मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आणखी वाढला; WHO कडून मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 07:19 AM2022-06-09T07:19:44+5:302022-06-09T07:20:19+5:30

Monkeypox Virus : बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत इशारा दिला असून या देशांमध्ये आतापर्यंत एक हजाराहून अधिक प्रकरणांची पुष्टी झाली असल्याचे म्हटले आहे.

who warns risk of spreading monkeypox virus increased further | मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आणखी वाढला; WHO कडून मोठा इशारा

मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आणखी वाढला; WHO कडून मोठा इशारा

googlenewsNext

जिनिव्हा : कोरोनानंतर आता मंकीपॉक्स नावाच्या विषाणूने (Monkeypox Virus) जगाची चिंता वाढवली आहे. स्थानिक नसलेल्या देशांमध्ये (ज्या ठिकाणी हा विषाणू बाहेरून आला आहे) त्याचा धोका वाढत आहे. बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत इशारा दिला असून या देशांमध्ये आतापर्यंत एक हजाराहून अधिक प्रकरणांची पुष्टी झाली असल्याचे म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, 29 देशांमध्ये मंकीपॉक्सची 1,000 हून अधिक पुष्टी झालेली प्रकरणे आढळून आली आहेत, जी या आजाराची स्थानिक नाही आहेत. मात्र, आतापर्यंत कोठेही मृत्यूशी संबंधित कोणतीही वृत्त नाही. स्थानिक नसलेल्या देशांमध्ये मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे हे सूचित करतात की विषाणूचा प्रसार झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अदनोम म्हणाले की,  संयुक्त राष्ट्राची आरोग्य एजन्सी विषाणूविरूद्ध मोठ्या प्रमाणात लसीकरणाची शिफारस करत नाही आणि उद्रेकामुळे कोणत्याही नागरिकाचा मृत्यू झाला नाही. स्थानिक नसलेल्या देशांमध्ये मांकीपॉक्सचा धोका खरा आहे. जुनोटिक रोग 9 आफ्रिकन देशांमध्ये मानवांमध्ये स्थानिक आहे, परंतु गेल्या महिन्यात हा रोग इतर अनेक राज्यांमध्ये नोंदवला गेला आहे, त्यापैकी बहुतेक युरोपमध्ये आणि विशेषतः ब्रिटन, स्पेन आणि पोर्तुगालमध्ये मांकीपॉक्सचा रुग्ण आढळला आहे.

दरम्यान, यासंदर्भात आरोग्य तज्ज्ञांनी न्यूयॉर्क टाइम्सशी संवाद साधला. यावेळी आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, मंकीपॉक्सचा विषाणू हवेतूनही पसरण्याची शक्यता आहे. नायजेरियात पसरलेल्या मंकीपॉक्सच्या संसर्गाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, 2017 मध्ये नायजेरियन तुरुंगात मंकीपॉक्स रोग पसरला होता. तेथे राहणाऱ्या कैद्यांशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांनाही याची लागण झाली होती. तसेच, जे लोक मंकीपॉक्स रुग्णांच्या संपर्कात आले नव्हते, त्यांनाही हा संसर्ग झाला होता. यावरून असे दिसते की, मंकीपॉक्स हा विषाणू काही बाबतीत हवेतूनही पसरतो.

मंकीपॉक्स हा मानवी स्मॉलपॉक्ससारखाच दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग आहे. 1958 मध्ये संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये तो पहिल्यांदा सापडला होता. मंकीपॉक्सच्या संसर्गाचे पहिले प्रकरण 1970 मध्ये नोंदवले गेले. हा रोग प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय पर्जन्यवनात आढळतो आणि कधीकधी इतर प्रदेशांमध्ये पसरतो.शास्त्रज्ञांच्या मते,  हा फारसा गंभीर नसला तरी काळजी घेण्याची गरज आहे. त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि सामान्य सुस्ती यांचा समावेश आहे.

Web Title: who warns risk of spreading monkeypox virus increased further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.