माझे असणे कोणासाठी महत्त्वाचे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 08:56 AM2024-02-01T08:56:01+5:302024-02-01T08:56:25+5:30

Health: ‘माझे असणे किंवा नसणे हे कोणासाठी महत्त्वाचे आहे?’-असा प्रश्न तुम्ही कधी स्वत:ला विचारला आहे किंवा खरं म्हणजे असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे?

Who cares to be mine? | माझे असणे कोणासाठी महत्त्वाचे आहे?

माझे असणे कोणासाठी महत्त्वाचे आहे?

- वंदना अत्रे
(दुर्धर व्याधीग्रस्तांच्या मदतगटात कार्यरत) 
 ‘माझे असणे किंवा नसणे हे कोणासाठी महत्त्वाचे आहे?’-असा प्रश्न तुम्ही कधी स्वत:ला विचारला आहे किंवा खरं म्हणजे असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे?
- खूप डोळे उघडणारा आहे हा प्रश्न आणि रोजच्या धकाधकीत तो कधीच असा समोर येत नाही. मला स्पष्ट आठवते आहे, केमोची पहिली सायकल घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर पडले. एप्रिलच्या उष्ण रणरणत्या दुपारीसुद्धा त्या बाहेरच्या जगात नेहमीची धावपळ सुरू होती. वाहने आणि माणसे यांची न संपणारी लगबग बघून मला नकळतच एकदम रडू कोसळले. वाटले मी कॅन्सरने आजारी; पण सगळे जग त्याच्याच वेगाने धावतेय. कोणालाच माझ्याबद्दल काळजी, दु:ख काहीच वाटत नसेल?..

आज तो क्षण आठवताना प्रत्येक वेळी माझ्या त्या समजुतीचे हसू येते..! ‘जगाच्या व्यवहारात आपण एक महत्त्वाची व्यक्ती आहोत’, असा उगीचच आपला समज असतो. या समजुतीचा एक भाग म्हणजे ‘माझ्याशिवाय घर चालूच शकणार नाही’, असा प्रत्येक स्त्रीला असलेला भ्रम! त्या दिवशी माझ्यासाठी हा भ्रमाचा भोपळा फटकन फुटला. जाणवले, आपण असण्या-नसण्यामुळे जगाला चिमूटभरसुद्धा फरक पडत नसतो..

मग माझे असणे कोणासाठी महत्त्वाचे? - माझ्यासाठीच! ‘आपले जगणे आधी स्वत:साठी आहे’, हे कधीतरी असे लख्खपणे समजले पाहिजे. तरच ते आनंदी होण्याचा विचार मनात येऊ शकतो. कॅन्सर समोर उभी असताना आणि जगण्याची कोणतीही हमी नसताना मला आनंदाचा विचार सुचत होता! हा नक्की वेडेपणाच; पण हाताशी असलेला प्रत्येक क्षण जमेल तेवढा आनंदाने जगण्याची इच्छा प्रबळ होते तेव्हा हा वेडेपणासुद्धा साधतो! नक्की. 

त्यासाठी काही प्रश्न स्वत:ला विचारावे लागतात. पहिला अर्थातच, माझा आनंद कशात आहे? आजवर कधी शोध घेतला त्याचा आपण? पैसे, हौसेने जमवलेल्या अगणित वस्तू, नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी मिळालेले पद-सन्मान. कुठे दिसतो मला तो आनंदाचा रसरशीत कंद? हा गुंता सोडवताना जीव थकून जातो. या शोधात समोर येणारे आणखी काही प्रश्न ओलांडत असताना हळूहळू दिशा उजळत जातात.

Web Title: Who cares to be mine?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.