चिंतेत भर! कोरोनाचा आणखी एक व्हेरिएंट आढळला; डेल्टापेक्षाही घातक? WHOचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 03:35 PM2021-09-02T15:35:20+5:302021-09-02T15:36:19+5:30
आजही संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे आणि हा विषाणू जगातून संपण्याऐवजी अधिकच घातक होताना दिसत आहे...
जगात कोरोना व्हायरस समोर येऊन 1.5 वर्षांपेक्षाही अधिक काळ झाला आहे. आजही संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे. मात्र, तरीही हा विषाणू जगातून संपण्याऐवजी अधिकच घातक होताना दिसत आहे. कारण सातत्याने या व्हायरसचे नवनवे व्हेरिएंट्स समोर येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आता आणखी एका नव्या कोरणा व्हेरिएंटवर लक्ष केंद्रित केले आहे. Mu नावाचा B.1.621 हा व्हेरिएंट पहिल्यांदा या वर्षी जानेवारी महिन्यात समोर आला. या व्हेरिएंटशी संबंधित चार हजार रुग्ण 40 हून अधिक देशांमध्ये समोर आले आहेत.
म्यू व्हेरिएंटसंदर्भात चिंतेची बाब म्हणजे, डब्ल्यूएचओने म्हटल्यानुसार, हा व्हेरिएंट लसीलाही प्रभावहीन करू शकतो. डब्ल्यूएचओच्या मते या व्हेरिएन्टची तीव्रता समजून घेण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज आहे. याला डब्ल्यूएचओने 'व्हेरिएंट ऑफ इंट्रेस्ट' असे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, हा व्हेरिएंट जानेवारी 2021 मध्ये कोलंबियात आढळून आला. या दरम्यान, म्यू व्हेरिएंटचे काही रुग्ण समोर आले. यानंतर पाहता पाहता हा व्हेरिएंट दक्षिण अमेरिका आणि युरोपातील देशांव्यतिरिक्त इतर देशांमध्येही पोहोचला. जागतिक पातळीवर, या व्हेरिएंटने बाधित रुग्णांत कमी आली आहे आणि जागतिक स्तरावर हे प्रमाण 0.1 टक्क्याहून कमी आहे.
म्यू व्हेरिएंट किती घातक? -
डेल्टा व्हेरिएंटसह, म्यू व्हेरिएंटवरही नजर ठेवली जाईल. डब्ल्यूएचओने डेल्टा व्हेरिएंट शिवाय, अल्फा, बीटा आणि गॅमाला 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' म्हणून सूचीबद्ध केले आहे. तर, म्यू शिवाय, इओटा, कापा आणि लॅम्बडा यांना 'व्हेरिएंट ऑफ इंट्रेस्ट' म्हटले आहे. म्यू फार संसर्गजन्य असल्यासंदर्भात, कोणतीही माहिती सध्या उपलब्ध झालेली नाही. याचे एक मुख्य म्यूटेशन E484K आहे, जो याला बीटा आणि गॅमा प्रमाणे अँटीबॉडीशी लढण्यास मदत करतो. यात N501Y म्यूटेशनही आहे. हे त्याला अधिक संक्रमक बनवते. यात अल्फा व्हेरिएंट देखील आहे.