तरूणांना चालता-फिरता अचानक का येतोय हार्ट अटॅक? जाणून घ्या यामागील कारणे...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 01:45 PM2024-01-04T13:45:11+5:302024-01-04T13:47:48+5:30
आजच्या धकाधकीच्या युगात लोकांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Heart Attack Causes : आजच्या धकाधकीच्या युगात लोकांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. शारीरिक व्यायामाचा अभाव, उच्च रक्तदाब व कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि मादक पदार्थांच्या व्यसनामुळे हार्ट संबंधित आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. माहितीनूसार ,२०२३ या वर्षामध्ये भारतात ह्रदयरोगाचा झटका येऊन मृत्यू होणाऱ्यांचे संख्येत तुलनेने वाढ झालीय. ह्रदरोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्यामागे काही सवयी कारणे ठरतात, ज्या त्वरित बदलणं गरजेचं आहे.
सध्या ह्रदयरोगाची समस्या ही गंभीर बनत चालली आहे. भारतात मागील काही वर्षांमध्ये ह्रदयाचा झटका येऊन मृत्यू होणाऱ्यांमध्ये १२ ते ४५ वयोगटातील लोकांना जीव गमावावा लागलाय. तरुणांना नाचताना किंवा फिरताना अचानक ह्रदयविकाराचा झटका येतो आणि त्यांचा मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणं आपण पाहिली, वाचली असतीलच. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार ही समस्या जगभरात मृत्यूचे सर्वात मोठे बनत चालली आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे १ कोटी ८० लाख लोक आपला जीव गमावत आहेत.
ह्रदयरोगाची समस्या का वाढते :
अलिकडेच ह्रदयरोगाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. कोविड-१९ महामारी नंतर ह्रदयाशी संबंधित आजार प्रचंड वाढले. पाहायला गेल्यास कोरोनानंतर तरुणांमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण तुफान वाढलं आहे. मागील काही वर्षांमध्ये भारतात या जीवघेण्या आजाराने डोकं वर काढलं आहे.
आरोग्यतज्ञांनी सांगितले कारण:
मागील तीन वर्षांचा आढावा घेतल्यास कोविड -१९ नंतर भारतात ह्रदयरोगाने मृत्यू झालेल्यांच्या संख्येत प्रंचड वाढ झालेय. एनसीआरबीने जारी केलेल्या आकडेवारीनूसार भारतामध्ये २०२२ या वर्षी ह्रदरोगाचा धोका वाढला आहे. व्यायामाचा अभाव, उच्च रक्तदाब व कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणामुळे हा आजार अधिक बळावतोय.
आकडेवारीत वाढ :
एनसीआरबीने दिलेल्या माहितीनूसार भारतामध्ये जवळपास ३२,४५७ लोकांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू झालेल्या नोंदी आहेत. शिवाय २०२३ मध्ये ही आकडेवारी २८,४१३ इतकी आहे. या आजाराने सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली आहे.
ह्रदयरोगांपासून बचावाकरिता काय करावे-
डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार, ह्दयरोगाच्या वाढत्या समस्येपासून सूटका करण्यासाठी काही गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे.
१.मद्यपान किंवा धुम्रपान करु नये, असा सल्ला आरोग्यतज्ञ देतात.
२.आपल्या आहार पोषक, संतुलित असणे गरजेचे आहे.
३.नेहमी ताजेतवाणे राहण्यासाठी व्यायाम करण्यास सांगितले जाते.
४.डॉक्टरांच्या म्हणण्यानूसार, वजन नियंत्रित ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
५.कोलेस्ट्रॉल, मधुमेह तसेच उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे.