मुलांच्या दाताला कीड का लागते?, चॉकलेटमुळे विषाणू वाढीस लागतात, जंकफूडचाही होतो परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 06:32 AM2023-06-18T06:32:25+5:302023-06-18T06:32:44+5:30
लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी विचित्र असतात. तसेच त्याचा जंकफूड खाण्याकडे ओढा असतो. त्या जंकफूडचे कण अडकून राहिल्याने दात किडण्यास सुरुवात होते.
मुंबई : लहान मुलांमध्ये दात किडणे ही एक सामान्य समस्या आहे. मुख्य म्हणजे चॉकलेटसारखे गोड पदार्थ खाल्ल्याने ते अनेकवेळ दातांवर तसेच राहतात. त्यामुळे त्या ठिकाणी विषाणू वाढीस लागतात आणि दात किडण्यास सुरुवात होते. जंकफूड मोठ्या प्रमाणात सध्या लहान मुले खातात. त्याचाही परिणाम लहान मुलांच्या दातांवर होत असतो. अनेक वेळा लहान मुले दात स्वच्छ (ब्रश) करण्यास टाळाटाळ करतात. त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या दातांच्या आरोग्यावर होतो. लहानपणीच दात किडल्यामुळे अनेकांचे दात काढावे लागत असल्याचे दंत चिकित्सक सांगतात. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या लहान मुलांना किमान सकाळ आणि संध्याकाळी ब्रश करतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
लहान मुले कायमच दात किडण्याची समस्या घेऊन आमच्याकडे येतात. आजही दातांच्या आरोग्याविषयी आपल्याकडे जनजागृती करण्याची गरज आहे. अनेक पालकांचे आपल्या पाल्याच्या दातांकडे दुर्लक्ष होते. परिणामी, दात एवढे किडतात की ते काढण्यावाचून पर्याय राहत नाही. यामुळे लहान मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. दात पडल्यामुळे ते हसत नाही. बाकीचे वर्गातील मुले त्यांना चिडवतात. या सगळ्या गोष्टी घडू नये, असे पालकांना वाटत असेल तर त्यांनी वेळीच मुलांच्या दाताच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. विशेष म्हणजे आपले मूल दिवसातून दोनदा ब्रश करत आहे की नाही याकडे लक्ष दिले पाहिजे.
- डॉ. आकाश अकिनवार,
इम्प्लांटोलॉजिस्ट
कीड लागण्याची ही आहेत कारणे
अन्नाचे कण अडकल्याने : लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी विचित्र असतात. तसेच त्याचा जंकफूड खाण्याकडे ओढा असतो. त्या जंकफूडचे कण अडकून राहिल्याने दात किडण्यास सुरुवात होते.
दुधाच्या बाटलीमुळे
लहान मुले रात्रभर दुधाची बाटली तोंडात ठेवून अनेक वेळा झोपतात. त्याच्यामध्ये अनेक वेळा साखर असते. रात्रभर मुलाचे तोंड उघडे राहते.
दातांमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे दात किडण्यास सुरुवात होते. यामुळे विशेष करून पुढील भागातील वरचे दात किडतात. वैद्यकीय भाषेत याला नर्सिंग बॉटल केरीज असेही म्हणतात.
काळजी काय घ्याल?
हल्ली लहान बाळांसाठीसुद्धा ब्रश बाजारात उपलब्ध आहेत. पालकांनी त्याच्या बोटात तो ब्रश धरून हळूवारपणे लहान मुलाचे दात स्वच्छ केले पाहिजेत.
लहान मुलांना दिवसातून दोनदा ब्रश करण्याची सवय लावली पाहिजे. सकाळी उठल्यावर एकदा आणि रात्री झोपताना मुलांनी ब्रश केला आहे की नाही यावर पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे.
मुले किती प्रमाणात चॉकलेट, जंकफूड खातात यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. तसेच लहान मुलांना या गोष्टीचा अतिरेक केल्यावर काय परिणाम होतात हे सांगतिले पाहिजे. तसेच दाताच्या काही तक्रारी असल्यास त्यावर तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.