मुलं आत्महत्या का करतात; जाणून घ्या, ताण आलाय हे कसे ओळखावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 08:15 AM2023-02-19T08:15:32+5:302023-02-19T08:16:01+5:30

मुद्द्याची गोष्ट : लहान मुलांकडून अचानक घडणाऱ्या आत्महत्या नेहमीच मन विषण्ण करतात. वरकरणी साधी वाटणारी कारणे आत्महत्येला प्रवृत्त करतात तेव्हा जगण्यातील आशा, दिशा व हेतूच संपले असावेत की, जीवनाला घट्ट पकडून ठेवण्याइतके ताकदीचे ते कधी नव्हतेच याचा शोध घ्यावा लागतो. प्रेम, जिव्हाळा या मुलांच्या नात्यांमध्ये रुजला नाही का? जगण्याला होकार देणारा आशावाद या मनांमध्ये वाढलाच नाही का? 

Why do children commit suicide; Know how to recognize stress? | मुलं आत्महत्या का करतात; जाणून घ्या, ताण आलाय हे कसे ओळखावे?

मुलं आत्महत्या का करतात; जाणून घ्या, ताण आलाय हे कसे ओळखावे?

googlenewsNext

डॉ. प्रदीप पाटकर, 
मनोविकास तज्ज्ञ, पनवेल

विस्तवासारख्या होत चाललेल्या वास्तवात, कल्पनाविश्वात अस्वस्थ येरझारांनी असह्य थकवा आलेल्या मुलांसमोर आत्महत्या हा एकमेव पर्याय म्हणून उभा राहतो आहे, ही बाब गंभीर आहे. दहशतवादी, अतिरेकी, युद्धपिपासू सत्ताधारी, जीवघेणी अणुबॉम्बसारखी,जंतू संसर्ग व रासायनिक परिणाम घडवणारी शस्त्रे, व्यसने, रोगराई या साऱ्यापेक्षा जास्त मनुष्यबळी गेल्या कित्येक शतकात आत्महत्यांनी घेतले आहेत. किशोरावस्थेतील चार पैकी एक मूल निराशाग्रस्त असू शकते, हा मानसशास्त्राचा इशारा आपण लक्षात घेऊ. घडून गेलेल्या एका आत्महत्येवेळी, जवळजवळ २७ आत्महत्येचे अयशस्वी प्रयत्न सामोरे आलेले नसतात, असेही एक रिपोर्ट सांगतो. एका आत्महत्येने सोबतीच्या किमान ५ माणसांचा मनस्ताप वाढतो,असे सांगितले जाते. 

आजवरच्या अभ्यासात आत्महत्येस कारणीभूत ठरणारी अनेक कारणे सामोरी आली आहेत. जीवनातील घटनांची वाढत चाललेली अफाट गती,असह्य ताणतणाव, व्यवहार वादात सुकत चाललेली नातीगोती, ताब्यात न राहिलेले आवेग, आसपासचे निष्ठूर जग, स्वार्थी बाजार वादात हतबल, हरवत चाललेला विवेक... निराशेत दिलासा देणारी अमूल्य नीती तत्वे कमकुवत होत चालली आहेत. आता वेळ आलेली आहे तातडीने आपले आपल्या आणि इतरही मुलांशी असलेले नाते बारकाईने अभ्यासून ते दृढ करण्याची, मनोरंजनासोबत मनोविकास साधणारा निखळ, नि:स्पृह स्नेहसेतू बांधण्याची !  

अचानक येणाऱ्या स्वनाशाच्या आवेगापोटी घडणारी आत्महत्या ही नीट ठरवून केल्या जाणाऱ्या आत्महत्येपेक्षा थोडी वेगळी,कधी कमी तीव्र असू शकते. त्यात मरण्याच्या इच्छेपेक्षा तीव्र वैताग,हतबलता जास्त असते. नीट ठरवून केल्या जाणाऱ्या आत्महत्येमध्ये डिप्रेशन सारख्या आजारांची भूमिका महत्त्वाची ठरते. तेथे अगोदर मदत अप्रत्यक्षपणे मागितलीही असेल, पण ती कुणीच समजून घेतली नसल्याचा विषाद जास्त असेल. मनात वैफल्य दाटले असेल तर इतरांचा प्रतिसाद समजणेही कठीण जाते.  

परीक्षेच्या वेळी काय होतं? 
छातीत धडधड वाढते, पोटात गोळा येतो, तोंडाला कोरड पडते, डोळ्यासमोर अंधारी येते, हॉलमधून पळावेसे वाटते. आधी वाचलेले आठवेनासे होते. बऱ्याचदा पेपर मिळण्याआधीच अशी स्थिती सुरू होते. कारण पेपर कसा असेल हे अनिश्चित असतं, अनपेक्षित असतं. ह्याला आपण भीती किंवा टेन्शन म्हणतो. म्हणजेच थ्रिल किवा भीती, टेन्शन देऊ शकेल अशा कोणत्याही अपेक्षित,अनपेक्षित घटनेला शरीराची ही प्रतिक्रिया सारखीच असते. अनपेक्षित घटनेला सामोरे जायला शरीर सज्ज होते एवढाच त्याचा अर्थ घ्यावा हे उत्तम!!

ताण आलाय हे कसे ओळखावे?
अभ्यासात लक्ष न लागणे, अभ्यास टाळणे, पोटात गोळा उठणे, परीक्षेत किवा वर्गात प्रश्न विचारल्यास डोळ्यापुढे अंधारी येणे, डोके दुखणे, खूप घाम येणे, धडधड होणे, घाबरेघुबरे होणे, घरात चिडचिड करणे, शाळा चुकवावी वाटणे, भूक न लागणे, सतत परीक्षेची,मार्कांची भीती वाटणे, ही ताणाची काही लक्षणे आहेत. 

ताण म्हणजे काय? 
सगळ्यांनाच काही प्रमाणात ताण येतो, तो आवश्यकच असतो, नाहीतर आपण कदाचित काहीच प्रयत्न करणार नाही. ताण म्हणजे अनपेक्षित गोष्टीला सामोरे जाण्याची शरीराची तयारी. ते जणू काही इंजिन स्टार्ट करतं.

 

Web Title: Why do children commit suicide; Know how to recognize stress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.