'या' वयात आई होण्याचा निर्णय घेतला पाहिजे; जाणून घ्या आई-बाबा होण्याचं योग्य वय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 10:25 AM2022-03-03T10:25:51+5:302022-03-03T10:32:37+5:30
उशिराने होणारी गर्भधारणा ही धोकादायक ठरते...
पुणे : शिक्षण आणि करिअरमुळे लग्न उशिरा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे मूल होऊ देण्याचा निर्णयही उशिरा घेतला जातो. उशिरा गर्भधारणा झाल्यास काही समस्या निर्माण होऊ शकतात. स्त्रियांच्या वयानुसार त्यांची प्रजनन क्षमतादेखील बदलत असते. उशिराने होणारी गर्भधारणा ही धोकादायक ठरते. वयाच्या पंचविशी-तिशीत पहिले मूल होऊ देणे योग्य ठरत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
आर्थिक अस्थिरता, करिअरच्या दृष्टीने घेतलेली झेप, उशिरा लग्न किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे स्त्रियांनी गरोदरपणात उशीर केल्यामुळे वंधत्वासारख्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. एखाद्या महिलेच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमतेचा विचार केल्यास तसेच जीवशास्त्रीयदृष्ट्या स्त्रीसाठी गर्भवती होण्याचे योग्य वय २० ते ३० वर्षे वयोगट. वाढत्या वयानुसार स्त्रियांमधील प्रजनन क्षमतादेखील कमी होऊ लागते आणि त्याचा परिणाम गर्भधारणेवर होतो.
वाढत्या वयानुसार महिलांमधील अंड्यांची गुणवत्ता आणि प्रमाण घटू लागते. उशिरा आई होताना अंड्यांमध्ये गुणसूत्रातील दोष निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गर्भधारणा होणे अवघड होते किंवा गरोदर असताना गर्भपात असण्याची भीती असते. वय वाढण्याबरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते आणि परिणामी कमी प्रजनन होईल किंवा जर गर्भधारणा झाली तर अशा परिस्थितीत गर्भधारणेच्या गुंतागुंती जास्त असतात. त्यामुळे योग्य वयात गर्भधारणेचा निर्णय घेणे योग्य ठरते.
- डॉ. ममता पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ
व्यंधत्वाचे प्रमाण आजकाल वाढत चालले आहे. शिक्षण आणि करिअरमुळे उशिरा लग्न होणे, मूल होऊ देण्याचा निर्णय लांबणीवर पडणे ही त्यामागील प्रमुख कारणे असू शकतात. आई-बाबा होण्याचे योग्य वय हे २५ वर्षांपर्यंत असते. जास्तीत जास्त ३० वर्षे वयापर्यंत पहिले मूल होणे गरजेचे असते. काही कारणांमुळे तिशी उलटून गेल्यास स्त्री बीजांची संख्या कमी होते, पुरुष बीजामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे योग्य वयात पहिले मूल होणे आवश्यक असते. व्यंधत्व निवारण तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य तपासण्या करून कोणत्या उपचारांची गरज आहे, हे वेळेवर समजू शकते.
- डॉ. किशोर पंडित, आयव्हीएफ तज्ज्ञ