जगासाठी खूप केलं, आता स्वत:साठी!...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 04:53 PM2017-09-01T16:53:17+5:302017-09-01T16:54:43+5:30
स्वत:कडे बघा, स्वत:ला वेळ द्या.. शेवटी तेच उपयोगी पडणार आहे..
- मयूर पठाडे
आरोग्याची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं? जिममध्ये जाऊन व्यायाम करायचा? ग्राऊंडवर पाय दुखेपर्यंयत रनिंग करायची? वजनं उचलायची? कुठला खेळ खेळायचा?...
या साºया गोष्टी तुम्ही करीत असाल तर केव्हाही उत्तमच, पण ज्यांना यातलं काहीही करायचं नसेल आणि निदान आत्ता सुरुवातीला तरी सुखातला आपला जीव ‘दु:खात’ टाकून अंगातला घामटा काढायचा नसेल तर काही अगदी सोप्या गोष्टीही आहेत. त्या कोणत्या हे आपण गेल्यावेळी पाहिलं.
आता पाहू या आणखी काही सोप्या गोष्टी, ज्यानं तुमची तब्येत अगदी ठणठणीत राहू शकेल.
काय आहेत आरोग्याच्या टिप्स?
१- झोपायला सगळ्यांनाच आवडतं, पण खरंच रोज घेता तुम्ही पुरेशी झोप? टेन्शनच्या कामाच्या रामरगाड्यात येते तुम्हाला नीट, शांत झोप? पहिल्यांदा रोज पुरेशी झोप घ्या. कामाचं टेन्शन सोडा आणि व्यवस्थित झोप घ्या. बघा, रोजच्या पेक्षा तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं की नाही ते?
२- रोज एकच एक प्रकारचं जेवण करू नका. आहारात रोज मल्टिव्हिटॅमिनचा समावेश असेल याकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष द्या.
३- बºयाचदा चटकमटक खाण्याकडे आपला कल असतो. चिप्स, जंक फूड याकडे अगदी एकदम जरी पाठ फिरवता नाही आली, तरी असे पदार्थ हळूहळू पूर्णपणे सोडा आणि हेल्दी डाएटकडे वळा. चिप्सऐवजी फळं खा, कोल्ड्रिंकच्या आहारी जाण्यापेक्षा पाण्याचा जास्त वापर करा.
४- जास्त वेळा कधीही उपाशी राहू नका. आपल्या जेवणाच्या वेळा नीट प्लॅन करा आणि दिवसातून किमान चार वेळा तरी ठराविक वेळा आपल्या पोटात हेल्दी फूड जाईल याचं प्लॅनिंग करा.
५- ‘मला काय धाड भरतेय?’ म्हणून प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याची काहीही तक्रार नसली तरी नियमितपणे चेकअप करीत जा.
६- सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांसाठी, जगासाठी पळत असताना आपल्या स्वत:कडेही लक्ष द्या. स्वत:साठी आवर्जून वेळ काढा.
जमेल एवढं. जमायलाच हवं.. आणि तुम्ही ते आता तरी जमवाल असा विश्वास आहे. बघा करून. जगा स्वत:साठी.