डोक्याला शॉट लागला की झोप का उडते?; चिंता कमी करा! असा सल्ला अनेकजण देतात. पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 08:18 AM2021-05-21T08:18:56+5:302021-05-21T08:19:20+5:30
तुम्हाला तुमच्या मालाकरिता एक ऑर्डर मिळालेली आहे आणि तीस दिवसात माल पोचवायचा आहे. तुम्ही दक्ष मालक असल्याने मजुरांवर देखरेख ठेवाल
दिवस आणि रात्र, जाग आणि झोप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर झोप स्वस्थ असेल, तर उत्तम जाग असते. तसेच बेताचीच चिंता आणि दिवसभर सजगता असेल तर रात्रीची झोप चांगली असते. थोडीशी म्हणजे अगदी चिमूटभर चिंतातुरता (ॲन्क्झायटी) असली तर एक प्रकारचे उद्दिपन येते, सजगता वाढते आणि हातातले काम चांगले होते. परीक्षेच्या अगोदर असलेली थोडीशी चिंतातुरता ही पेपर लिहिताना आपल्या स्मरणशक्तीला चालना देते. अजिबातच चिंता नसेल तर ढिस्सपणा येतो. पण जशी ह्या चिंतातुरतेची पातळी वाढत जाते, तसे आपल्या कामाची क्षमता कमी होते आणि एका मर्यादेनंतर आपली झोप बिघडायला सुरुवात होते.
चिंता कमी करा! असा सल्ला अनेकजण देतात. पण या कोरड्या सल्ल्याचा काय उपयोग होतो? समजा तुम्ही एका छोट्या फॅक्टरीचे मालक आहात तुमच्या या छोट्या कारखान्यात २० प्रशिक्षित मजूर काम करतात. तुम्हाला तुमच्या मालाकरिता एक ऑर्डर मिळालेली आहे आणि तीस दिवसात माल पोचवायचा आहे. तुम्ही दक्ष मालक असल्याने मजुरांवर देखरेख ठेवाल, नेहमीचे काम असल्याने तुमच्या चिंतेची पातळी कमी असेल. सुरुवातीलाच पाच मजुरांनी काही कारणाने सुट्टी घेतली, तुमच्याकडे तेवढेच काम करायला पंधरा मजूर उरले.. मग तुमच्या चिंतेची पातळी थोडी वाढेल. कुणी टिवल्याबावल्या करताना दिसला, जेवणाची आणि चहापाण्याची वेळ पाच मिनिटांनी वाढली तरी ओरडायला लागाल. पण काम होईलच यावर तुमचा विश्वास असेल. आता समजा , तुमच्या ओरडण्याला कंटाळून पाच मजूर निघून गेले. फक्त दहा मजूर शिल्लक.. तुमच्या चिंतेची पातळी वाढेलच. सतत येरझाऱ्या मारायला लागाल. काम होईल? ना ? अशी शंका डोकावू लागेल. एका प्रकारचे असहायतेचे सावट येईल. आता समजा अतिश्रमाने पाच मजूर आजारी पडले.. तुमच्या काळजात धडधड होईल. येरझाऱ्या तर वाढतीलच पण काम होणारच नाही ,झाले तरी दिलेल्या वेळात होणार नाही, असा पक्का विचार मनात होईल? नैराश्याची भावना (होपलेसनेस )प्रबळ होईल.. अशा रीतीने मजूर कमी व्हायला लागल्यानंतर तुमचा प्रवास थोडीशी चिंता /सजगता ते वाढलेली चिंता ,असहाय्यपणा ते नैराश्य अशी स्टेशने घेत होईल..आणि तुमची झोप उडेल.
- डॉ. अभिजित देशपांडे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस
iissreports@gmail.com