेली आहे. ही नळी हातात धरून चिंताक्रांत नजरेनं बाळाची आई निगार शेजारी बसलेली आहे. आदल्या रात्रीपासून बाळाच्या नाकाशी ऑक्सिजनची नळी धरून ती अशीच केविलवाणी बसलेली आहे. गेले कित्येक तास ती जागेवरून उठलेलीही नाही. 

तिच्या बाळाला; तयाबुल्ला याला काही गंभीर आजार झालेला नाही; पण त्याची परिस्थिती मात्र आत्ता अतिशय नाजूक आहे. आई निगारला त्याच्या शेजारी बसण्यावाचून गत्यंतर नाही. गेले कित्येक तास तिच्याही पोटात काही गेलेलं नाही. आपलं बाळ आजारी आहे, म्हणून त्या माउलीला अन्न जात नाही, हे तर खरंच; पण गेल्या कित्येक तासांपासून नैसर्गिक विधीसाठीही तिला जाता आलेलं नाही. याचं कारण बाळाच्या नाकाला लावलेली ऑक्सिजनची नळी तिच्या हातात आहे. नैसर्गिक विधीसाठी दोन- पाच मिनिटांसाठी ती जागेवरून उठली, तर त्या काळात ऑक्सिजनची ही नळी कोण धरेल? आणि त्या दोन-पाच मिनिटांसाठी बाळाला ऑक्सिजन नाही मिळाला आणि तेवढ्यानं काही घात झाला तर..?

आपलं बाळ बरं व्हावं म्हणून एका बाजूला ती प्रार्थना करते आहे, तर दुसऱ्या बाजूला एक क्षणही बाळावरची नजर ती हटू देत नाही. तरीही थोड्या वेळानं तिला शंका येतेच. बाळाच्या नाकाजवळची ऑक्सिजनची नळी काही सेकंदांसाठी ती बाजूला करते आणि बाळाच्या नाकाखाली बोट धरते. बाळाचा श्वास तिला थांबलेला जाणवतो. त्या क्षणी ती मोठा हंबरडा फोडते, डॉक्टरांना आकांतानं हाका मारते. अख्खं हॉस्पिटल तिच्या रडण्यानं आक्रंदून उठतं. 

निगारच्या आकांतानं डॉ. अहमद समदीही तातडीनं धावून येतात. बाळाच्या शांत आणि फिकट चेहऱ्यावरून काय झालं असेल, हे त्यांच्याही लक्षात येतं. तयाबुल्लाच्या इवलुशा छातीवर ते स्टेथोस्कोप टेकवतात. हृदयाची किंचितशी हालचाल चालू असते. त्याच्या छातीवर हलकेच अंगठ्यांचा दाब देऊन त्याला ‘सीपीआर’ देण्याचा प्रयत्न ते करतात. नर्स एडिमा सुलतानीही लगेच ऑक्सिजन पंप घेऊन येते. पंप तयाबुल्लाच्या तोंडावर ठेवून त्याच्यात धुगधुगी निर्माण करण्याचा प्रयत्न करते; पण तयाबुल्लाचा शेवटचा श्वासही थांबलेला असतो. जन्मानंतर केवळ तीन महिन्यांतच त्यानं हे जग कायमचं सोडलेलं असतं. सारे प्रयत्न संपल्यावर डॉ. समदी तयाबुल्लाचा निश्चेष्ट देह त्या माउलीच्या हातात ठेवतात आणि निगारच्या आक्रंदनानं पुन्हा एकदा सारा आसमंत थरारून उठतो.

अफगाणिस्तानच्या भोर प्रांतातील हे एक ‘अत्याधुनिक’ हॉस्पिटल! इथे अनेक हॉस्पिटल्समध्ये काहीही नाही. ना डॉक्टर, ना नर्स, ना वैद्यकीय उपकरणं, ना औषधं... व्हेंटिलेटर वगैरे तर खूप पुढची गोष्ट. हे हॉस्पिटल त्यामानानं खूपच ‘आधुनिक’! कारण इथे रुग्णांसाठी चक्क ऑक्सिजन सिलिंडर्स आहेत आणि अख्ख्या हॉस्पिटलसाठी दोन डॉक्टर आणि दोन नर्सही आहेत! ऑक्सिजनची नळी जोडता येईल असे लहान बाळांचे मास्क मात्र इथे नाहीत. त्यामुळेच ही माउली गेला अख्खा दिवस ऑक्सिजनची नळी हातात धरून बसली होती! अर्थात, तयाबुल्ला आणि त्याची आई निगार हे काही इथलं एकमेव उदाहरण नाही. अशी अनेक बाळं आणि अशा अनेक आया, रोज इथे ऑक्सिजनच्या नळ्या आपल्या बाळांच्या नाकाला लावून अशाच हतबलतेनं बसलेल्या दिसतात. त्यांच्या डोळ्यांदेखत आणि त्यांच्या हातात बाळं दगावतात.
अफगाणिस्तानातील ‘सुसज्ज’ हॉस्पिटलची ही दशा, इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल, याचा फक्त विचारच केलेला बरा! ज्या गोष्टी साध्या-साध्या वैद्यकीय उपकरणांच्या साहाय्यानं सहजपणे करणं शक्य आहे किंवा ज्या गोष्टी प्रशिक्षित नर्सनं करणं आवश्यक आहे, अशा अनेक गोष्टी बाळांच्या आईला कराव्या लागत आहेत. ज्या क्षुल्लक कारणांनी एकही बाळ दगावायला नको, तिथे अफगाणिस्तानात रोज किती बाळं दगावत असतावीत? ‘युनिसेफ’च्या अहवालानुसार ‘काहीही कारण नसताना’ तिथे रोज सरासरी १६७ बाळं मृत्युमुखी पडताहेत.

कोणत्या बाळाला पहिल्यांदा उचलू..?

जाणकारांचं म्हणणं आहे, ‘युनिसेफ’च्या अंदाजापेक्षा कितीतरी पट बाळं इथे रोज मृत्युमुखी पडतात. रोज किमान ५०० बाळं तरी इथे दगावत असावीत. अफगाणिस्तानातल्या डॉक्टरांचंही म्हणणं आहे, इथे बाळं जन्माला येतात, ती फक्त मरण्यासाठीच! तयाबुल्लाचे आजोबा घावसद्दीन म्हणतात, खडबडीत आणि खड्ड्यांच्या रस्त्यांतून नातवाला हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठीच आम्हाला आठ-दहा तास लागले! नर्स एडिमा सांगते, रोज इतकी बाळं इथे येतात, कोणावर पहिल्यांदा उपचार करावेत, कोणाला उचलावे इथूनच सुरुवात होते. एडिमा बऱ्याचदा दिवसाचे चोवीस तास ड्युटी करते..!

Web Title: When hundreds of babies die in mother's arms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य