जगभरात सर्वाधिक कोरोना डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 04:34 PM2021-09-23T16:34:35+5:302021-09-23T16:36:48+5:30
coronavirus : डेल्टा व्हेरिएंट काळानुसार बदलला आहे आणि अधिक संक्रमक झाला आहे. सध्या संक्रमणाच्याबाबतीत हा कोरोना व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटला सक्रियपणे मागे टाकत आहे, असे मारिया व्हॅन कर्खोव यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हा जगभरात सर्वाधिक प्रसारित होणारा प्रमुख व्हेरिएंट आहे. डेल्टा व्हेरिएंट हा प्रसार आणि संक्रमणाच्या बाबतीत अल्फा, बीटा आणि गामा व्हेरिएंट्सना मागे टाकत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन कर्खोव यांनी बुधवारी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. (who says delta is globally dominant variant of coronavirus replacing other variants of concern)
डेल्टा व्हेरिएंट काळानुसार बदलला आहे आणि अधिक संक्रमक झाला आहे. सध्या संक्रमणाच्याबाबतीत हा कोरोना व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटला सक्रियपणे मागे टाकत आहे, असे मारिया व्हॅन कर्खोव यांनी म्हटले आहे. तसेच, सध्या अल्फा, बीटा आणि गामा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव एक टक्क्यापेक्षा कमी होत आहे, असे मारिया व्हॅन कर्खोव यांनी सोशल मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले. दरम्यान, डेल्टा व्हेरिएंटचा जगभरात प्रामुख्याने प्रसार होत आहे.
याचबरोबर, डेल्टा व्हेरिएंट अधिक शक्तिशाली बनला आहे, तो अधिक संसर्गजन्य आहे आणि तो उर्वरित व्हेरिएंटचे स्थान घेत आहे, असेही मारिया व्हॅन कर्खोव यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, डब्ल्यूएचओने अल्फा, बीटा, गामा व्हेरिएंटसह ईटा, आयोटा आणि कप्पा व्हेरिएंटला खालच्या स्तरात ठेवले आहे. याचा अर्थ असा की हे व्हेरिएंट यापुढे जागतिक सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत नाहीत.
लसीकरणानंतर चिंताग्रस्त प्रकरणे दहा पटीने वाढली, महिलांवर अधिक परिणाम https://t.co/gk2eLhW3Fe#CoronaVaccine#health
— Lokmat (@MiLOKMAT) September 23, 2021
भारतात कोरोनाची परिस्थिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटी 35 लाख 63 हजार 421 आहे. यामध्ये, सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाख एक हजार 640 वर आली आहे. ही संख्या गेल्या 187 दिवसांतील सर्वात कमी आहे. गेल्या 24 तासांत फक्त 31923 नवीन प्रकरणे नोंदवली गेली.