हृदयविकाराचा झटका का येतो?; त्यामगचं कारण, लक्षणे अन् उपाय, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 08:27 AM2021-09-03T08:27:22+5:302021-09-03T08:27:58+5:30
कोरोनामुळे अनेकांची जीवनशैली बदलली आहे. ‘घरून काम’ या नव्या कार्यसंस्कृतीमुळे तर अनेक व्याधी जडू लागल्या आहेत.
छोट्या पडद्यावरचा सुपरस्टार असलेल्या सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनामुळे पुन्हा एकदा जीवनशैलीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अवघ्या चाळिशीत असलेल्या सिद्धार्थला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तरुण वयात हृदयविकार जडण्याचे प्रमाण आताशा वाढू लागले आहे. हे असे का होते?
वाढता ताण
कोरोनामुळे अनेकांची जीवनशैली बदलली आहे. ‘घरून काम’ या नव्या कार्यसंस्कृतीमुळे तर अनेक व्याधी जडू लागल्या आहेत. स्थूलपणा वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. कामाचे स्वरूप बदलल्याने नवनव्या ताणांना सामोरे जावे लागत आहे. हृदयावरील ताण वाढत असल्याने एका मर्यादेपलीकडे तो असह्य होऊन हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. याशिवाय वंशपरंपरेमुळेही हृदयविकाराचा त्रास जडतो.
हृदयविकाराची लक्षणे
हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीर काही संकेत देत असते.या संकेतांमध्ये छातीत दुखणे वा छातीच्या आसपास अचानक दुखणे, जडत्व येणे, हात-पाय, पोट, पाठ आणि घसा यांच्यात वेदना सुरू होणे, श्वसनास त्रास जाणवणे, खूप घाम येणे, जीव घाबरणे, तीव्र डोकेदुखी, मळमळणे यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे.
या कारणांचाही अंतर्भाव
- फास्ट फूडचे अतिसेवन
- उच्च रक्तदाबाचा त्रास
- रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढ
- मधुमेहाचा त्रास
- ग्रामीण भागातील तरुणांच्या तुलनेत शहरी भागातील तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक आहे. त्यासाठी आधुनिक जीवनशैलीच जबाबदार आहे.
हृदयविकार टाळायचा असेल तर
- आहार नियमित असणे गरजेचे
- तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार व्यायाम आवश्यक
- तणावमुक्तीसाठी योगसाधना करावी
- एखाद्या सुट्टीच्या दिवशी निसर्गरम्य ठिकाणी आवर्जून जावे
- फास्ट फूट शक्यतो टाळावे
- आहारात पालेभाज्या आणि फळांचा समावेश अधिकाधिक असावा