छातीमधून येताेय शिट्टीसारखा आवाज; श्वसन व्यवस्थेवर हल्ला, बालवृद्धांना खोकल्याचा होतोय त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 01:46 PM2023-11-08T13:46:57+5:302023-11-08T13:47:07+5:30

या थंड वातावरणात दमटपणा असल्यामुळे दरवर्षी या काळात श्वसनाचे विकार पाहायला मिळतात.

whistling sound coming from chest; An attack on the respiratory system, children and adults suffer from coughing | छातीमधून येताेय शिट्टीसारखा आवाज; श्वसन व्यवस्थेवर हल्ला, बालवृद्धांना खोकल्याचा होतोय त्रास

छातीमधून येताेय शिट्टीसारखा आवाज; श्वसन व्यवस्थेवर हल्ला, बालवृद्धांना खोकल्याचा होतोय त्रास

मुंबई : गेल्या काही दिवसांत श्वसनविकाराच्या व्याधीमध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लहान मुलांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्दी आणि खोकल्याचा त्रास सुरू आहे. काही नागरिक घरीच यावर उपाययोजना करीत आहेत. तर काही नागरिकांना मात्र या आजारावरील उपचारासाठी डॉक्टरांकडे जावे लागत आहे.

काही नागरिकांना या श्वसनविकाराचा इतका त्रास होत आहे की, त्यांच्या छातीमधून शिट्टीसारखा आवाज येत असून, घुरघूर वाढली आहे. त्यांच्या श्वसनमार्गामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यांना न्यूमोनियासारखा त्रास होऊन रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. ऐन दिवाळी सुरू होताना सध्या राज्यातील विविध शहरांत वायुप्रदूषणाने थैमान घातले आहे. अशुद्ध हवा घेत नागरिक दैनंदिन दिवस ढकलत आहेत. साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान ऋतुबदलानंतर थंडी काही प्रमाणात सुरू होत असते. 

या थंड वातावरणात दमटपणा असल्यामुळे दरवर्षी या काळात श्वसनाचे विकार पाहायला मिळतात. मात्र, यंदा हवेतील प्रदूषणाने मोठी उंची गाठली आहे. शहरातील काही भागांतील हवा गुणवत्ता निर्देशांक पाहिला तर तो काही  ठिकणी २०० तर काही ठिकाणी ३०० च्या पार गेला आहे. या अशा वातावरणात दीर्घ काळ राहिल्यास श्वासविकारच्या व्याधी सुरू होतात.

 कोणते आजार बळावतात?  
दमा, अस्थमा, शिंका येणे,  नाक गळणे, डोकेदुखी, आळस येणे, थकवा जाणवणे,  ब्रॉन्कायटिस, श्वसन मार्गातील अडथळ्यामुळे नागरिकांना श्वास घेताना जीव कोंडल्यासारखा वाटतो. ज्या नागरिकांना पूर्वीपासून श्वसनाच्या व्याधी आहेत, त्यांच्यामध्ये आजार अधिक प्रमाणात बळावला आहे. तर सर्वसाधारण नागरिकांनासुद्धा श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. 

स्टेथोस्कोप सांगतोय लक्षणे
 रुग्णाचे निदान तत्काळ करण्यासाठी स्टेथोस्कोप  महत्त्वाची भूमिका बजावत असतो. डॉक्टर रुग्णाच्या छाती आणि पाठीवरून काही मिनिटे स्टेथोस्कोप फिरवून श्वसनक्रियेमधील विविध गोष्टी टिपत असतात. 
 त्यांना त्यावरून आजाराचे गांभीर्य चटकन कळते. त्यानुसार ते रुग्णांची उपचारपद्धती निश्चित करत असतात. 
  सध्या श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये श्वास घेण्याचा वेग यावरून डॉक्टर अनेक आजारांचे अनुमान ठरवत असतात. त्यासोबत हार्टबिट आणि पोटातील हालचालीसुद्धा या साधनांद्वारे जाणून घेत असतात.

तापमानात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे, विशेष करून नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्वसन विकाराशी संबंधित रुग्णांमध्ये वाढ दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण असल्यामुळे श्वसनमार्गाच्या खालच्या आणि वरच्या भागात संसर्ग होतो. सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जाणे काही काळ थांबविले पाहिजे. त्यामुळे आणखी श्वसनविकाराच्या व्याधी वाढू शकतात. घराच्या घरी काही व्यायाम करता येईल ते पाहावे. योग आणि प्राणायाम शक्य असल्यास करावे. दिवाळीत प्रदूषण दुपटीने असते. त्यामुळे श्वसनविकाराचे रुग्ण दिवाळीच्या काळात शक्य असेल तर पाच सहा दिवसांकरिता शहराबाहेर जातात. 
- डॉ. जलील पारकर, श्वसनविकार तज्ज्ञ, 

Web Title: whistling sound coming from chest; An attack on the respiratory system, children and adults suffer from coughing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य