स्वप्नातून अचानक जाग का येते? हे आहे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 06:01 AM2021-12-03T06:01:36+5:302021-12-03T06:02:06+5:30
Science News: एकूण दोन प्रकारच्या ‘निद्रा’ असतात, हे आपण पाहिले. रेम (REM) आणि नॉन रेम. या दोन्ही रात्रभरात दर दीड तासाने आलटून-पालटून येतात. रेम (REM) ही झोप पहाटे ३ नंतर सर्वाधिक असते. नॉन रेम आणि रेम या झोपेच्या दोन्ही अवस्था पतंजलीने २३०० वर्षांपूर्वी नोंदविल्या आहेत.
- डॉ. अभिजित देशपांडे
(इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस
iissreports@gmail.com)
एकूण दोन प्रकारच्या ‘निद्रा’ असतात, हे आपण पाहिले. रेम (REM) आणि नॉन रेम. या दोन्ही रात्रभरात दर दीड तासाने आलटून-पालटून येतात. रेम (REM) ही झोप पहाटे ३ नंतर सर्वाधिक असते. नॉन रेम आणि रेम या झोपेच्या दोन्ही अवस्था पतंजलीने २३०० वर्षांपूर्वी नोंदविल्या आहेत. त्याला ‘सुषुप्ती’ आणि ‘स्वप्न’ असे म्हणतात. पहाटे ‘ब्राम्ह मुहूर्त’ असे सांगून मेंदूच्या अति ऊर्जितावस्थेचा फायदा घेण्याचे पतंजली सुचवतो!
जागृत अवस्था आणि रेम यामध्ये एक साधर्म्य असे की दोघांचा ई. ई. जी (मेंदूतील लहरींचे विद्युत आलेखन) हा सारखाच दिसतो. पण जागेपणी डोपामीन, सेरेटोनीन, नॉरॲड्रनलीन ही न्युरोट्रान्समीटर्स सर्वाधिक प्रमाणात वापरली जातात. तर रेम झोपेत ही सगळ्यात कमी वापरली जातात. याचा मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
मेंदूचे चार ठळक भाग आहेत. १) मोठा मेंदू (फोर ब्रेन) २) लहान मेंदू (सेलेबलम) ३) देठ (ब्रेनस्टेम) ४) मेडुला
मोठ्या मेंदूमध्ये विचार येणे, भावना निर्माण होणे, गोष्टींचे आकलन, स्मरण आदी क्रिया होतात.
मोठा मेंदू आणि देठ यांना जोडणारे द्वार म्हणजे ‘थॅलमॅस’ हा भाग होय. मेंदूकडे जाणाऱ्या सर्व संवेदना (गंध सोडून) या भागातूनच जातात. झोपेच्या सुरुवातीला हे दार बंद होते, म्हणूनच आपल्याला झोपेत स्पर्श, तापमान इत्यादी संवेदना होत नाहीत. रेम झोपेमध्ये या दारातून काही संवेदना स्वत:हून शरिरातून प्रवेश मिळवतात. मोठ्या मेंदूचेदेखील भावनांशी संबंधित असलेले हिपोकॅम्पस, ॲमिग्डीला असे भाग आहेत. रेम झोपेत हे भाग उद्दिपीत होतात. दु:खद, धक्कादायक घटना भावनिक मेंदूमध्ये, विशिष्ट कप्प्यात (एखादा काटा खुपावा तशा) साठलेल्या असतात. अशी घटना दिवसा घडली की पुढच्या काही रात्रींमध्ये रेम झोप हा काटा काढण्याचा स्वप्नरुपाने प्रयत्न करते. काहीवेळेला स्वप्नातून जाग येते आणि झोप लागत नाही. अशावेळेला ‘इ. एम. डी. आर.’ ही डोळ्यांच्या हालचालीचा वापर करण्याची पद्धत उपयोगी पडते. अर्थात स्वप्नांतून जाग येण्याचे कारण केवळ भावनिकच असेल, असे नाही. दुसऱ्या एका महत्त्वाच्या कारणाचा उल्लेख करणे भाग आहे. ‘ऑबस्ट्रीक्टीव स्लीप ॲप्नीआ’ ही झोपेमध्येच होणारी व्याधी आहे. त्याबद्दल पुढल्या आठवड्यात!