दक्षिण पूर्व आशियात २०५० पर्यंत कॅन्सरनं होणारे मृत्यू ८५ टक्क्यांनी वाढणार - WHO
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:07 IST2025-02-05T12:06:35+5:302025-02-05T12:07:40+5:30
Cancer : दक्षिण-पूर्व आशियामध्ये कॅन्सरच्या नवीन केसेस आणि मृतांची संख्या ८५ टक्क्यांनी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण पूर्व आशियात २०५० पर्यंत कॅन्सरनं होणारे मृत्यू ८५ टक्क्यांनी वाढणार - WHO
Cancer : कॅन्सर हा एक जीवघेणा आजार असून जगभरात हजारो लोकांचा जीव या आजारामुळे जातो. दिवसेंदिवस कॅन्सरचं जाळं जगभरात वाढत आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, दक्षिण-पूर्व आशियामध्ये कॅन्सरच्या नवीन केसेस आणि मृतांची संख्या ८५ टक्क्यांनी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सोमवारी वर्ल्ड कॅन्सर डे निमित्तानं ही माहिती दिली.
WHOच्या दक्षिण-पूर्व आशियाच्या क्षेत्रीय निर्देशक साइमा वाजेद यांनी सांगितलं की, "यावर्षीची थीम 'यूनायटेड बाय यूनिक' आपल्याला कॅन्सरसोबत एकत्र येऊन लढण्याची प्रेरणा देते. डब्ल्यूएचओ प्रत्येक रूग्णाच्या वेगवेगळ्या अनुभवांना महत्वं देतं आणि याचा स्वीकार करतं की, आरोग्य सेवा डॉक्टर, परिवार, मित्र आणि समाजाच्या मदतीनं मिळून चांगल्या होऊ शकतात".
काय सांगते आकडेवारी?
२०२२ मध्ये दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रात २४ लाख नवीन कॅन्सरच्या केसेस समोर आल्या होत्या. यादरम्यान १५ लाख लोकांचा कॅन्सरमुळे जीव गेला. वाजेद यांनी सांगितलं की, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सगळ्यात क्षेत्रांमध्ये ओठ आणि तोंडाचे कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर आणि बालपणी होणाऱ्या कॅन्सरच्या सगळ्यात जास्त केसेस आढळून आल्यात. अंदाज आहे की, २०५० सालापर्यंत या क्षेत्रात कॅन्सरच्या नवीन केसेस आणि मृतांची संख्या ८५ टक्क्यांनी वाढू शकते.
दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्राताली अनेक देशांनी कॅन्सरवर नियंत्रण मिळवण्यात प्रगती केली आहे. यात तंबाखू सेवनात कमतरता ही मोठी उपलब्धी आहे. वाजेद यांनी सांगितलं की, "तंबाखूचा वापर कॅन्सरचं एक मोठं कारण आहे. आमच्या क्षेत्रात तंबाखूच्या सेवनात कमतरता झाली आहे".
त्यांनी सांगितलं की, सहा देशांनी कॅन्सरला आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रीय योजना तयार केल्या. तर दोन देशांनी कॅन्सरला त्यांच्या नॉन-इन्फेक्शन रोगाच्या योजनेत समावेश केला. जेणेकरून नियंत्रण योग्य पद्धतीनं करता यावं. तर आठ देशांनी ह्यूमन पेपिलोमावायरस (एचपीवी) लसीकरण सुरू केलं.
१० देशांवर लक्ष
त्याशिवाय १० देश बाल कॅन्सर नियंत्रणासाठी वैश्विक योजना वापरत आहेत आणि ७ देशांमध्ये कॅन्सरच्या केसेसची नोंद ठेवण्यासाठी विशेष रजिस्टर बनवले आहेत. १० देशांमध्ये आधुनिक कॅन्सर सेवा उपलब्ध आहेत. ज्या ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गरजू रूग्णांपर्यंत पोहोचत आहे.
मात्र, अजूनही आव्हान कायम आहेत. कॅन्सर नियंत्रण योजनांची योग्य पद्धतीनं अमलबजावणी होत नाहीये. ज्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होत आहे. सुपारीसारख्या कॅन्सरला कारणीभूत गोष्टींवर नियंत्रणासाठी ठोस नियम नाहीत. वाजेद म्हणाल्या की, आजाराची माहिती उशीरा मिळणं आणि वाढत्या कॅन्सरच्या केसेस सांभाळण्यासाठी राष्ट्रीय क्षमतेची कमतरता सुद्धा कॅन्सर नियंत्रणात अडथळा ठरत आहे.