कोणते तेल आरोग्यास चांगले? कोणत्या तेलातून काय मिळते?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 01:50 PM2023-03-24T13:50:46+5:302023-03-24T13:51:04+5:30
बदलत्या जीवनशैलीत अनेकांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला आहे. अशा वेळी योग्य प्रकारच्या तेलाचा आहार असणे गरजेचे असते.
बदलत्या जीवनशैलीत आहारातील खाद्यतेलाचा वापर हा सार्वजनिक आरोग्याचा विषय ठरला आहे. कोणते तेल वापरावे आणि कोणते वापरू नये यासाठी आता आहारतज्ज्ञांची मदतीची गरज भासू लागली आहे. त्यानुसार काही आहारतज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहारात तेलाचा वापर करणे आरोग्यासाठी हिताचे ठरणार आहे.
आहारात तेलाचे प्रमाण कमी ठेवा
बदलत्या जीवनशैलीत अनेकांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला आहे. अशा वेळी योग्य प्रकारच्या तेलाचा आहार असणे गरजेचे असते. हृदयाच्या आरोग्यासाठी तेलाचे प्रमाण नेहमी कमी ठेवावे लागते. ज्या तेलामध्ये ‘मोनोअनसॅच्युरेटेड फॅट’, ‘ओमेगा थ्री’ आणि ‘कॅरोटिन’ असते ते तेल निवडावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
कोणत्या तेलातून काय मिळते?
मोहरीचे तेल
मोहरीच्या तेलामध्ये ‘मोनोअनसॅच्युरेटेड’ आणी ‘पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड’ आणि ‘ओमेगा-३’ आणि ‘ओमेगा-६ फॅटी ॲसिड्स’ असते. मोहरी आरोग्यासाठी उत्तम आहे.
शेंगदाणा तेल
शेंगदाणा तेलामध्ये ‘व्हिटॅमिन ई’ आणि ‘मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स’ आणि ‘पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स’ असतात. यामुळे हे तेल खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.
सोयाबीन तेल
सोयाबीन तेलामध्ये भरपूर फॅटी ॲसिड असते. ज्यामुळे संपूर्ण शरीराला फायदा होतो. सोयाबीन तेलामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखता येते. त्यामुळे वापर करतात.
करडई तेल
करडईचे दोन प्रकार आहेत. एका प्रकारच्या तेलात ‘मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स हे जास्त असते, तर दुसऱ्या प्रकारात ‘पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड’ असते. पहिल्या प्रकारातील खाद्यतेल उपलब्ध आहे.
ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईलमध्ये मोठ्या प्रमाणात ‘मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड’ आणि ‘पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड’ असतात जे हृदय निरोगी ठेवतात. या तेलाचा स्मोक पॉइंट कमी असतो. त्यामुळे ते वापरण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात.
प्रत्येक तेलाचा गुणधर्म वेगळा असतो. यामुळे एकाच तेलाचा वापर करू नये. सहा महिने एकाच तेलाचा वापर केला तर त्यानंतर पुढील महिन्यासाठी दुसऱ्या तेलाचा वापर करावा किंवा तेलाचे एक पाकीट संपल्यावर दुसऱ्या तेलाचे पाकीट वापरावे. तेलाचे सत्त्व अधिक महत्त्वाचे असते. - प्रियंका शिंदे, आहारतज्ज्ञ
आहारात नेहमी कमी तेलाचा वापर हिताचे ठरते. एकाच तेलाचा नेहमी वापर करू नये. शिवाय एकदा तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरू नये. आहारात ऑलिव्ह ऑईल, शेंगदाणा असे तेल प्रकार वापरणे उत्तम राहील. - प्रणिता श्रीधर,
आहारतज्ज्ञ