उन्हामुळे नाकातून रक्त?... घाबरू नका; करून पाहा काही घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 10:45 AM2022-05-07T10:45:03+5:302022-05-07T10:46:21+5:30

उन्हाळा आला की, वेगवेगळ्या आरोग्यदायक समस्यांना प्रत्येकाला तोंड द्यावे लागते. यामध्ये या दिवसांमध्ये नाकातून रक्त येणे ही सर्वांत मोठी ...

why do people suffer from nosebleed during summers; how to Prevent it | उन्हामुळे नाकातून रक्त?... घाबरू नका; करून पाहा काही घरगुती उपाय!

उन्हामुळे नाकातून रक्त?... घाबरू नका; करून पाहा काही घरगुती उपाय!

googlenewsNext

उन्हाळा आला की, वेगवेगळ्या आरोग्यदायक समस्यांना प्रत्येकाला तोंड द्यावे लागते. यामध्ये या दिवसांमध्ये नाकातून रक्त येणे ही सर्वांत मोठी समस्या अनेकांना भेडसावते, पण यामुळे अनेकांची अचानक भंबेरी उडते. अनेकजण घाबरतात, पण नाकातून येणारे रक्त प्रत्येक वेळी आरोग्यासाठी घातक असतेच असे नाही. त्यामुळे रक्त आल्यास घाबरू नये. रक्त आल्यास डोके खाली वाकवून थंड पाणी डोक्यावर टाकावे.

म्हणून येते उन्हाळ्यात नाकातून रक्त

उन्हात घराबाहेर पडल्यास शरीराचे तापमान वाढून नाकातील छोट्या रक्तकोशिका कॅपिलरीज विस्तारित होऊन नाकातून रक्तस्राव होतो. त्याचबरोबर कोरडेपणा, नाक टोचणे, पडल्यामुळे नाकाला दुखापत होणे, ॲस्पिरिनसारख्या औषधांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर, ॲलर्जी, जंतूसंसर्ग, उच्च रक्तदाब यासारख्या अनेक समस्यांमुळे उन्हाळ्यात नाकातून रक्तस्राव होतो.

रक्त येऊ नये म्हणून काय कराल?

रक्त येऊ नये याकरिता जास्त उन्हात जाणे टाळावे, उन्हात उपाशीपोटी जाऊ नये, मुबलक प्रमाणात पेय पदार्थांचे सेवन करावे, उन्हाळी सिझनमधील फळांचे सेवन करावे, पित्त आहार टाळावे, बाहेर पडताना डोक्यावर टोपी घालावी, कान, नाक, डोळे सुती कपड्याने झाकून घ्यावे.

रक्त आल्यास 'हे' करावे?

उन्हात चालत असताना अचानक नाकातून रक्त आल्यास घाबरून न जाता, सावली असलेली जागा पाहून शांतपणे खाली बसावे. नाकातील रक्त घशात जाऊ नये, यासाठी समोरच्या बाजूस थोडे वाकावे आणि नाक ओल्या कपड्याने दाबून धरावे.

हे घरगुती उपाय करून पाहा

रक्त आल्यास घाबरून न जाता थोडे डोके वाकवून थंड पाणी टाकावे, कांद्याचा दोन थेंब रस नाकपुडीत टाकावा किंवा दुर्वा स्वरसाचे दोन थेंब नाकात टाकावे, बेलाच्या पानांचा रस पाण्यात मिसळून पिल्यानेही फायदा होतो. एकाच नाकपुडीतून रक्तस्राव होत असेल तर ती नाकपुडी दाबून ठेवावी. तसेच नाकातून रक्त येत असताना नाकाऐवजी तोंडाने श्वास घ्यावा. नाकाला बर्फ लावून धरावा, असे घरगुती उपाय रक्तसस्राव थांबविण्यासाठी उपयोगी पडतील.

पारा ४२ अंशावर

सध्या अनेक जिल्ह्यांतील तापमान ४२ अंशाच्या पार गेले आहे. या तापमानामुळे नाकातील त्वचा ड्राय झाल्याने, सर्दीसाठी घेतलेल्या औषधांमुळे आणि हाय ब्लडप्रेशरमुळे त्रास असल्यासही नाकातील त्वचा कोरडी होऊन नाकातून रक्त येते.

...............

उन्हाळ्यात अनेक नागरिकांमध्ये नाकातून रक्त येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी या दिवसांमध्ये उन्हात घराबाहेर पडू नये किंवा बाहेर पडताना आपली स्वत:ची काळजी घेत नाक, कान, डोळे हे सुती कपड्याने झाकूनच घराबाहेर पडावे.

- डॉ. संजय चोपकर, आयुर्वेदतज्ज्ञ.

Web Title: why do people suffer from nosebleed during summers; how to Prevent it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.