भारताच्या दोन कफ सिरपबाबत WHO नं दिला मोठा इशारा! काळजी घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 05:52 PM2023-01-12T17:52:35+5:302023-01-12T17:53:53+5:30
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) बुधवारी भारतीय औषध कंपनी मरीन बायोटेकच्या (Marion Biotech) दोन कफ सिरपबाबत इशारा दिला आहे.
नवी दिल्ली-
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) बुधवारी भारतीय औषध कंपनी मरीन बायोटेकच्या (Marion Biotech) दोन कफ सिरपबाबत इशारा दिला आहे. संघटनेनं हे दोन कफ सिरप लहान मुलांसाठी वापरले जाऊ नयेत असा सल्ला दिला आहे. WHO च्या माहितीनुसार हे दोन कफ सिरप गुणवत्ता मानकांची पूर्तता करत नाहीत आणि त्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली गेली पाहिजे. उझबेकिस्तानमध्ये १९ लहान मुलांच्या मृत्यूचं प्रकरण देखील याच कंपनीनं बनवलेल्या कफ सिरपशी संबंधित आहे.
WHO नं जाहीर केलेल्या माहितीनुसार Ambronol सिरप आणि DOK-1 Max सिरपवर बाजारातील विक्री थांबवली गेली पाहिजे. ही दोन सिरपचं उत्पादन करणाऱ्या कंपनीचं ऑफीस नोएडा सेक्टर ६७ मध्ये आहे.
उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयानं लहान मुलांच्या मृत्यूची बाब लक्षात घेत दोन सिरपची चौकशी केली होती. ज्यात दोन्ही सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचं प्रमाण अधिक होतं जे लहान मुलांच्या मृत्यूचं कारण ठरलं असं सांगितलं जात आहे. मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार श्वसनाशी निगडीत आजाराशी झुंज देणाऱ्या २१ लहान मुलांना या सिरपचं सेवन केलं होतं. ज्यातील १९ मुलांचा मृत्यू झाला होता.
रॉयटर्सच्या माहितीनुसार आतापर्यंत मरीन कंपनीनं या सिरपबाबत सुरक्षा आणि गुणवत्तेबाबत डब्ल्यूएचओला कोणतीही गॅरंटी दिलेली नाही. उझबेकीस्तानमध्ये लहान मुलांच्या मृत्यूची माहिती समोर येताच भारताच्या आरोग्य मंत्रालयानं कंपनीच्या उत्पादनावर तातडीनं बंदी घातली होती. आता गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारनं या कंपनीचा परवानाच रद्द केला आहे.
मरीन बायोटेक उझबेकिस्तानमध्ये २०१२ साली रजिस्टर्ड झालेली कंपनी आहे. त्याच वर्षी कंपनीनं आपल्या औषधांच्या विक्रीला सुरूवात केली होती. भारतात सध्या या कंपनीची औषधं विकली जात नाहीत. उझबेकिस्तानमध्ये १९ लहान मुलांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. याआधी गाम्बियामध्येही कफ सिरपच्या सेवनामुळे ७० मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी गाम्बियाच्या संसदीय समितीनं या मृत्यूंचं खापर नवी दिल्ली स्थित मेडेन फार्मास्युटिकल्सनं तयार केलेल्या कफ सिरपवर फोडलं होतं. दरम्यान कंपनीनं औषधाच्या गुणवत्तेत कोणतीही गडबड झाल्याचा दावा केला होता. भारत सरकारनं त्यावेळी औषधाची तपासणी देखील केली होती आणि त्यात कोणतीही तृटी आठळली नव्हती.