किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:24 PM2024-08-30T12:24:22+5:302024-08-30T12:24:59+5:30
Kidney Stone : किडनी स्टोन झाल्यावर असह्य वेदना होतात. अशात काही औषधांनी किंवा सर्जरी करून किडनी स्टोन बाहेर काढले जातात. सोबतच खाण्या-पिण्याबाबतही काही गोष्टींची काळजी घेण्यास सांगतात.
Kidney Stone : आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं. किडनी स्टोन झाल्यावर पोटात दुखतं आणि लघवी करतानाही त्रास होतो. किडनी स्टोन झाल्यावर असह्य वेदना होतात. अशात काही औषधांनी किंवा सर्जरी करून किडनी स्टोन बाहेर काढले जातात. सोबतच खाण्या-पिण्याबाबतही काही गोष्टींची काळजी घेण्यास सांगतात. अशात आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन झाल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती खाऊ नये याबाबत सांगणार आहोत.
किडनी स्टोन झाल्यावर कोणती फळं खावीत?
पाणी असलेली फळं
किडनी स्टोनच्या रूग्णांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्याशिवाय पाणी भरपूर असलेली फळं खाण्याचाही सल्ला दिला जातो. कलिंगड, खरबूज, नारळ पाणी, काकडी सारख्या फळांमध्ये भरपूर पाणी असतं. यांचं सेवन करून शरीरात पाणी वाढतं. शरीरात पाणी कमी असेल तर किडनी स्टोनची समस्या वाढते.
आंबट फळं
किडनी स्टोन झाला असेल तर आंबट म्हणेज सिट्रिक फळांचं अधिक सेवन करायला हवं. यासाठी तुम्ही डाएटमध्ये संत्री, लिंबू, द्राक्ष या फळांचा समावेश करावा. ही फळं खाऊन किडनी स्टोनची समस्या दूर करण्यास मदत मिळेल.
कॅल्शिअम असलेली फळं
तुमच्या आहारात फळांचा समावेश अधिक केला पाहिजे. किडनी स्टोन झाल्यावर कॅल्शिअम असलेल्या फळांचं अधिक सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. द्राक्ष, जांभळं आणि कीवी या फळांमध्ये भरपूर कॅल्शिअम असतं.
कोणती फळं खाऊ नये?
किडनी स्टोनची समस्या झाल्यावर काही फळांचं सेवन कमी करण्याचा किंवा न करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच काही भाज्या आणि दाण्यांचंही सेवन करू नये. किडनी स्टोनची समस्या झाल्यावर डाळिंब, पेरू ही फळं खाऊ नयेत. तसेच भाज्यांमध्ये वांगी, टोमॅटो आणि रताळे कमी खावेत. तसेच ड्रायफ्रूट्सचं सेवनही टाळलं पाहिजे. या गोष्टींमुळे किडनी स्टोनची समस्या वाढू शकते.